-->
चवदार तळ्याचे पाणी पेटले

चवदार तळ्याचे पाणी पेटले

संपादकीय पान गुरुवार दि. ३१ मार्च २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
चवदार तळ्याचे पाणी पेटले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी सर्व जातीधर्मांच्या लोकांना खुले व्हावे त्यासाठी लढा दिला आणि समतेचा संदेश केवळ देशातीलच लोकांना नाही तर जगातल्या जनतेला दिला. चवदार तऴ्याच्या या ऐतिहासिक लढ्याचे महत्व समतेतील लढाईतील प्रत्येक शिलेदार जाणतो. बाबासाहेबांचे अनुयायी या घटनेची आठवण राहावी म्हणून २० मार्च रोजी दरवर्षी या तळ्यावर येतात व या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण करतात. यंदा मात्र तेथे या घटनेच्या आदल्या दिवशी काही वेगळेच शिजले आणि समतेच्या लढाईला तडा जाईल अशी घटना घडली. महाडच्या चवदार तळयाला आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी असताना आदल्याच दिवशी शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी जलशुद्धीकरणाचा घाट घातला. त्यामुळे राज्यातील २० कोटी आंबेडकरी जनतेचा अपमान त्यांनी केला आहे. आमदार गोगावले यांच्या दाव्यानुसार हे जलशुध्दीकरण नव्हते तर जलपुजन होते व हा सरकारी कार्यक्रम होता. प्रश्‍न असा उपस्थित राहातो की, हा जलपुजनाचा कार्यक्रम ते २० मार्चला तेथे येणार्‍या लाखोंच्या समुदायापुढेही ते करु शकले असते. गावोगावी आज पाण्याचा प्रश्‍न महत्वाचा आहे आणि महाडच्या या चवदार तऴ्यावर या दिवशी येणार्‍या आंबेडकरी अनुयानांना गावोगावी हा प्रश्‍न भेडसावित आहे. त्यांनाही येथे पाण्याविषयी मार्गदर्शन झाले असते व खर्‍या अर्थाने जलपुजन झाले असते. केवळ ब्राह्मणाला बोलावून तेथे जलपुजन करणे म्हणजे पाण्याविषयी जनजागृती झाली असे नव्हे. अर्थात अशा प्रकारचे जलपुजन करणे हाच या ऐतिहासिक तळ्यावर आंबेडकरांचा केलेला अपमान म्हटला पाहिजे. कारण अशा प्रकारे जलपुजनाने पाण्याविषयी जनजागृती होणार नाही. जलपुजनाच्या सरकारी कार्यक्रमाला खरे तर ब्राह्मण असण्याचीही आवश्यकता नाही. याचा अर्थ सरकारी अधिकार्‍यांना व लोकप्रतिनिधींनाही जलपुजनाचा खरा अर्थ समजलेलाच नाही. शिवसेना-भाजपाच्या सरकारला जर अशा प्रकारे जलपुजनाचेच कार्यक्रम करावयाचे असले तर त्यांनी जरुर करावेत परंतु त्यातून पाणी प्रश्‍न काही सुटणार नाही. आज जर प्रबोधनकार ठाकरे हायात असते तर त्यांनी आपल्या भाषेत या घटनेचा समाचार घेतला असता आणि जलपुजनाचा घाट घालणार्‍यांना वठणीवर आणले असते. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृत हा प्रश्‍न विरोधकांनी लावून धरला मात्र मुख्यमंत्री याला उत्तर द्यायला पुढे न आल्यामुळे सरकारच्या हेतुबद्दल शंका निर्माण झाली आहे. यातून सरकारचा जातियवादी चेहरा समोर आला आहे असेच खेदाने म्हणावे लागते. चवदार तळ्याचे पाणी अशा प्रकारे पेटले आहे. आंबेडकरी जनता हे सहन करणार नाही. सरकारने प्रश्‍न सोडवायचे असतात, निर्माण करावयाचे नसतात, मात्र हे सरकारला अजून समजलेले नाही. आता तर त्यांनी असे प्रश्‍न निर्माण करुन ठेवले आहेत की देशाच्या घटनेतील तुतुदीलाच आव्हान दिल्यासारखे आहे.

Related Posts

0 Response to "चवदार तळ्याचे पाणी पेटले"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel