-->
भाजपाचा रडीचा डाव

भाजपाचा रडीचा डाव

संपादकीय पान शनिवार दि. २६ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
भाजपाचा रडीचा डाव
माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार किर्ती आझाद यांनी दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधील भ्रष्टाचारावर म्हणजेच अप्रत्यक्षरित्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात तोफ डागल्याने संतंप्त झालेल्या भाजपातील पदाधिकार्‍यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन रडीचा डाव खेळला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी क्रिकेट असोसिएशनमधील भ्रष्टाचार उघडा पाडला होता. त्यानंतर दोन दिवस भाजपात एकदम स्मशानशांतता पसरली होती. मात्र किर्ती आझाद यांनी या आरोपाचे समर्थनच नव्हे तर अनेक पुरावेच पत्रकारांना सादर केल्याने अर्थमंत्री जेटली हे अडचणीत आले आहेत. एकीकडे जेटली आपला १३ वर्षाचा कारभार स्वच्छ आहे, कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असे ठामपणे सांगतात मात्र चौकशीला सामोरे जाण्याची त्यांची काही तयारी दिसत नाही. त्यामुळे या प्रकरणात निश्‍चितच काही तरी काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर जेटलींनी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही तर ते चौकशी करण्यापासून कशासाठी लांब पळत आहेत असा प्रश्‍न उपस्थित होतो. मात्र या निमित्ताने भाजपातील जुन्या जाणत्यांना पुन्हा एकदा उभारी आहे. नरेंद्र मोदींच्या काळात अडगळीत पडलेल्या लालकृष्ण अडवानी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासह चार ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शक मंडळातील नेत्यांनी दिल्लीत बैठक घेऊन कीर्ती आझाद निलंबन प्रकरणावर चर्चा केली. खासदार आझाद यांना नोटीस न देताच त्यांच्यावर कारवाई करणे हे पक्षाच्या घटनेविरुद्ध व म्हणूनच अत्यंत अयोग्य असल्याचे या ज्येष्ठांचे मत पडलेे. आझादप्रकरणी पक्षांतर्गत चौकशी समिती नेमूनच अंतिम निर्णय करावा, असाही आग्रह त्यांनी धरला आहे. अशा प्रकारे त्यांनी पक्ष नेतृत्व व सध्याचे पक्षाचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांना एक प्रकारे पुन्हा ललकारले आहे. यापूर्वी बिहरमध्ये भाजपचा पराभव झाल्यावर अडवानी व इतर वृद्धांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला बैठक घेऊन मोदी राजवटीवर आपटबार फोडला होता. आता त्यांनी आझाद प्रकरणाचा धागा पकडून पक्षनेतृत्वाला आव्हान दिले आहे. अडवानी, जोशी, शांताकुमार व यशवंत सिन्हा बैठकीस हजर होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या डीडीसीएतील कथित भ्रष्टाचाराबाबत भाजपने काल तडकाफडकी निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांनी यात ज्येष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. तो धागा पकडून अडवानी व मंडळींनी पक्षात पुन्हा सक्रिय झाली. पक्षाने दिलेल्या नोटीशीवर उत्तर देण्यासाठी आझाद यांनी भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची मदत मागितली असून, स्वामी यांनीही त्यासाठी आनंदाने होकार दिला आहे. त्यामुळे स्वामी हे फक्त गांधी घराण्यासाठीच डोकेदुखी नाहीत तर तमाम भाजपाच्या नेत्यांसाठीही तापदायक ठरणार आहेत, असेच दिसते. यापूर्वी वरिष्ठ नेते जसवंतसिंह यांनी बॅरिस्टर महंमद अली जीना यांच्यावर केवळ पुस्तक लिहिले म्हणून भाजपला त्यांना तडकाफडकी काढून टाकावे लागले होते. त्याबाबतीत भाजपावर संघाकडून दबाव होता. त्यावेळीही जसवंतसिंह यांना त्याआधी कारणे दाखवा नोटीस दिली गेली होती. आझादप्रकरणी तसे काहीही केले गेले नाही व निलंबनानंतर काही तासांनी आझाद यांना मोबाईलवरून नोटीस पाठविली गेली. एकूणच पक्षातील हुकूमशाही कशी आक्रमक झाली आहे, हे दिसते. भाजपाच्या पक्ष नेतृत्वाला आपल्याला कोणीच विरोधक नको आहे, जो कोणी पक्षात विरोध करेल त्याला टार्गेट केले जाईल असाच इशारा या प्रकरणातून भाजपाला द्यावयाचा आहे. आझाद यांच्यावरील कारवाईसाठी पक्षाच्या संसदीय मंडळाची जी बैठक झाली तिला पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह १२ पैकी केवळ चार ते पाच नेते हजर होते व आझाद यांच्या निलंबन पद्धतीबाबत त्यांच्यातही एकमत नव्हते अशी चर्चा आहेे. खासदार कीर्ती आझाद यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांचे समर्थक खवळले आहेत. बिहारमधील दरभंगामध्ये आणि दिल्लीतील भाजपचे मुख्यालय असलेल्या ११, अशोका रोडवरील भाजप मुख्यालयाच्या बाहेर जेटली यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. केंद्र सरकारने आझाद यांचे निलंबन मागे घेतले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराच दरभंगातील भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. एकूणच भाजपाला आझाद यांचे निलंबन महाग पडणार असे दिसत आहे. परंतु सत्तेचा ताज डोक्यावर चढल्यावर अनेक बाबी नजरेआड होतात तसेच काहीसे भाजपाच्या नेतृत्वाचे झाले आहे. भाजपाचा हा रडीचा डाव त्यांना महाग पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिहारमध्ये नुकताच सपाट्याने मार खाऊनही त्यातून पक्ष काही बोध घेत नाही असेच दिसते.
------------------------------------------------------------

0 Response to "भाजपाचा रडीचा डाव"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel