-->
कुठे गेलाय महाराष्ट्र माझा?

कुठे गेलाय महाराष्ट्र माझा?

संपादकीय पान शुक्रवार दि. २५ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कुठे गेलाय महाराष्ट्र माझा?
राजर्षी शाहू, ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अधिष्ठान लाभलेल्या या महाराष्ट्राला आपण मोठ्या अभिमानाने पुरोगामी म्हणत आलो आहोत. निदान अन्य राज्याची तुलना करता खरोखरीच महाराष्ट्र पुरोगामी आहे असे म्हटले जायचे. परंतु सध्या घडत असलेल्या घटना पाहता आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणण्याची आता लाज वाटू लागली आहे. त्यामुळे सध्याच्या राज्यकर्त्यांना असा प्रश्‍न विचारावासा वाटतो की, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही हा महाराष्ट्र? निदान तसे म्हणण्याची पाळी कोल्हापुरातील घटनेने आली आहे. कोल्हापूरात ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. खरे तर ऑनर किलिंग म्हणणे हा शब्दप्रयोगच चुकीचा वाटतो. कोणतेही किलिंग हे ऑनर होऊ शकत नाही. एखाद्याचा खून करायचा आणि त्याचा टेंभा मिरवायचा ही संस्कृती म्हणजे मानवजातीला काळीमा लावणारी आहे. कोल्हापुरातील
इंद्रजीत कुलकर्णी या तरुणाने मेधा पाटील या तरुणीशी विवाह केल्याने मेधाच्या दोन भावांनी मेधा आणि तिचा पती इंद्रजीत या दोघांची चाकूने भोसकून हत्या केली. यासंबंधी तीन आरोपींना इंद्रजीत आणि मेधाच्या हत्येबद्दल अटक करण्यात आली आहे. खरे तर या प्रकरणी जातीचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे ठरेल परंतु आपण या प्रकरणाचा विचार करताना जात विसरुन चालणार नाही. या ठिकाणी मुलगा हा ब्राह्मण समाजातील आहे व त्याने मराठा समाजातील मुलीशी लग्न केले होते. ऑनर किलिंगसारखे प्रकार आता उच्च जातीतही आले आहेत हे त्यावरुन दिसते. त्यामुळे आपल्याकडील जातीव्यवस्थेची पाळेमुळे किती घट्ट होत चालली आहेत व त्याला समाजाच्या सर्व थरातून कसा पाठिंबा मिळतो याचे आश्‍चर्य या पुरोगामी महाराष्ट्रात वाटते. आमच्या घरातील तरुणीला, प्रेम विवाह करण्याचा अधिकारच नाही. आम्ही सांगू त्या घरातच तिने नांदायला गेले पाहिजे, अशा वृत्तीची माणसे आजही आपल्याला भेटतात. या वृत्तीविरुद्धच मेधाने बंड केले आणि आपला मित्र इंद्रजीत याच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाला विरोध हा परजातीतला असल्यानेच होता आणि इंद्रजीत जर जातीतला असता तर त्यांच्या प्रेमाला विरोध नव्हता. त्यांचे लग्न मान्य नव्हते म्हणून कुणालाही ठार मारून टाकण्याचा परवाना कुठल्याही यंत्रणेने कुणालाही दिलेला नाही. मात्र जातीयवादाचे भूत व स्त्रीस्वातंत्र्य न जुमानणार्‍या या समाजाने या दोघांना मृत्यूचा मार्ग दाखविला. आंगावर काटा आणणारी ही घटना. आमच्या मनाविरुद्ध घडते आहे, अशांना आम्ही संपवून टाकू, असे म्हणत निष्पापांचे मुडदे पाडणार्‍यांना सभ्यतेच्या संस्कृतीत अजिबात थारा नाही. असा विचारांना जर आळा घालावयाचा असेल तर या दोघांच्या खून्यांना फाशी देणे हाच त्यावरील उपाय आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचे बीज रोवले. सती जाण्याची प्रथा बंद पाडली. केशवपनसारखी मानवाला काळीमा लावणारी प्रथाही आपण हद्दपार केली, परंतु आता आपण अशा घटना पाहिल्यावर पुन्हा एकदा शंभर वर्षे मागे जात आहोत की काय अशी जाणीव होते. स्वातंत्र्यानंतर खरे तर आपल्याकडे महिलांनी आपल्या देशात मोलाची कामगिरी केली आहो. महाराष्ट्र यात सर्वात आघाडीवर होता असे एक सकारात्मक चित्र होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रीदा देखील कोणत्याही क्षमतेचे काम करीत आहेत.  अगदी नासासारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेतही काही मराठी मुली शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे हा बदल आपल्याला प्रेरणादायी ठरत असला तरीही ऑनर किलिंगसारख्या घटना यावर विरजण घालीत आहेत. ऑनर किलिंगसारख्या घटना यापुढे घडू नयेत यासाठी आपल्याला आता नवीन क्रांतीची बीजे रोवावी लागतील. महिलांना आपण समान संधी देतो पण अनेकदा हे कागदावरच राहाते. महिलांना त्यांच्या आयुष्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना स्वतंत्र्यपणे घेता आला पाहिजे. जाती-धर्माच्या भींती भेदून आपल्याला लग्न करण्याची मुभा उपलब्ध झाली पाहिजे. खरोखरीच या पुरोगामी राज्यात हे घडायचे असेल तर त्याची क्रांतीज्योत आता या घटनेनंतर पेटवावी लागेल, यात काहीच शंका नाही. अन्यथा अशा घटना घडतच राहातील. दोन-चार दिवस त्यावर चर्चा होईल व ही जनता पुन्हा हे सर्व विसरुन जाईल. ऑनर किलिंगसारख्या समाजाला मागे नेणार्‍या घटना आपल्याकडे होणार असतील तर त्याला पेटून उठून विरोध झाला पाहिजे. या कामी सरकार आपल्याबरोबर असो किंवा नसले तरीही समाजाचे मतपिरवर्तन होण्यासाठी समाजातून नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. अशा घटना पुन्हा या राज्यात होऊ नयेत यासाठी तरुणांनी प्रामुख्याने तरुणींनी पुढाकार घ्यावा.
----------------------------------------------------------------------

0 Response to "कुठे गेलाय महाराष्ट्र माझा?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel