-->
आरोपीच्या पिंजर्‍यात जेटली

आरोपीच्या पिंजर्‍यात जेटली

संपादकीय पान शनिवार दि. १९ डिसेंबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आरोपीच्या पिंजर्‍यात जेटली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला जेमतेम दीड वर्ष होत असताना आता अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केल्याने आता जेटली आरोपीच्या पिंजर्‍यात आले आहेत. अर्थातच आपले सरकार हे भ्रष्टाचारापासून मुक्त असेल असे सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांचा फुगा या निमित्ताने फुटला आहे. केंद्रातील अर्थसारखे एक मोठे खाते सांभाळणार्‍या मंत्र्यावर एवढे आरोप होणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. सध्या जे आरोप सुरु आहेत त्याचे जेटली यांनी खंडन केले असले तरीही त्यांनी या आरोपाबाबत चौकशी करण्याचे केजरीवाल यांचे आव्हान स्वीकारलेले नाही. जर जेटली यांना आपल्यावरील आरोप खोटे आहेत असे जर वाटत असेल तर त्यांनी चौकशीसाठी समोर येण्यात काहीच अडचण नाही. मग जेटली चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरतात हे देखील एक गुढ आहेच. दिल्ली क्रिकेट संघटनेतील या भ्रष्टाचाबाबत जेटली यांनी चौकशी करण्याचे आव्हान स्वीकारावे. दिल्लीत कायदेपंडीत म्हणून ख्यातर्कित असणारे जेटली राज्यसभेत यासंबंधी उत्तर देण्याचे टाळण्यासाठी काही संकेदासाठीच आले. त्यामुळे यात काहीतरी निश्‍चितच काळेबेरे आहे असे म्हणण्यास जागा आहे. विरोधक त्यांच्यावर आक्रमक होण्यात त्यांचे काही चुकले नाहीत. या सर्व प्रकरणाची सुरुवात झाली ती, अरविंद केजरीवाल यांचे समर्थक असलेल्या व दिल्लीचे सचिव राजेंद्रकुमार यांच्या कार्यालयावर घातलेल्या धाडीतून. सी.बी.आय.ने त्यांच्या कार्यालयात व घरी घातलेल्या धाडी या राजकीय आहेत, त्यांना या धाडीतून दिल्ली क्रिकेट संघटनेच्या काही फायली ताब्यात घ्यावयाच्या आहेत. अशा प्रकारे केंद्र सरकार आपल्या मंत्र्याला वाचविण्यासाठी या धाडीचा घाट घालीत आहे, असा केजरीवाल यांचा आरोप होता. केजरीवाल यांनी ट्विटमागे ट्विट करून जेटलींवर सतत हल्ला चढविला आहे. जेटली अध्यक्ष असतानाच्या दीर्घ काळातच हा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे जेटली यांनी या गैरव्यवहाराची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. केजरीवाल हे राजेंद्रकुमार यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकार्‍याला आपली प्रतिष्ठा पणाला लावून वाचवत असल्याचे दिसून येत असल्याने या दोघांत असे कोणते संबंध आहेत, असा शेलका सवाल भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी विचारला. परंतु भाजपाचे नेते हा भ्रष्टाचार कसा झाला नाही त्याबाबतचे स्पष्टीकरण काही करण्यास तयार नाहहीत. संघटनेचे कार्याध्यक्ष व भाजपा नेते चेतन चौहान हे देखील जेटली यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार स्टेडियमच्या बांधकामासाठी निर्धारित ११४ कोटी रुपये पूर्ण खर्च झाले आहेत, मात्र सुमारे २५ कोटी रुपये अपेक्षित असलेला हा खर्च एवढा का वाढला? त्यामागे खर्च नेमका काय झाला? यासंबंधी मूग गिळून आहेत. केजरीवाल यांच्या आरोपांनतर जेटली यांनी ब्लॉग लिहून सारे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला खरा परंतु चौकशीला सामोरे जाण्याची काही तयारी दाखविली नाही. जेटलींच्या सांगण्यानुसार, आपण संघटनेचे कामकाज २०१३ मध्ये राज्यसभा विरोधी पक्षनेता झाल्यावर पूर्णपणे थांबविले. २०१४-१५ मध्ये एका स्टेडियमच्या बांधकामातील तांत्रिक अनियमिततेवरून आपल्याला एक माजी पदाधिकारी असल्याच्या कारणावरून या प्रकरणात ओढणे गैर आहे. जेव्हा एखाद्या कामाचा व्याप वाढतो, तेव्हा त्याची किंमतही वाढते, इतके हे साधे प्रकरण आहे. या जागतिक दर्जाच्या स्टेडियमच्या क्षमतेत ४२ हजार प्रेक्षक संख्येइतकी वाढ केली गेली त्यावर त्याचा खर्चही ११४ कोटींपर्यंत वाढला. या रकमेवरून वादंग होत आहे. मात्र, त्याच काळात यूपीए सरकारने नेहरू स्टेडियमच्या केवळ नूतनीकरणासाठी ९०० कोटी व ध्यानचंद स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. या वतुस्थितीकडे केजरीवाल व त्यांच्या बरोबरीने आरोप करणारे मुख्यमंत्री दुर्लक्ष करतात, हे आश्‍चर्याचेच आहे, अशा शब्दांत जेटली यांनी ममता बॅनर्जी व नितीशकुमार यांनाही फटकारले. क्रिकेटमध्ये सध्या पैशाची चलती आहे. क्रिकेटच्या राज्यातील संघटनांकडे पैसा भरपूर आहे, त्यातून स्टेडियमचे आधुनिकीकरण करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार होतो, हे काही छुपे राहिलेले नाही. मात्र कॉँग्रेस व आप भ्रष्टाचारी व आपणच काय ते स्वच्छ असा आव आणणार्‍या भाजपा नेत्यांची यामुळे मोठी फसगत झाली आहे. सध्या आरोपीच्या पिंजर्‍यात जेटली आले आहेत. त्यांची रितसर चौकशी करुन ते जोपर्यंत यातून मुक्त होत नाहीत तोपर्यंत जेटली यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा भाजपा व कॉँग्रेसमध्ये फरक तो काय राहाणार?
----------------------------------------------------------------

0 Response to "आरोपीच्या पिंजर्‍यात जेटली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel