-->
संपादकीय पान शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
----------------
दोस्त दोस्त ना रहा
गेले महिनाभर सुरु असलेले शिवसेना व भाजपच्या दरम्यानचेचर्चेचे गुर्‍हाळ संपुष्टात येऊन महायुतीचा घटस्फोट झाला आहे.  त्याचबरोबरीने कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या सत्ताधारी असलेल्या आघाडीचा १५ वर्षांचा संसार मोडीत निघाला आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असलेली ही आघाडी आता स्वतंत्र्यपणे लढणार असल्याने यावेळी पंचरंगी लढती प्रत्येक मतदारसंघात होतील, असे सध्याचे चित्र आहे. पंचवीसहून जास्त वर्षे राज्यात युतीने आपला संसार थाटला होता. त्यात पाच वर्षे या युतीने सत्ताही उपभोगली. रिपब्लिकन आठवले गट, राष्ट्रीय समाज पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम अशा अन्य पक्षांना एकत्र घेऊन महायुतीची मोट यावेळच्या निवडणुकीसाठी खरे तर सज्ज झाली होती. मात्र, अखेरीस जागा वाटपाच्या प्रश्‍नावरुन ही महायुती फुटलीच. गेल्या २५ वर्षात युती एवढी एकसंघ झाली होती की शिवसेना व भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्याशी एकसंघ झाला होता. हा कार्यकर्ता सर्वात जास्त प्रमाणात व्यथित होईल. गेल्या पंधरा दिवसांतील शिवसेना व भाजप यांच्यात होत असलेल्या चर्चा पाहता, ही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर होतीच. मात्र, एवढ्या वर्षांची ही दोस्ती तुटेल व भाजप शिवसेनेची साथ सोडून आपला स्वतंत्र संसार मांडील, असे कुणाला वाटलेही नव्हते. मात्र, आता हे प्रत्यक्षात उतरले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही युती फुटल्याची घोषणा शिवसेनेकडून नव्हे तर, भाजपकडून झाली आहे. हा घटस्फोट होण्याची नेमकी कारणे कोणती, असा प्रश्‍न उपस्थित होतो. जागांचे वाटप हे वरकरणी कारण दिसत असले, तरीही त्याच्या मुळाशी अनेक कारणे आहेत. शिवसेना-भाजप ज्या काळी युती स्थापन झाली तो काळ आठवला तर त्याकाळी भाजप हा तसा नगण्य पक्ष होता आणि भाजप राज्यातील राजकारणात भटा-बामणांचा, व्यापार्‍यांचा पक्ष म्हणून ओळखला गेलेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यावर पूर्णपणे पगडा होता, त्यामुळे त्याच्या वाढीलाही अनेक मर्यादा होत्या. त्या तुलनेत मुंबई-ठाण्यात व नाशिकमध्ये चांगल्या तर्‍हेने पाय रोवलेल्या शिवसेनेचा विस्तार हा राज्यभर होऊ लागला होता. औरंगाबादमध्ये महानगरपालिका ताब्यात घेऊन शिवसेनेने कॉंग्रेसला चांगलाच दणकाही दिला होता. मात्र, शिवसेना ही मराठी माणसांच्या हितासाठी जन्माला आलेली असली तरीही हळूहळू त्यांनी हिंदुत्वाचा वेष धारण केल्यावर तिचा विस्तार वेगाने सुरु झाला होता. मात्र बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनेत जातीयवादाला स्थान दिले नव्हते. उलट, शिवसेना हा त्याकाळी एकमेव पक्ष होता, की जो उमेदवारांना तिकिटे कधीच जातीच्या आधारावर देत नव्हता. कॉंग्रेसमधील असंतुष्ट मराठा समाजातील तरुण तसेच अन्य बहुजन समाजातील अनेक घटक शिवसेनेकडे मोठ्या आशेने आले होते. यातून शिवसेना ही तळागाळात पोहोचण्यास व तिला बहुजनांचा चेहरा मिळण्यास मदत झाली. त्याकाळी मात्र भाजप अगदीच क्षीण होता आणि गोपीनाथ मुंडेंनी पक्षाचे रुप बदलून बहुजनांचा चेहरा दिला. १९९२ साली देशात जातीयवादी शक्तींनी उन्माद केला व बाबरी मशिद उद्ध्वस्त केली. यातून केंद्रात भाजपला सत्तेची लॉटरी लागली. राज्यातही युती सत्तेवर आली. त्यावेळी काय किंवा अगदी २००९ सालापर्यंत शिवसेना हा भाजपचा मोठा भाऊच होता. त्यांना नेहमीच जास्त जागा मिळत होत्या. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा सत्तेतील वाटाही जास्त होता. भाजप मात्र त्यावेळी शिवसेनेच्या ओझ्याखाली फरफटत पुढे जात होता. कारण, त्यांना त्यावेळी कल्पना होती की, आपण शिवसेनेच्या बळावरच आपली ताकद वाढवू शकतो. त्यावेळी बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी भाषेत त्यांची अगदी कमळाबाई अशी टेर उडवूनही भाजप मूग गिळून अपमान शांतपणे सहन करीत होता. कारण, बाळासाहेबांच्यापुढे बोलण्याची त्यांची हिंमतही नव्हती. तसेच प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेते युतीतील तणाव कधी वाढू नये व दोन्ही पक्षात समतोल राहावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील होते. युतीच्या स्थापनेच्या काळातील हे तिघेही नेते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत आणि युतीला एकसंघ ठेवणारे नेते आता अस्तित्वात नाहीत. युतीच्या दुसर्‍या पिढीतील नेते हे त्यात अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल. त्याच्या जोडीला आता केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता केंद्रात आल्यावर भाजपला आता आपल्याला शिवसेनेची गरज नाही, असेही वाटू लागले. केंद्रात ज्याप्रमाणे मोदींनी एकहाती सत्ता खेचून आणली तसा चमत्कार राज्यात घडवून आणू, असा फाजील आत्मविश्‍वास राज्यातील भाजप नेतृत्वात निर्माण झाला आणि यातून त्यांना शिवसेना ही आपल्या गळ्यातील धोंड आहे असे वाटू लागले. कारण एक बाब स्पष्ट होती की, शिवसेना मुख्यमंत्रीपदावरचा आपला दावा काही सोडणार नव्हते आणि केंद्रात सत्ता आल्यावर झिंग चढलेल्या भाजपच्या नेत्यांना राज्यात मुख्यमंत्रीपद आपल्याच ताब्यात असावे, अशी स्वप्ने पडू लागली होती. यातूनच शिवसेनेची साथ सोडावी, असा विचार भाजपच्या मनात रुंजी घालू लागला होता. अर्थात, एकेकाळी कठीण काळात आपल्याला शिवसेनेने दिलेली साथ भाजप विसरला आहे. केंद्रात जर भाजपची सत्ता आली नसती, तर भाजपने हा घटस्फोट घेण्याचे धारिष्ट्य दाखविले असते का, असा सवाल निर्माण होतो. त्यामुळे सत्तेच्या मोहातून व फाजील आत्मविश्‍वासातूनच हा घटस्फोट झाला आहे, असे म्हणावे लागेल. अर्थातच याचा फटका या दोन्ही पक्षांना बसणार आहे. अर्थात, युती तुटल्यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा मिळणार आहे. राज्यात काही नवीन समीकरणे मांडली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, ही समीकरणे निवडणुकांच्या अगोदर होतील किंवा नंतरही होतीलच. युती तुटल्यामुळे आता कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात खळबळ माजली व एवढे दिवस राष्ट्रवादीच्या जे मनात होते, ते त्यांनी आघाडी तोडून प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे लढेल, असे सांगितले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची ही आघाडी केवळ सत्तेच्या उपभोगासाठी झालेली होती. शरदरावांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरुन कॉँग्रेसला रामराम केला व आपली स्वतंत्र चूल बांधली. मात्र, दुसरीकडे सत्तेच्या मोहापोटी त्याच कॉंग्रेसबरोबर आघाडी केली. केंद्रातील दहा वर्षांची सत्ता व राज्यातील पंधरा वर्षांची सत्ता उपभोगली. आता केंद्रातील कॉंग्रेसचे सरकार कोसळल्यावर राष्ट्रवादी व त्यांचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कॉंग्रेसची ही गळ्यातली धोंड काढून टाकावीशी वाटू लागणे स्वाभाविकच होते. कारण, त्यांच्या आघाडीचा मूळ हेतू हा सत्ता हाच होता. आता जर सत्ताच राहिली नाही, तर कॉँग्रेसची साथ कशाला ठेवायची, असा विचार शरदरावांना शिवणे त्यांच्या राजकारणाशी सुसंगतच आहे. आता राज्यातही आघाडीची सत्ता पुन्हा येणार नाही, हे स्पष्ट दिसत असताना राष्ट्रवादीला ही आघाडी कायम टिकविणे शक्य नव्हते. त्यामुळे आता निवडणुकांनंतर जर कुणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर पुन्हा एकदा नवी राजकीय समीकरणे मांडली जातील. जुने दोस्त कायम राहणे कठीणच आहे, काही नवीन दोस्त निर्माण केले जातील आणि सत्तेची समीकरणे जुळविली जातील. यातून राष्ट्रवादी-भाजप यांचे सूत जमू शकते. यशातून शरदरावांना केंद्रातही सत्तेचा वाटा मिळू शकतो. राजकारणात कोणच अछूत नाही, असे शरद पवारांचे आवडते विधान यातून प्रत्यक्षात उतरु शकते. सत्तेची गणिते ही काही वेगळीच असतात. कालचे शत्रुत्व व आजची मैत्री कायमच टिकेल असे नाही.

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel