-->
संपादकीय पान शक्रवार दि. २६ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
मंगळयानाची मोहीम यशस्वी करणारी टीम कोण?
---------------------------------
इस्रोमधील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी परिश्रम आणि कौशल्यातून सव्वाशे कोटी भारतीयांच्या आयुष्यात हा आनंद क्षण आणला. अपयशाचे वारेही लागू न देता पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाची कक्षा भेदणारा जगातील पहिला देश, मंगळमोहीम यशस्वी करणारा आशियातील पहिला देश, अमेरिकी मोहिमेच्या तुलनेत केवळ एकषष्ठांश खर्चात उद्दिष्ट साध्य करणारा पहिला देश अशा अनेक बिरुदांची मोरपिसे भारतीय मुकुटात खोवली गेली. आशियातील अवकाश स्पर्धेत चीन, जपानला निर्णायक पिछाडीवर टाकणारे आणि अमेरिका, युरोपीय महासंघ, रशियाच्या पंक्तीत भारताला विराजमान करणारे हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत मोठे यश म्हणता येईल. हे यश भारतासाठी तर ऐतिहासिक आहेच; पण विज्ञान-तंत्रज्ञानातील मानवी प्रगतीतीलही महत्त्वाचा टप्पा आहे.  या यशाचे वाटेकरी असणारे आहेत तरी कोण, असा प्रश्‍न उपस्थित होईल. संपूर्ण भारतीय शास्त्रज्ञांच्या या टीमचे नेतृत्व होते इस्त्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्याकडे. त्यांच्या हाताखाली असलेली शास्त्रज्ञांची ही टीम पुढीलप्रमाणे- एम. अण्णादुरई : मार्स ऑर्बिटर मिशनचे प्रोग्रॅम डायरेक्टर, एस. रामकृष्णन : विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक, एस. के. शिवकुमार : इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक, पी. कुन्हाकृष्णन : पीएसएलव्हीचे प्रकल्प संचालक, चंद्रनाथन : लिक्विड प्रोपल्शन सिस्टिमचे संचालक, ए. एस. किरण कुमार : सॅटेलाईट ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक, एम. वाय. प्रसाद : सतीश धवन अवकाश केंद्राचे संचालक, एस. अरुणन : मार्स ऑर्बिटर मिशनचे प्रकल्प संचालक व यान तयार करण्याची कामगिरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, बी. जयकुमार : पीएसएलव्हीचे सहायक संचालक, एम. एस. पनीरसेल्वम :  श्रीहरीकोटामधील चीफ जनरल मॅनेजर (रेंज ऑपरेशन्स), व्ही. केशव राजू : मार्स ऑर्बिटर मिशनचे संचालक, व्ही. कोटेश्‍वर राव : इस्रोचे वैज्ञानिक सचिव.
दैन्य, दारिद्य्र, उपासमारी, निवारा-वीज-पाणी या मूलभूत गरजांपासून वंचितांची जगातील सर्वाधिक लोकसंख्या अशा सर्व आव्हानांवर मात करीत यशाला घातलेली ही अद्भूत गवसणी आहे. अण्वस्त्र चाचण्यांमुळे जगातील महाशक्तींकडून लादलेले अनेक निर्बंध आणि निधीची कमतरता हे खरेतर कच्चे दुवे ठरले असते. तथापि, शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमातून, विज्ञानाच्या साधनेतून देशी तंत्रज्ञान विकसित झाले. कमी खर्चात ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी केल्याने तंत्रज्ञानाची ही बाजारपेठ भारताला आर्थिक लाभ मिळवून देणारी तर ठरेलच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विज्ञान क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधन यांचा मेळ साधला, तर काय किमया घडून येऊ शकते, याची जाणीव आता सर्वदूर झिरपेल. या क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देताना आता राज्यकर्ते आणि नोकरशाहीचा हात सैलावेल. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर सरासरी पंधरा कोटी किलोमीटर, तर मंगळ सरासरी तेवीस कोटी किलोमीटरवर. दोन ग्रहांमधील हे आठ कोटी किलोमीटर अंतर कापण्यासाठी ब्रह्मांडाच्या पोकळीत साठ कोटी किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करावा लागतो. कारण सूर्याभोवती प्रदक्षिणेसाठी मंगळाला पृथ्वीपेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणजे ६८५ दिवस लागतात. अज्ञात वाटेवरील हा प्रवास प्रचंड आव्हानात्मक. इस्रोने ते आव्हान लीलया पेलल्याचा आनंद अवर्णनीय आहे. सूर्यमालेतील अन्य ग्रहांवर स्वारीसाठी आवश्यक अतिउच्च कोटीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून भारताने जगाला धक्का दिला आहे. अद्ययावत कॅमेरा, जीवसृष्टीची पाऊलखूण म्हणविल्या जाणार्‍या मिथेन वायूचे अस्तित्व टिपण्यासाठी सेन्सॉर अशा उपकरणांनी सज्ज मंगळयानाकडून या पुढे पृथ्वीवर येणारी माहिती आतापर्यंत न सुटलेल्या अनेक कोड्यांचा उलगडा करणारी असेल. मानवी विकासाच्या सगळ्याच क्षेत्रात पुढे जायचे असेल, तर एकमेकांना सहकार्य ही सगळ्याच देशांची गरज आहे. मंगळवारीतून भारतीय शास्त्रज्ञांनी एक नवा अध्याय जगापुढे मांडला आहे.
---------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel