-->
संपादकीय पान गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मंगळदिन
-----------------------------------
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोडलेले यान सुमारे ६५ हजार कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थिपित झाले आहे. पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. मंगळ हा आपल्याकडे अमंगळ समजला जातो. मंगळाच्या मुलींची लग्ने होणे अवघड होऊन बसते. मात्र याच मंगळावर यशस्वी स्वारी भारतीय अंतराळ संशोधकांनी केली आणि ते देखील अमावस्येच्या दिवशी. आपल्याकडे अमावास्याही अशूभ मानली जाते. मात्र शास्त्रज्ञांनी हे सर्व संकेत व परंपरा मोडीत काढून मंगळदिन साजरा केला. जगातील कोणत्याही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळावर यान पाठवण्यात यश मिळालेले नव्हते. अमेरिकेचे पहिले सहा प्रयत्न अपयशी ठरले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बेगळुरूच्या मार्स मिशन कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होते. मिशन यसस्वी होताच मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. गेल्या नऊ महिन्याच्या प्रदीर्घ प्रवासांत कठीण वाटणारे सर्व टप्पे सहज पार करून मंगळाच्या गुरुत्वबल परीघात दाखल झालेले भारतीय मंगळयान बुधवारी सकाळी मंगळाच्या कक्षेत स्थापित झाले. यानाने आता फोटो पाठविण्यासही सुरुवात केली आहे. २०१२च्या स्वातंत्र्यदिनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी भारताच्या मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर केवळ सव्वा वर्षाच्या काळात इस्रोने अहोरात्र मेहनत घेऊन आपली मंगळ मोहीम उड्डाणासाठी सज्ज केली होती. गेल्या वर्षी पाच नोव्हेंबरला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून इस्रोचे यान मंगळ ग्रहाकडे रवाना झाले होते. इस्रोचा हा पहिलाच असा उपग्रह आहे की जो सुमारे पाच कोटी ६० लाख किमी अंतर पार करत ३०० दिवसांत मंगळाच्या कक्षेत स्थिरावला आहे. हे यान मंगळ ग्रहाकडे कूच करत असताना त्याला पृथ्वीची कक्षा, हेलिओसेंट्रिक ट्रॅजेक्टरी व मंगळ ग्रहाची कक्षा अशा तीन टप्प्यांतून जावे लागले. चांद्रयान-१ च्या निमित्ताने इस्रोने पृथ्वीच्या कक्षेचे आव्हान पेलले होते. पण सध्याचे यान हेलिओसेंट्रिक ट्रॅजेक्टरीमध्ये गेल्यानंतर त्याला सुमारे १० महिन्यांचा काळ सूर्यासोबत काढावा लागला होता. ही कठीण परीक्षा होती. या परिक्षेतही आपले अंतराळ संशओधक यशस्वी ठरले आहेत. मंगळयानाचा हा सगळा वर्षभराचा प्रवास पृथ्वीवरून नियंत्रित करण्यात आला. या प्रवासादरम्यान यानाला लागणारे इंधन, या यानाचा इस्रोशी राहणारा दैनंदिन संपर्क, आपत्कालीन परिस्थितीत या यानावर केले जाणारे नियंत्रण ही सर्व आव्हाने इस्रोने पेलली व आता हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत आल्यास भारत हा मंगळ ग्रहावर आजपर्यंत यान पाठवलेल्या तीन देशांच्या पंक्तीत बसला. अंतराळ मोहिमांवरील अब्जावधी रुपयांचा खर्च पाहता इस्रोने केवळ ४५० कोटी रुपये खर्च करून स्वदेशी बनावटीचे हे यान तयार केले होते. योगायोग असा की, सोमवारीच अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे मावेन हे यानही मंगळाच्या कक्षेत पोहोचले आहे. मावेन मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागानजीकच्या वातावरणातील रेणूंचा अभ्यास करणार आहे. मंगळ ग्रहावर कार्बन डायऑक्साइडचे वातावरण असून हा थर अत्यंत पातळ आहे. त्यामुळे या ग्रहावर कोणे एकेकाळी पाणी असल्याचे शास्त्रज्ञांचे गृहीतक आहे. या गृहीतकावर संशोधन करण्यासाठी मावेन सज्ज झाले आहे. मंगळ ग्रहावर सौर वादळांचा, सूर्याचा परिणाम कसा होतो याचाही अभ्यास मावेन करणार आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाचे वातावरण उबदार व द्रवीभूत होते, पण आता ते तसे राहिलेले नाही. हे स्थित्यंतर नेमके कसे झाले याचा अभ्यास मावेन करणार आहे. भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरणार नाही. तर हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत फिरणार आहे. मंगळावर मिथेन वायूचे प्रमाण अधिक असल्याने या वायूचा अभ्यास आणि हा वायू मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागात किंवा जैविक प्रक्रियेतून निर्माण झाला आहे का, याचा शोध इस्रोकडून घेतला जाणार आहे. मंगळ ग्रहाला दिमोस आणि फोबोस असे दोन चंद्र असून इस्रोचे मंगळयान फोबोस या चंद्राच्या जवळ असणार आहे. या वास्तव्यात ते फोबोसचा अभ्यास करणार आहे. इस्रोच्या मंगळयानाला अवकाश संशोधनाची आणखी एक संधी या निमित्ताने मिळाली आहे. पुढील महिन्यात मंगळ ग्रहापासून सुमारे ५० हजार किमी अंतरावरून एक धूमकेतू मार्गक्रमण करणार आहे. या प्रवासात हा धूमकेतू मंगळ ग्रहाच्या वरच्या वातावरणात प्रचंड प्रमाणात धूलिकण सोडेल. या कणांमुळे तापमान वाढणार असून त्याचे पृथक्करण करण्याची संधी मंगळयानाला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या एकंदरीत घडामोडींवर देखरेख ठेवण्यापासून माहितीचे आदानप्रदान करण्यापर्यंत इस्रो आणि नासामध्ये पहिल्यांदाच असा समन्वय होत आहे. नासाचे अवकाश संशोधनातील सामर्थ्य वादातीत आहे. काही वर्षांपूर्वी क्युरिऑसिटी या नासाच्या बग्गीने मंगळावर पोहोचल्यानंतर या ग्रहाच्या पृष्ठभागाचे पृथक्करण करण्यास सुरुवात केली होती. अशा प्रकारे भारतीय अंतराळ संशोधकांनी या यानाच्या निमित्ताने जगात एक नवा इतिहास लिहिला आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे अपवित्र समजल्या गेलेल्या सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी हा इतिहास लिहिल्याने जनतेला एक वैज्ञानिक धडा घालून दिला आहे, हे सर्वात महत्वाचे ठरावे.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel