-->
संपादकीय पान बुधवार दि. २७ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मोदींबाबत भ्रमनिरास
------------------------------------------------
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांपूर्वी जे आपल्या बाजूने वातावरण तयार केले होते आणि लोकांच्या त्यांच्या विषयी ज्या अपेक्षा होत्या त्याबाबत आता पूर्णपणे ब्रमनिरास झाला आहे. देशव्यापी लाटेवर स्वार होत लोकसभा निवडणुकीत तमाम विरोधकांना पाणी पाजणार्‍या भाजपला बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जदयू, लालूप्रसाद यादव यांचा राजद आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीने सेंद्रातील सत्तधारी भाजपाला आता जमिनीवर आणले आहे. बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि पंजाब या चार राज्यांतील विधानसभांच्या १८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला आठ जागांवर रोखून १० जागा जिंकताना विरोधी पक्षांनी मरगळ झटकली आहे. तर नितीश-लालू-कॉंग्रेस आघाडीपुढे बिहारमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधी दिलेला हा उत्तर भारतातील जनतेने दिलेला हा कल अतिशय बोलका ठरणार आहे. कॉँग्रेसचा यात विजय झाला यात आनंद करण्यासारखी काहीच बाब नसली तरीही मोदी यांना लोकांनी केवळ तीन महिन्यात ओळखले हा मुद्दा महत्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ओसरत असल्याचा हा सलग दुसरा मोठा संकेत ठरला आहे. नुकतीच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणारे अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील निवडणुकांमध्ये भाजपला सलग दुसर्‍यांदा अपयश पाहावे लागले आहे. गेल्या महिन्यात उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठीच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला कॉंग्रेसकडून सपशेल पराभव पत्करावा लागला होता. बिहारमध्ये जदयू- राजद- कॉंग्रेस आघाडीने ६ जागा जिंकून मोदींची जादू संपत चालल्याची भाजपला जाणीव करून दिली. भाजपचे दिग्गज राजीवप्रताप रुडी यांच्या छपरा आणि शाहनवाझ हुसैन यांच्या भागलपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला. जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड येथे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमातील मोदी समर्थकांच्या आचरणाचाही या निकालांवर परिणाम झाल्याचे कॉंग्रेसचे मत आहे. मोदी सरकारच्या गेल्या शंभर दिवसांच्या कारकीर्दीत जनतेला जे अपेक्षित होते, ते चांगले दिवस येण्याची चाहूलही अद्याप लागलेली नाही. आर्थिक घोटाळे घडणे हे यूपीए सरकारचे व्यवच्छेदक लक्षण झाले होते. मोदी सरकारमधील मंत्र्यांपैकी कोणी काही घोटाळा केला आहे का, हे अद्याप तरी उजेडात आलेले नाही. हा एक मुद्दा सोडला तर वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंची होणारी टंचाई, त्यात भरीला विविध राज्यांत झालेल्या जातीय दंगली या घटना यूपीएच्या कारकीर्दीप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारच्या कालावधीतही घडत आहेत. त्यामुळे यूपीए व एनडीए सरकारमध्ये खरेच काही फरक आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात उभा राहिला आहे. लोकसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेमुळे एनडीएला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपला विजयाचा उन्माद चढला होता. या अवस्थेतून भाजपला जमिनीवर आणण्याचे काम बिहार, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यांत पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालांनी केले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यावर महिन्याच्या आतच रेल्वेची भाडेवाढ करुन लोकांना पहिला दणका दिला होता. त्यानंतर स्वैयंपाकाचा गॅस, पेट्रोल महागले होते. कांदशा, बटाटा, मिरच्यांच्या किंमतींनी एक नवा उचांक गाठला. त्यातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. आता याचेच पडसाद बिहार व कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत उमटले आहेत. विधानसभा निवडणुकांत स्थानिक उमेदवार व स्थानिक प्रश्न हेच अधिक प्रभावी ठरतात, हेही या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालेे. लोकसभा निवडणुकांत बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले होते. त्या वेळी सपाटून मार खाल्लेल्या व एरवी विळ्याभोपळ्याचे सख्य असलेल्या राजद, जनता दल (युनायटेड), कॉंग्रेस या पक्षांनी बिहारमध्ये विधानसभा पोटनिवडणुकांत मात्र राजकीय शहाणपणा दाखवला. भाजपशी पूर्वी राजकीय हातमिळवणी करणारे बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांना कालांतराने धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्याची उबळ येऊन ते भाजपपासून लांब गेले होते. दुसर्‍या बाजूस लालूप्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून राजकीय अपयशाच्या गर्तेत सापडले होते. त्यामुळे या दोघांनाही बिहारमध्ये आपले अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी परस्परांशी या पोटनिवडणुकांत आघाडी करावी लागली. लालू, नितीश यांच्याबरोबर जाण्याशिवाय कॉंग्रेससमोरही अन्य पर्याय नव्हता. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये २८ जागांपैकी फक्त आठच जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील बेल्लारी येथील विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने मिळवलेला विजय त्या पक्षासाठी आश्वासक म्हटला पाहिजे. बेल्लारी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता. तेथील वादग्रस्त आमदार बी. एस. श्रीरामुलू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता व लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडूनही आले होते. त्यामुळे रिकाम्या झालेल्या बेल्लारी  विधानसभा जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून येईल, असे सगळेच जण गृहीत धरून चालले होते. पण तेथे कॉंग्रेसने विजय मिळवून भाजपला धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभेच्या तीन जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकांत दोन जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. हे सारे पाहता महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर या चार राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही मोदी लाटेमुळे आपलाच विजय होणार असल्याच्या भ्रमात भाजप व त्यांचे मित्रपक्ष राहिले तर तोंडावर आपटण्याची पाळी त्यांच्यावर येऊ शकते. नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेऊन सत्ता काबीज केली खरी परंतु जनतेला खोटी आश्‍वासने दिल्याने त्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या होत्या. जनतेने त्यावर विश्‍वास ठेवल्याने लोकांचा आता पुरता भ्रमनिरास झाला आहे. मोदींनी ज्या सोशल मिडियाचा आधार घेऊन कॉँग्रेस विरोधी कॅम्पेन केले त्याच सोशल मिडियात आता मोदींची आता टर उडविली जात आहे. मोदींविषयी भ्रमनिरास झाल्यानेच हे घडले आहे.
-------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel