-->
संपादकीय पान बुधवार दि. २७ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
अनंतमूर्तींची अखेर आणि मोदी समर्थकांचा कद्रूपणा
------------------------------------------------
कन्नड साहित्यातील एक हिरा म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते यू. आर. अनंतमूर्ती हे अनंतात निविन झाले आहेत. एक पुरोगामी व्यक्तीमत्व, साहित्यिक असलेल्या अनंतमूर्ती यांनी नरेंद्र मोदींच्या राजकारणाला कडवा विरोध दर्शविला होता. त्यातूनच ते म्हणाले होते की, मोदी पंतप्रधान झाल्यास मी देश सोडून जाईन. अर्थातच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि अनंतमूर्ती यांनी लोकांच्या कौलाचा आदर केला. अर्थात ते काही देश सोडून जाणार नव्हते. मात्र त्यावेळी अनंतमूर्ती यांच्या विरोधात भाजपाने मोठे काहूर माजविले. त्यांना देश सोडून जाण्यासाठी तिकिटे पाठविली. भाजपाला जी सत्ता आली त्याचा उन्माद त्यातून दिसला होता. त्याहून कहर म्हणजे अनंतमूर्ती यांच्या निधनानंतर काही भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे वाटले व फटाके वाजविले. यातून नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांचा कद्रूपणा दिसला. यातून अनंतमूर्ती यांच्या साहित्यिक कार्याची महानता पटली व भाजपाच्या संकुचित मनोवृत्तीचे दर्शन देशाला झाले. साहित्याचे प्रयोजन समाज बदलण्याचे असते आणि ते साध्य करायचे असेल तर स्वतः कठोर भूमिका घ्यावी लागते, हे कृतीतून सिद्ध करणार्‍या यू. आर. अनंतमूर्ती यांच्या निधनाने भारतीय साहित्य आणि विचारक्षेत्राची तसेच कन्नड साहित्याची प्रचंड मोठी हानी झाली. कर्नाटकातील के. शिवराम कारंथ, अय्यंगार, बेंद्रे, के. व्ही. पुटप्पा, डॉ. गोकाक आदींनी आपले साहित्य आणि संस्कृती अटकेपार नेली. आठ जणांनी ज्ञानपीठ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळवला. त्यात एक अनंतमूर्ती होते. साहित्य, कला, विचार आणि परिवर्तनासाठीच्या लढायांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. राजकारणात थेट उतरून भूमिका घेण्याची कन्नड साहित्यिकांना मोठी परंपरा आहे. अनंतमूर्ती यांना गुरूसारख्या असणार्‍या कारंथ यांनी तर लोकसभा निवडणूक लढवली होती. अनंतमूर्तींनाही ती इच्छा होती. त्यांचे राजकारण सत्तेसाठी नव्हते; तर परिवर्तनाच्या प्रयत्नांसाठी होते. कर्नाटकात दलित साहित्याचा प्रारंभ होण्यापूर्वी कारंथ आणि अनंतमूर्तींसारखी मंडळी दलितांच्या बाजूने लढत, लिहीत होती. व्यवस्थेने केलेले प्रहार झेलत होती. अनंतमूर्तींच्या ज्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, ती कादंबरी विद्रोहाने, बंडाने आणि प्रतिकाराने भरलेली आहे. संस्कार चिरकालीन नसतात, बर्‍याच वेळेला ते पायातील बेड्याही ठरतात आणि विषमतेचे समर्थकही ठरतात. संस्कार अनित्य असतात, असे सांगत अनंतमूर्तींनी प्रस्थापितांना आव्हान दिले. या कादंबरीने साहित्य क्षेत्र तर गाजवलेच, शिवाय पुरोगामी चळवळींना बळही दिले. मानवी जीवन आणि संस्कृतीत चिरकाल टिकणारी काही मूल्ये असतात आणि काही अल्पकाळासाठी जन्माला येऊन वाहत जाणारीही असतात. अनंतमूर्ती चिरकाल मूल्यांच्या बाजूने उभे राहिले. आधुनिकतेला त्यांनी विरोध केला नाही; पण आधुनिकतेच्या प्रवाहात चांगलेही टाकून सोडणे बरोबर नाही, असे त्यांचे म्हणणे होते. जागतिकीकरणाच्या किंवा आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत आम्ही आमच्या भाषा आणि संस्कृती ज्या गतीने विसरत आहोत, ते पाहता एक दिवस आपले लोक आपली मुळे गमावून बसतील आणि दुसर्‍यांच्या मुळावर स्वतःचे रोप लावायला लागतील, असे अनंतमूर्ती यांनी ज्ञानपीठ पुरस्कार घेताना म्हटले होते. त्यांनी चांगल्या राजकारणाचा आग्रह धरला. उजव्या राजकारणाला शेवटच्या श्‍वासापर्यंत विरोधच विरोध केला. लोकशाहीतील संस्था आणि राजकारण यांनी कोणती भूमिका घ्यायला पाहिजे, यासाठी ते आग्रही राहिले. त्यांचे साहित्य वास्तवाचा क्ष किरण घेणारे जसे होते, तसे डोळ्यांत कला साठवणारेही होते. साहित्यिक आणि समाजपरिवर्तनाच्या लढाया यांच्यातील सांधा आज खूप मोठ्या गतीने कोसळतो आहे. प्रतिगामी आक्रमक होत आहेत. विकासाच्या नावाखाली सत्तेपर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. अशा वेळी अनंतमूर्ती यांचे या जगातून निघून जाणे हा एक पुरोगामी चळवळींना धक्का आहे.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel