-->
संपादकीय पान मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अखेर बाप्पा पावले?
-------------------------------------------
गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची गजबज सुरू होत असतानाच रविवारी कोकण रेल्वेची वाहतूक दिवसभर ठप्प झाली. महाडजवळील करंजाडी रेल्वे स्थानकाजवळ एका मालगाडीचे आठ डबे रुळांवरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक जवळजवळ एक दिवस पूर्णपणे पूर्णपणे बंद झाली. अखेर ही वाहतूक सोमवारी अंशत: सुरु झाली. कोकण रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी युध्दपातळीवर प्रयत्न करुन रेल्वे तातडीने सुरु केली. त्यामुळे चाकरमन्यांचा गावी गणेशोत्सवाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थात मालगाडी घसरल्याने मोठे संकट टळले. अन्यथा मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती. ज्या वीर आणि करंजाडी या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला तेथे रेल्वेचे अखंड रूळ काही ठिकाणी तुटल्याचे दिसले. रेल्वेचे सात डबे एका ठिकाणी तर काही अंतरावर आठवा डबा रुळावरून घसरलेला आढळला. या घटनेनंतर या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे कोलमडणे स्वाभाविकच होते.  दादर पॅसेंजर रत्नागिरीतील भोके स्थानकात थांबवण्यात आली. तर मंगला एक्स्प्रेस, कोईमतूर-बिकानेर, केरळा संपर्क क्रांती, नेत्रावती, जनशताब्दी अशा अनेक लांब पल्ल्याच्या गाडया वेगवेगळ्या स्थानकांत रोखण्यात आल्या. रेल्वेगाडयांत अडकून पडलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या बस उपलब्ध करून दिल्या. महाड येथे वीर स्थानकात अडकून पडलेल्या ८८९ प्रवाशांना १९ बसेसच्या मदतीने खेड येथे पाठवण्यात आले. ८६ प्रवाशांना बसेसमधून चिपळूण येथे पाठवण्यात आले. पेण येथे अडकून पडलेल्या संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. प्रवाशांचा हा रोष आपण समजू शकतो. मात्र कोकण रेल्वेमार्गावर मालगाडी घसरल्याचे निमित्त होऊन बहुतांश गणपती विशेष गाडया रद्द करण्यात आल्या. या घटनेवरून धडा घेत किमान गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून या मार्गावरील मालगाडयांच्या वाहतुकीला कोकण रेल्वेने लाल कंदील दाखवायला हवा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. अर्थात ही मागणी रास्तच आहे. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने मालगाडयांची वाहतूक थांबवण्याची गरज नसून सर्व गाडया नियोजनानुसार चालवण्यास कोकण रेल्वे सक्षम असल्याचे सांगितले. त्यामुळे बहुदा या सर्व जादा गाड्या चालविल्या जातील अशी अपेक्षा आहे. मालगाडयांच्या वाहतुकीला गणेशोत्सवाच्या किमान दोन दिवस आधी कोकण रेल्वेमार्गावर बंदी करावी, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने केली आहे. गणेशोत्सव जवळ आल्यावर अशा प्रकारची घटना घडल्यास त्याचा फटका लाखो भाविकांना बसेल. मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी मालवाहतूक बंद ठेवली जाते. त्याच आधारे कोकण रेल्वेमार्गावर हा निर्णय घेण्यास काय हरकत आहे, असा प्रश्न प्रवासी सेवा संघाने विचारला आहे. जर गणपतीच्या काळात या मार्गावर असलेली प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेने मालवाहतूक बंद करुन त्या जागी केवळ प्रवासी वाहतूकच सुरु ठेवल्यास जास्तीत जास्त लोक कोकण रेल्वेचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे रस्त्यावरील भार कमी होऊ शकतो व गणेशभक्तांचा प्रवास सु़खकर होईल. अर्थात त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भरही पडणार आहेच. त्यामुळे कोकण रेल्वेही याचा फायदा होणार आहे. एकीकडे रस्त्यावरील खड्याच्या मार्गातून मार्ग काढत सध्या चाकरमन्यांना आपले गाव गाठावे लागत आहे. तर दुसरीकडे कोकण रेल्वेची कोकणाला नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळत असल्याने कोकणी माणसावर अन्याय होत आला आहे. कोकण रेल्वे ही कोकणी लोकांसाठी नसून त्यामार्गावरुन पुढे दक्षिणेतील लोकांची सोय व्हावी यासाठी ही रेल्वे आहे अशी समजूत खरी ठरावी असे एकूण वेळापत्रक आखले जाते. चाकरमन्यांवरचा हा अन्याय दूर व्हावा यासाठी आपण गणपती बाप्पालाच साकडे घातले पाहिजे. एकीकडे रस्त्यावरील खड्डे दुसरीकडे कोकण रेल्वेची दुजाभावाची वागणूक या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग चारपदरी करण्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करुन अशी घोषणा केली आहेे. हे जर प्रत्यक्षात आल्यास कोकणी जनता त्यांना दुवा देईलच. नितीन गडकरी हे कार्यक्षम मंत्री म्हणून यापूर्वीच्या युतीच्या राज्यातील मंत्रिमंडळात ओळखले गेले होते. त्यांच्या यापूर्वीच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे महामार्गाची उभारणी व मुंबईतील ५६ उड्डाणपूल उभारण्यात आले होते. त्यामुळे नितीन गडकरी यांनी मनात आणले तर ते बरेच काही करु शकतील. अर्थात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हे भूमीपुजन झालेले असल्याने हा निवडणूक स्टंट वाटावा. परंतु हे खरे ठरु नये आणि नितीन गडकरी यांचा मुंबई-गोवा महामार्ग चार पदरी मार्ग दोन वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प खरा ठरो, अशी आपण गणपती बाप्पाकडे मागणी करुया. त्याचबरोबर गडकरी यांनी कोकणातील सध्याची बंदरे कोकण रेल्वेशी जोडण्याचा संकल्प सोडला आहे. हे जर प्रत्यक्षात उतरले तर कोकणाचा कायापालट होण्यास मदत होईल. त्यामुळे कोकणातील उद्योग वाढील लागतील. रायगडचे खासदार अनंत गिते यांनी कोकणात सार्वजनिक क्षेत्रातील चार नवीन प्रकल्प आणण्याची व येथील रोजगार निर्मितीला हातभार लावण्याची घोषणा केली आहे. हे देखील प्रत्यक्षात उतरले तर कोकणाचा चेहरा पार बदलून जाईल यात काहीच शंका नाही. मात्र या सर्व घोषणांमध्ये विद्यमान प्रकल्पांचे काय होणार प्रामुख्याने जैतापूरचा प्रकल्प मार्गी लागणार की रद्द होणार या विषयी कोणीही ब्र उच्चारलेला नाही. असो, एकूणच कोकणाकडे सत्ताधार्‍यांनी जे लक्ष देण्याचे ठरविले आहे ते पाहता गणपती बाप्पा आपल्यावर उशीरा का होईना पावले आहेत असेच दिसते.
--------------------------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel