-->
संपादकीय पान मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
महात्मा गांधींना जगात पोहोचविणारा दिग्दर्शक
---------------------------------------
महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात जी महत्वाची कामगिरी केली होती त्याचा कोणत्याही प्रकारे विपर्यास न करता जगात पोहोचविणारे ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक रिचर्ड सॅम्युयल ऍटेनबरो यांचे रविवारी लंडन येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. गेले काही वर्षे ते फारसे वयोमानानुसार प्रकाशझोतात नव्हते. रिचर्ड ऍटेनबरोे यांचा मुलगा मायकल याने बीबीसीला त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. गेल्या सहा दशकापांसून चित्रपट क्षेत्रात असलेल्या रिचर्ड यांनी गांधी या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीयांच्या मनात घर केले होते. रिचर्ड हे हॉलीवूडमधील यशस्वी दिग्दर्शक तर होतेच पण त्याचसोबत ते उत्कृष्ट अभिनेताही होते. आपल्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ब्रायटन रॉक, द ग्रेट एस्केप, जुरासिक पार्क या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. महात्मा गांधींच्या जीवनावरील चित्रपटाने त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. गांधी या १९८२ साली आलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून ते भारतीयांच्या विशेष लक्षात राहतील. या चित्रपटाच बेन किंग्जले यांनी महात्मा गांधींची तर रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबा गांधींची भूमिका केली होती. या चित्रपटाला तब्बल आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. रिचर्ड यांनी १९४२ मध्ये अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. १९४७ मध्ये आलेल्या ब्रायटन रॉक या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या पिंकी ब्राऊनच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. १९६९ मध्ये ओह! व्हॉट अ लव्हली वॉर या चित्रपटापासून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. गांधी हा त्यांचा पाचवा चित्रपट होता. क्लोजिंग द रिंग हा २००७ मध्ये आलेला त्यांचा शेवटचा चित्रपट होता. मात्र त्यानंतर त्यांनी चित्रपट निर्मिती केली नाही. अर्थात त्यांच्यातल्या उत्कृष्ट दिग्दर्शक दिसला तो गांधी या चित्रपटात. यातून त्यांनी गांधीना जगात पोहोचविले तसेच त्यांच्यातल्या एका उत्कृष्ट दिग्दर्शकाची जगाला ओळख झाली. १९८२ साली हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. जगाने या चित्रपटाचे स्वागत केले. रिचर्ड ऍटेनबरो हे जन्माने ब्रिटीश असल्याने गांधी या चित्रपटाला योग्य न्याय देणार नाहीत असे त्यावेळी बोलले गेले होते. परंतु अनेकांचा हा दावा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर खोडून निघाला. कारण त्यांनी गांधी या व्यक्तिमत्वाला भरपूर न्याय दिला होता. तत्यासाटी त्यांनी तब्बल २० वर्षे अभ्यास केला. एवढा अभ्यास करुन चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक आताच्या जगात शोधून सापडणार नाहीत. महात्मा गांधींसारख्या व्यक्तिमत्वावर चित्रपट तयार करणे ही काही सोपी बाब नव्हती. त्यात ते जन्माने ब्रिटीश असल्याने त्यांच्यावर शंका घेणारे जगात होते. परंतु त्यांनी गांधींच्या जीवनातील पैलू इतिहासाला न्याय देत पडद्यावर दाखविले. खरे तर ८०च्या दशकात चित्रपटातील तंत्रज्ञानही फारसे विकसीत झालेले नव्हते. रंगीत चित्रपटांचा जमाना होता परंतु सध्या ज्या प्रकारे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे त्या तुलनेत त्याकाळी काहीच तंत्रज्ञान नव्हते. असे असतानाही त्यांनी एक उत्कृष्ट चित्रपट तयार केला. भारतीय स्वातंत्रलढ्याला तसेच महात्मा गांधींच्या व्यक्तीमत्वाला न्याय दिला. ज्या ब्रिटीशांच्या विरोधात हा लढा झाला त्यातीलच एका माणसाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला न्याय द्यावा हे एक मोठे ऐतिहासिक असेच काम होते. रिचर्ड ऍटेनबरो यांनी ते अजरामर असे काम केले. गांधी हा अजरामर चित्रपट तयार केला. यातून गांधीवादाचे तत्वज्ञान जगात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. अशा या भारताशी मैत्रीचे नाते सांगणार्‍या महान दिग्दर्शकाला आमचा अखेरचा निरोप.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel