-->
संपादकीय पान बुधवार दि. २० ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
पुरोगामी महाराष्ट्राचे काळे वर्ष
----------------------------------
पुरोगामी महाराष्ट्राने स्वत:चे तोंड काळे करावे, अशी क्रूर घटना २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात भरदिवसा घडली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला आज बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. दुदैवाची बाब म्हणजे डॉ. दाभोलकर यांचे हत्यारे अजूनही पोलिसांना पकडता आलेले नाहीत. गृहमंत्री याबाबत नेहमीच टाळवाटाळवीचे उत्तर देत आले आहेत. थोडक्यात म्हणजे एक वर्ष या घटनेला ओलांडले असले तरीही याचे हत्यारे न सापडणे ही बाब राज्याच्या पुरोगामी इतिहासातील एक काळी घटनाच म्हटली पाहिजे. मध्यंतरी पोलिसांनी या हत्यार्‍यांचा शोध घेण्यासाठी प्लँचेट करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. एक प्रकारे ज्यांनी आपले आयुष्य अंधश्रध्देच्या विरोधात वेचले त्यांच्या खुन्याना पकडण्यासाठी अंधश्रद्धेचाच आधार घ्यावा याहून या महाराष्ट्राचे दुदैव ते काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व हे समाजकेंद्री होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे असोत वा कार्यकर्ते; ही सारी माणसे डॉक्टरांशी समाजकेंद्री दृष्टिकोनातून जोडलेली होती. त्यांनी स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दहा दिवसांपूर्वीच २५ वर्षे पूर्ण झाली. गेली २५ वर्षे ते महाराष्ट्र अंनिस, साधना व अन्य परिवर्तनाच्या चळवळीत ते गुंफले गेले होते. गेल्या काही वर्षांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्र अंनिस व साधनामध्ये कामे पुढे नेऊ शकणारी सक्षम दुसरी फळी निर्माण केली होती. सध्या समाजातील वातावरण कलुषित झालेले आहे. धर्माच्या नावावर जातीय शक्ती अधिकाधिक संघटित होताना दिसत आहेत, तर दुसर्‍या बाजूला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून असलेले सत्ताधारी शासक धर्मांध शक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास कचरत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली २५ वर्षे महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून अथकपणे प्रयत्न केले. शेवटी त्यांच्या हत्येच्या दबावाखाली सरकराला हा कायदा लोकलाजेस्तव करणे बाग पडले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला खरा पण त्यासाठी डॉ. दाभोलकरांना आपला जीव गमवावा लागला, हे वास्तव इतिहासात आता लिहले जाणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या चळवळींमध्ये जी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना रुजविली, त्यामुळेच पुढच्या फळीचे कार्यकर्ते तयार झाले व त्यांच्याच बळावर महाराष्ट्र अंनिससह इतर संस्था भविष्यातील वाटचाल करीत आहेत. महाराष्ट्रातील चळवळींच्या इतिहासातील ही वेगळी घटना असून त्याच्याकडे सामाजिक विश्लेषकांनी जितके लक्ष द्यावे तितके दिलेले दिसत नाही. सामाजिक चळवळी यशस्वी होण्याच्या दृष्टीने सभोवताली तसा व्यापक राजकीय अवकाश असणेही आवश्यक असते. पण सध्याची दुरवस्था ही आहे की, हा राजकीय अवकाश आक्रसत चालला आहे. चळवळींच्या दृष्टीने ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. १९७०-८०च्या कालखंडात सामाजिक चळवळींचे स्वरूप, त्याविषयीचे आकलन श्रेष्ठ दर्जाचे होते. चळवळींमध्ये झोकून काम करण्यासाठी मध्यमवर्गातून अनेक जण पुढे यायचे. आपली आयुष्यं त्यांनी या कार्याला वाहून घेतली होती. पण सध्या असे चित्र दिसत नाही. समाजातील मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग व अन्य घटकांची सामाजिक चळवळींविषयीची जाणीव कमी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सामाजिक चळवळी चालविताना अनेक अडचणी उभ्या राहतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा. महाराष्ट्र अंनिस ही महाराष्ट्रातल्या ३५ जिल्ह्यांत विस्तारलेली असून तिचे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळातून आलेले आहेत. डॉ. दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली काही जिल्ह्यांमध्ये अंनिसचे उत्तम नेतृत्व तयार झाले आहे. अंनिसचे काम हे केवळ बुवाबाबांची ढोंगे उघडकीस आणणे इतकेच नसून समाजाला विवेकवादाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणे, हा कामाचा आत्मा आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडून एक वर्ष पूर्ण होत आले तरी अजून आरोपी सापडू शकलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांची हत्या ही वैचारिक हत्या होती. एका सामाजिक कार्यकर्त्याचा विचार संपविण्यासाठी केले गेलेले हे कृत्य होते, हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील पोलिसांनी तपास करायला हवा होता; तसा तो झाला नाही. आता या हत्या प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे आहेत. मात्र सीबीआयदेखील विशेष लक्ष देऊन तपास करण्यापेक्षा अन्य गुन्ह्यांचा जसा तपास केला जातो त्याच पद्धतीने काम करताना दिसत आहे. त्याबद्दल समाजातून ज्या पद्धतीने तीव्र प्रतिक्रिया उमटायला पाहिजे, तशी ती आता दिसेनाशी झाली आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्र राज्यातले पुरोगामित्व संपल्याला आता वर्ष ओलांडले आहे. संपूर्ण देशाला मान खाली घालावयास लावणारी ही घटना झाल्यानंतर या सरकारला, तपास यंत्रणेला त्याचे कसेलीही सोयरेसुतक वाटत नाही ही खेदाची बाब आहे. दाभोसकरांची हत्या झाल्याने त्यांचा आता विचार संपला आहे अशी कुणाची जर समजूत असेल तर ती चुकीची ठरणार आहे. कारण दाभोलकरांच्या हत्येनंतर अंनिस झपाट्याने सावरली आहे व आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार संपूर्ण राज्यात जोमाने करीत आहे. त्यामुळे कुणाची हत्या करुन विचार संपत नसतात हे डॉ. दाभोलकरांचे म्हणणे या राज्यातील जनतेने खरे ठरवविले आहेत. डॉ. दाभोलकर यांना आपल्यातून जाऊन आज वर्ष लोटले असले तरी त्यांचे विचार जीवंत आहेत आणि त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन महाराष्ट्राला पुढे जायचे आहे. कृषीवल त्यात अग्रभागी असेलच. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आमचा सलाम!
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel