-->
संपादकीय पान सोमवार दि. १८ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
स्वच्छतेचे महत्व प्रत्येकाने पाळणे आवश्यक
----------------------------------------
आपला देश स्वच्छ करण्याचा संकल्प या देशातल्या १२५ कोटी लोकांनी उचलायला हवा असे आवाहन करत २०१९ या महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीच्या वर्षी संपूर्ण देश घाणमुक्त करण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. मोदींची ही घोषणा आपल्या देशातील लोकांच्या दृष्टीने महत्वाची ठरावी. अर्थात याची अंमलबजावणी करणे काही सोपे नाही. खरे तर सरकारी पातळीवर हे एक मोठे आव्हान ठरणार आहे, यात काही शंका नाही. या देशातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली, प्रत्येक मोहल्ला, प्रत्येक मंदीर, प्रत्येक शाळा, प्रत्येक हॉस्पिटल स्वच्छ असायला हवे असे आवाहन त्यांनी केले. आपल्या देशातल्या लाखो महिलांना आजही उघड्यावर शौचाला जायला लागते ही लज्जास्पद बाब असल्याचं सांगत मोठ्या प्रमाणावर शौचालयं उभारण्याचं आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे कंपन्यांना आवाहन करताना त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत शाळा शाळांमध्ये मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्याचे आवाहन केले. भारतात अशी स्वतंत्र शौचालये नसलेली एकही शाळा असता कामा नये अशी इच्छा मोदींनी व्यक्त केली. स्वच्छता हा राष्ट्रीय धोरणाचा भाग असायला हवा असं नमूद करताना मोदींनी प्रत्येकानं यात सहभागी व्हावं असं आवाहन केलं. मी घाण करणार नाही, अस्वच्छता करणार नाही असं सव्वाशे कोटी लोकांनी ठरवलं तर हा देश घाणमुक्त होईल असं सांगत लोकांच्या स्वयंसहभागाशिवाय हे शक्य नसल्याचंही सूचित केलं. स्वच्छता ही आपल्या नसानसात भिनावयास हवी. ज्याप्रामाणे विदेशात स्वच्छता बाळगली जाते ती आपल्या आंगवळणी पडण्याची गरज आहे. आपल्याकडे त्याचाच अभाव आहे. आपण सहजरित्या रस्त्यातून जाताना  पचकन थूंकतो. पानाचा तोबरा सहजरित्या रस्त्यात टाकून निघून जातो. यामुळे आपल्याकडील अस्वच्छता वाढते. अर्थात या गोष्टी आपणच टाळू शकतो. त्यासाठी सरकारला दोष देणे चुकीचे ठरेल. आपणच जर स्वच्छता ठेवली तर देश स्वच्छ राहाण्यास मदत होणार आहे. आपल्याकडे आवश्यक तेवढी स्वच्छतागृहे नाहीत ही बाब विसरता येणार नाही. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे ही देखील स्वच्छ नसतात. मुंबईतील महिलांचा एक पाहणी अहवाल घेण्यात आला होता. त्यात मुंबईतील नोकरी करणार्‍या महिलांना लघवीशी संबंधीत रोग झाल्याचे आढळले होते. यामागचे कारण म्हणजे या महिला योग्य स्वच्छतागृहे नसल्यामुळे लघवीस जाण्यास विलंब करतात आणि त्यामुळे त्यांना हे रोग होतात. आपल्या सारख्या देशाला ही बाब शरमेची म्हटली पाहिजे. दुदैवाची बाब म्हणजे आपल्याकडील नोकरशाहा व राजकारण्यांनी हा अहवाल वाचून फक्त फाईल बंद केला. त्यावर मुंबईत नव्याने स्वच्छतागृहे सुरु करण्यासाठी एखादी योजना आखली नाही. आज आपण प्रत्येकाच्या घरात शौचालये हवीत त्यासाठी प्रचार केला. ज्याच्याकडे ते नसेल त्याला निवडणुकीला उभे राहाण्यावर बंदीही घातली. परंतु ही शौचालये घरोघरी उभारण्यासाठी पंचवार्षिक योजना आखली का, हा सवाल आहे. आज अनेक गावाकडील घरांमध्ये अनेकांच्या घरात स्वच्छतालये असली तरी त्या घरातील लोक बाहेरच शौचालयाला जाणे पसंत करतात. अशा लोकांचे प्रबोधन करण्यासाठी मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यामुळे स्वच्छतेसाठी जसे शासकीय पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत तसेच स्वयंसेवी संघटना, कंपन्या यांनी एकत्रीत येऊन या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे. त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडील प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक स्वच्छता बाळगण्याचे व्रत आपल्या अंगी बाणले पाहिजे. कारण आपण स्वत:चे घर स्वच्छ ठेवतो मात्र बाहेर तो कचरा टाकतो. आपल्यातील ही प्रवृत्ती बदलली तरच आपण आपला देश स्वच्छ ठेवू शकतो. स्वच्छतेचे महत्व प्रत्येकाने अंगी बाळगणे महत्वाचे आहे.
--------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel