-->
संपादकीय पान शनिवार दि. १६ ऑगस्ट २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मोदींच्या भाषणात नवीन ते काय?
-------------------------------------
नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या वहिल्या लाल किल्यावरुन होणार्‍या भाषणाची उत्सुकता संपूर्ण देशाला लागून राहिली होती. मात्र नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरु यांच्या आजवरच्या भाषणाचा वेळेचा विक्रम मोडला असला तरीही मोदींच्या या भाषणाचा शेवटी विचार करता यातून काहीच गवसले नाही असेच म्हणावे लागेल. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाची परंपरा आपल्या देशात फार मोठी आहे. या दिवशीचे पंतप्रधांनाचे भाषण म्हणजे त्यांनी देशातील आम जनतेशी साधलेला संवाद तर असतोच शिवाय यातून सरकारच्या भविष्यातील ध्येयधोरणे प्रतिबिंबीत होत असल्याने या भाषणाला महत्व आहे. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान असल्याने तसेच बिगर कॉँग्रेसच्या संपूर्ण बहुमताने निवडून आलेल्या सरकारचे ते प्रतिनिधी असल्याने त्यांच्याकडून काही नवीन धोरणे अपेक्षित होती. परंतु यापूर्वीच्या कॉँग्रेस सरकारच्या धोरणाना काही तरी नवीन मुलामा लावून किंवा त्याला नवीन साज चढवून पुन्हा जनतेपुढे सादर केल्या आहेत. त्यामुळे हे सरकार फारसे काही करु शकणार नाही याची पक्की खात्री या भाषणाने जनतेला लाल किल्याच्या साक्षीने झाली आहे. नियोजन आयोग रद्द करुन त्याजागी वेगळी संस्था उभी केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात सांगितले. ही घोषणा म्हणजे यापूर्वी म्हटल्याप्रमाणे पूर्वीच्या योजनानंना नवीन मुलामा लावण्याचा प्रयत्न आहे. सरकारने एक तर हा आयोग रद्द तरी करावा व आम्हाला नियोजनबध्द विकास नको असे जाहीर करावे किंवा सध्याची स्थीती चालू ठेवावी. परंतु कोणताही ठोस निर्णय घेण्यास सरकार तयार नाही. नियोजन आयोग जर गेल्या ६७ वर्षात अपयशी ठरले असले तर ते रद्द करावे. मोदींनी आयोगाविषयी मोघम भाषा वापरु नये. मोदी सत्तेत य्ेऊन साठ दिवस लोटले तरीही अजून ते यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांचे चुकले हेच सांगण्यात धन्यता मानतात. यापूर्वीचे सत्ताधारी अपयशी ठरले त्यांनी लोकांचा अपेक्षा भंग केला म्हणूनच जनतेने तुम्हाला सत्तेत बसविले आहे हे आता मोदींनी लक्षात घ्यावे. आपल्याला पुढील पाच वर्षासाठी निवडून दिलेले असल्याने आपण या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने कोणते काम करणार आहोत त्याचा एक रोडमॅप भाजपाच्या सरकारने तयार करणे आवश्यक आहे. परंतु गेल्या साठ दिवसात त्यादृष्टीने कोणतीही पावले पडलेली नाहीत. भावनात्मक भाषणे करण्यासाठी आता निवडणुका नाहीत हे पंतप्रधानंानी लक्षात घेणे महत्वाचे आहे.  मोदी म्हणाले, की मी दिल्लीसाठी बाहेरचा आहे. मी जेव्हा येथे आलो तेव्हा सरकारमध्ये सरकार आणि त्यातही गटबाजी दिसून आली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. सरकारमधील एका विभागाचा दुसर्‍याशी समन्वय नव्हता. भांडणे एवढी विकोपाला गेली होती, की एक विभाग दुसर्‍याविरुद्ध न्यायालयात जाण्याच्या तयारीत होता. ही परिस्थिती बदलायला हवी. देशासाठी सर्वांनी मिळून काम करणारे आवश्यक आहे. चपराशीपासून तर कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत सगळे सामर्थ्यवान आहेत ही भावना मला रुजवायची आहे. यात देखील मोदींनी पूर्वीच्या सरकारवर दोषारोप करण्यात धन्यता मानली आहे. देशातील स्त्री-पुरुष प्रमाण असंतुलित आहे. हे देवाने नव्हे तर काही डॉक्टरांनी पैशांच्या लोभापायी केले आहे. आपण आपल्या मुली कोणत्याही परिस्थितीत वाचवायला हव्यात, यासाठी सरकार कोणते उपाय करणार आहे हे मात्र सांगण्यास मोदी विसरले आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यांच्यासाठी आम्हाला प्रधानमंत्री जन धन योजना आणायची आहे. अशा प्रकारे सरकार आणखी एक योजना आणेल. खरे तर सध्याची ही परिस्थिती का ओढावली त्याच अभ्यास सरकराने केला आहे का, हा प्रश्‍न आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला उत्पादन क्षेत्रावर भर द्यावा लागेल हे मोदींचे म्हणणे काही चुकीचे नाही. परंतु रोजगार निर्मातीसाठी मोठे प्रकल्प उभारले जाण्याची गरज आहे. त्यासाठी हे सरकार काय करणार आहे. पूर्वी विरोधात असताना ज्या प्रकल्पांना भाजपाने विरोध दर्शविला होता त्याचे काय होणार, याचे उत्तर आता जनतेला पाहिजे आहे. भारत आता डिजिटल इंडिया झाला आहे. इंटरनेट केवळ श्रीमंतांसाठीचे राहिले नाही. इंटरनेटचा वापर आता ग्रामिण भागात शिक्षणाच्या सोई उपलब्ध करुन देण्यासाठी झाला पाहिजे या पंतप्रधानांच्या मताशी सर्वच जण सहमत आहेत. परंतु इंटरनेट गावात पोहोचविण्यासाठी आपल्याकडे वीज आहे का, अनेक विजेचे प्रकल्प खोळंबले आहेत त्याला गती द्यायला सरकार काय करणार? पर्यटनाने अनेक देशांच्या अर्थव्यवस्था वेगाने धावत आहेत. आपल्याकडे पर्यटनाला एवढा वाव असतानाही आपण दुर्लक्ष करतो, या मोदींच्या मुद्याशी कुणीही सहमत होईल. पंतप्रधानांच्या नात्याने मला पहिले स्वच्छता अभियान हाती घ्यायचे आहे अशी घोषणा करणे योग्य आहे परंतु त्याची अंमलबजावणी करणे किती अवघड आहे याची कल्पना मोदींना नाही का, असा प्रश्‍न पडतो. महिलांना शौचालयासाठी घराबाहेर जावे लागते ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. लाल किल्ल्यावरून याचा उल्लेख करणेही देशासाठी अपमानास्पद आहे. मी लाल किल्ल्यावरून भाषण करताना याचा उल्लेख केला यावरही टीका होऊ शकते. पण मी गरीब कुटुंबातील आहे. मी गरीबांविषयीच बोलणार असे भावनात्मक बोलणे म्हणजे लोकांची मने जिकणे नव्हे हे मोदींनी आता लक्षात घ्यावे. आता सरकारकडून प्रत्यक्ष कामांची अपेक्षा जनता करीत आहे. त्यासाठी नियोजबध्द कार्यक्रम आखण्याची गरज आहे. हा कार्यक्रम काय असेल याची आखणी जर आज पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन जाहीर केली असती तर लोकांना त्यांचे भाषणा भावले असते. परंतु असे काहीच न झाल्याने लोकांच्या पदरी निराशाच पडली आहे.
-----------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel