-->
संपादकीय पान गुरुवार दि. ३१ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
श्रावणात घन निळा...
------------------------------------
आषाढात कमी झालेला पाऊस श्रावणात जोरदारपणे बरसणार असल्याचा शुभअंदाज केंद्रीय हवामान खात्याने वर्तवला आहे आणि हा अंदाज खरा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसात ज्या गतीने पावसाने मुसंडी मारली आहे ते पाहता श्रावणात पाऊस चांगलाच पडणार आहे. दुबार पेरणीचे संकट, धरणांतील रोडावलेला पाणीसाठा भरून काढण्यासाठी संपूर्ण देशाचे डोळे ऑगस्टमधील पावसाकडे लागले आहेत. त्यामुळे सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाल्यास देशावर घोंघावणारे दुष्काळाचे संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमीच असेल असा अंदाज हवामानखात्याने वर्तविला होता. त्यातच अल् निओचा धोका व्यक्त केल्याने चिंता व्यक्त होत होती. मात्र आता ही चिंता बहुतांशी दूर झाली आहे. जूनमध्ये सुरुवातीला पाऊस पडला परंतु पुढे मात्र ही गती कायम राखण्यात यश आले नाही. मात्र त्यानंतर झालेल्या मान्सूनने जुलैच्या मध्यानंतर देशभर जोर पकडला. त्यामुळे जुलैमध्ये पावसाने ९३ टक्के सरासरी गाठली. तसे पाहता जवळजवळ दीड महिना पावसाने दडी मारल्याने बळीराजापासून सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले होते. उत्तर भारतात जुलैपासून पावसाने जोर पकडला असून सुपीक प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंजाब, हरयाणा तसेच उत्तर प्रदेशातही पावसानेे चांगले बस्तान बसवले आहे. पेरणीचा हंगाम लांबला असला तरी, जुलै मध्यापासून पावसाच्या संततधारेने देशभर पेरणीने वेग घेतला आहे. तेच चित्र थोड्याबहुत प्रमाणात महाराष्ट्रातही होते. पेरणीचा हंगाम लांबल्याने पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण होते. त्यातुलनेत कोकणात समाधानकारक पाऊस होता. मध्य महाराष्ट्रातही यंदा पावसाची सरासरी कमीच राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मराठवाडा व विदर्भातील परिस्थिती मात्र समाधानकारक नाही. तेथे गेल्या पंधरवड्यात पाऊस चांगला पडला. मात्र त्यानंतर त्याने जी दडी मारली ती अजून. ऑगस्टमध्ये ९६ टक्क्यांंपर्यंत सरासरीएवढा पाऊस होणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी क्षेत्रासाठी खूषखबर ठरली. गेल्या काही दिवसात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता सध्या कमी झाली असून ते आता मोसमी पावसाच्या कमी दाबाच्या पट्‌ट्यात विलीन झाले आहे. समुद्रसपाटीपासून कर्नाटक ते केरळच्या किनार्‍यालगत कमी तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा आहे. कोकण आणि गोव्यात बर्‍याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यातून मोठा दिलासा लाभेल. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण राज्यावर ढगांची दाटी झाली आहे. बंगालचा उपसागर आणि परिसरावर असलेली कमी दाबाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्रालगत समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत, तर उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल स्थिती आहे. नैर्ऋत्य मोसमी वार्‍याचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अनुपगडपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर कायम आहे. ईशान्य राजस्थानवर असलेली चक्राकार वार्‍यांची स्थिती आता पंजाब आणि आजूबाजूच्या क्षेत्रावर समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर आहे. ओडिशा, तेलंगण, सीमांध्र, गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर पूर्व राजस्थान, आसाम, मेघालय, पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, कर्नाटक राज्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोव्यात अति जोरदार, तर पूर्व राजस्थान, आसाम, ओडिशा, कर्नाटक किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र, पश्‍चिम किनार्‍यावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे पावसाला सुरवात झाली आहे. कोकण, घाटमाथ्यावर बर्‍याच ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मात्र तो पुरेसा नाही. मराठवाड्यातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत आहे, तर समुद्रसपाटीवर उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटकदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. कोकणातील पालघर, घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे सर्वाधिक १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील बेलापूर, पनवेल, खालापूर, माथेरान, कर्जत, सांताक्रूझ, पेण, तलासरी, भिरा, डहाणू, हर्णे, वसई, दापोली, जव्हार, वाडा, माणगाव, उल्हासनगर, घाटमाथ्यावरील शिरगाव, लोणावळा, दावडी, डुंगरवाडी, नवजा, आंबोणे, खोपोलीसह बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्‍वर, विदर्भातील चिखलदरा, वरूड या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे यावेळी पावसाळा उशीरा सुरु झाला असला तरी श्रावणात त्याने सर्वांना सुखावले आहे. यावेळी विदर्भ व मराठवाडा वगळता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस आहे. विदर्भ व मराठवाड्यातही पुढील आठवड्यात चांगला पाऊस पडल्यास संपूर्ण राज्य ओलेचिंब होईल व पुढील वर्षाची चिंता संपेल.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel