-->
संपादकीय पान शनिवार दि. २२ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
पितामहांचा आशिर्वाद
----------------------------
आपल्याकडे कोणत्याही चांगल्या कामाला जाण्यापूर्वी ज्येष्ठांचे आशिर्वाद घेण्याची पध्दत आहे. त्यानुसार शेकापचे रायगडमधील उमेदवार रमेश जगताप व मावळचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना माजी मुख्यमंत्री, कोकणचे भाग्यविधाते बॅ. अ.र.अंतुले यांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी आशिर्वाद दिले आहेत. ही घटना रायगडच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरणार आहे. अर्थातच मनसेने पाठिंबा दिल्यानंतर शेकापच्या या दोन्ही उमेदवारांना बॅ. अंतुलेंनी ही ाशिर्वाद दिल्याने त्यांचा विजय आता नक्की झाला आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे केवळ रायगडातच नव्हे तर संपूर्ण कोकणात अंतुलेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. अर्थात हा केवळ मुस्लिम समाज नाही तर अंतुलेंचा चाहता वर्ग सर्व धर्मात, जातीत आहे. अंतुलेंनी मुख्यमंत्री असताना किंवा मंत्री म्हणून कार्यरत असताना या सर्व समाजघटकांची कामे केली आहेत. त्यातूनच त्यांनी कॉँग्रेस पक्ष कसा वाढेल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी निवडणूक लढविली त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांचा विरोधक हा शेकापक्षच होता. मात्र असे असले तरीही निवडणुका झाल्यावर शेकापच्या नेत्यांशी स्नेहाचे संबंध ठेवले. एका परिपक्व राजकीय नेत्याचे गुण अंतुलेंमध्ये आहेत हे स्पष्ट त्यातून दिसते. प्रत्येकाची राजकीय भूमिका ही वेगळी असू शकते. मात्र जनहिताचे काम मग ते कोणत्याही राजकीय पक्षाने आणले तरी ते करुन देण्याची हातोटी अंतुलेंनी साधली होती. त्यातूनच त्यांनी जिल्ह्यात आपल्याला दोस्त मिळविले आणि यातून त्यांना मानणारा एक मोठा वर्ग इकडे तयार झाला. अंतुलेंनी आपल्यावर मुख्यमंत्रीपदी असताना आरोप झाल्यावर ते पद सोडले व ते आरोप खोटे असल्याचे सिध्द झाल्यावरच पुन्हा मंत्रीपद स्वीकारले. अन्यथा आता जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल तटकरे हे सिंचन घोटाळ्यात अब्जावधीचा भ्रष्टाचार करुनही, न्यायलयाने त्यांच्यावर ताशेरे ओढूनही आपले मंत्रीपद सोडायला तयार नाहीत. अंतुलेंना या बदलत चाललेल्या राजकारणाची चिड आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यात सध्या जे राजकारण चालविले आहे त्याचा कुणासही उबग येईल असेच आहे. ज्या प्रकारे भ्रष्टाचार, कमिशनगिरी तटकरेंनी चालविली आहे ते पाहता लोकांची कामे त्यांनी पालकमंत्री या नात्याने नेमकी कोणती कामे केली याचा जाब त्यांना लोक आता मते मागायला गेल्यावर विचारणार आहेत. अर्थातच याची उत्तरे त्यांच्याकडे असणार नाहीत. कारण त्यांनी सार्वजनिक हिताची कामेच केलेली नाहीत व फक्त स्वताच्याच तुंबड्या भरल्या आहेत. अंतुलेंना या सर्व बाबींची चीड आहे. खरे तर तटकरेसाहेबांनी आपल्या सहकारी पक्षातील एक ज्येष्ठ नेते म्हणून अंतुलेंचा आशिर्वाद घेऊन मग प्रचार सुरु केला पाहिजे होता. मात्र त्यांनी तसे न करता मधू ठाकूर या गल्लीतील कॉँग्रेसच्या नेत्यांकडे जाणे पसंत केले. त्यामुळेच तटकरेंना खर्‍या अर्थाने रायगड, तेथील राजकारण, तेथील जनता समजलेली नाही. ज्या अंतुलेंनी जिल्ह्यात कॉँग्रेस पक्ष वाढविला त्याच नेत्यांना जर तुम्ही जुमानत नसाल तर अंतुलेंनी याबाबत नाराजी व्यक्त करणे आपण समजू शकतो. अंतुले वगळता कॉँग्रेस हे गणित तटकरेंना जर समजत नसेल तर कॉँग्रेसजन त्यांना मते देणार नाहीत. एकतर कॉँग्रेसने हा मतदारसंघ सहजरित्या राष्ट्रवादीला दिल्याने कॉँग्रेस पक्षातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातील मुस्लिमांची संख्या मोठी आहे. कारण त्यांना अंतुलेंच्या रुपाने एक नेतृत्व आपले संसदेत पाठविण्याची संधी प्राप्त होत होती. आता अंतुले यांच्या वयाचा विचार करता यावेळी निवडणूक लढविणे शक्य नव्हते. मात्र अंंतुलेंच्या घरातील अन्य कुणाला तरी कॉँग्रेसचे तिकिट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र तिकिट तर सोडून द्या, मतदारसंघही हातचा गेल्याचे दुख आहे. त्याचबरोबर तटकरे यांनी कॉँग्रेस हा आपला एक सहकारी पक्ष आहे आणि त्याच्या पक्ष कार्यकत्यार्ंंची कामे करणे आपले कर्त्यव्य आहे असे कधीच गृहीत धरले नाही. उलट जिल्ह्यातून कॉँग्रेस कशी संपेल हेच तटकरेंनी पाहिले. त्यामुळे अंतुले हे नाराज होणे आपण समजू शकतो. म्हणूनच त्यांनी शेकापच्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी आशिर्वाद दिले आहेत. सुनिल तटकरे हे सत्तेच्या बळावर शासकीय यंत्रणा राबवून तसेच मते विकत घेऊन आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. कारण अशी जर मते विकत घेता आली असती तर टाटा, बिर्ला, अंबानीच मते विकत घेऊन पंतप्रधान झाले असते. आपल्याकडील जनता ही शहाणी आहे. त्यांना आपल्या सोबत कोण राहतो त्या माणसाची बरोबर जाण आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार अनंत गिते यांनी संपूर्ण मतदारसंघात कुणाशीही संपर्क गेल्या पाच वर्षात ठेवला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी आहे. २०१४ सालची निवडणूक ही वेगळी ठरणार आहे. पैशाच्या बळावर निवडणूक जिंकता येते हे समज खोटे ठरविले जाणार आहेत. देशातील वीस कोटी तरुण मतदारांना भ्रष्टाचाराची चीड आहे आणि हाच मतदार सक्रियपणे मतदान करुन भ्रष्टाचार करणार्‍या उमेदवारांना धूळ चारणार आहे. त्यामुळे तटकरे यांचा पराभव नक्कीच आहे. त्याचबरोबर आता तर अंतुलेंसारख्या पितामहांनी आपले माप शेकापच्या उमेदवारांच्या पदरात टाकल्याने लक्ष्मण जगताप व रमेश कदम यांच्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
--------------------------------------------
 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel