-->
संपादकीय पान सोमवार दि. २४ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
भाजपातील छुपी मारामारी
---------------------------
सध्या दिल्लीतचे तख्त जिंकण्यासाठी सर्व शक्तीनिशी लढत असलेल्या भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार पक्षांतर्गत मारामार्‍या सुरु आहेत. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले व आपली सर्व प्रचाराची मदार सोशल मिडियावर ठेवलेले नरेंद्रभाई मोदी यांनी पक्षावर आपला एक हाती अंकूश असावा यासाठी पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना सहजरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने बाजूला सारले. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते व पंतप्रधानपदाचे गेले वीस वर्षे असलेले उमेदवार लालकृष्ण अडवाणी हे नाराज होणे स्वाभाविकच होते. आता भाजपामध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरुन रणकंदन सुरु झाले आहे. अर्थात आता जवळजवळ प्रत्येक पक्षात जागा वाटपावरुन कार्यकर्त्यात हाणामारी, तोडमोड होते. कारण कार्यकर्त्यांच्या आशा आकांक्षा आता वाढल्या आहेत. मात्र भाजपामधील हे रणकंदन पक्ष नेतृत्वात आहे. त्यामुळे याला विशेष महत्व आहे. अडवाणी यांनी आपला दोन दशकांपासून असलेला गुजरातमधील गांधीनगर हा मतदारसंघ बदलून आपण भोपाळ मधून उभे राहाण्यास इच्छुक असल्याचे सांगून हाच मतदारसंघ आपल्याला मिळावा असा त्यांनी आग्रह धरला. शेवटी त्यांना गाधीनगरमधून लढविण्यासाठी तयार करण्यात आले, मात्र त्यासाठी संघाला मध्यस्ती करावी लागली. अखेर या प्रकरणावर पडदा पडला असला तरी मध्यंतरीच्या काळात जी धुसफूस पक्षात झाली त्यावरुन पक्षातील नेतृत्वाच्या वादावरुन पुन्हा कधीही ठिणगी पडू शकते हे पुन्हा एकदा जनतेपुढे आले. आपला पारंपारिक मतदारसंघ सोडण्याचा आग्रह अडवाणींनी का बरे धरला असावा, असा प्रश्‍न पडतो. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे हा मतदारसंघ मोदींच्या गुजरातमध्ये येतो आणि येथे मोदी आपल्याशी काही दगाफटका करतील अशी भीती अडवाणींना वाटत असावी. त्यापेक्षा आपल्याशी जवळ असलेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या सुरक्षित ठरु शकणार्‍या भोपाळमधून लढणे योग्य ठरेल असे त्यांचे मत झाले असावे. अडवाणींच्या मनात आलेली ही भीती व्यर्थ नसावी. कारण अडवाणी हे पहिल्यापासून मोदाींच्या नेतृत्वाच्या आड आले आहेत. शेवटी संघाच्या हस्तक्षेपानंतरच मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषीत करण्याचा निर्णय अडवाणीच्या नाखुषीने झाला होता. असे असले तरीही अडवाणी यांना मानणारा एक मोठा गट पक्षात आहे. पंरतु नरेंद्र मोदींचे पक्षातील वाढत चाललेले वजन व त्यांचा माध्यमातील वाढता दबदबा यामुळे अडवाणी फिके पडले. वयाच्या ८३ व्या वर्षी देखील तरुणाला लाजवील अशी ताकद अडवाणी यांच्याकडे आहे. फक्त त्यांच्याकडून एकदाच मोठी चूक झाली आणि ती त्यांना आता पुढील आयुष्यात भोगावी लागणार आहे. ही चूक म्हणजे त्यांनी पाकिस्तानात जाऊन केलेली जीना यांची स्तुती. त्यांनी ही स्तुती केल्यानंतरच नरेंद्र मोदी यांचा राजकीय देशव्यापी पटलावर उदय जोरात झाला आहे. आज जरी नरेंद्र मोदी कितीही प्रभावी वाटत असले व जाहीरातबाजीच्या जीवावर आपले वारे चौखूर उधळत असल्याची हवा तयार करीत असले तरीही अडवाणी यांच्याकडे राजकीय चातुर्य आहे. एक बाब स्पष्ट आहे की भाजपा व त्यांची आघाडी ही काही स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाही. भाजपाला २७२ चा जादुई आकडा पार करण्यासाठी बरीच सर्कस करावी लागणार आहे. भाजपाने कितीही आपली हवा जोरात केली तरीही १७०च्या पलिकडे ते जाऊ शकणार नाहीत हे वास्तव आहे. अशा वेळी सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाला आपल्या सोबत आणखी मित्र जोडावे लागणार आहेत. हे मित्र जमविण्याची ताकद मोदींपेक्षा अडवाणी यांच्याकडे जास्त आहे. याची अडवाणींना पूर्ण कल्पना असल्याने अगदी अशा स्थितीत आपले पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असा आशावाद अडवाणींना आहे. किंवा शेवटच्या टप्प्यात मोदी नको तर भाजपातील अन्य कुणीतरी मोहरा पुढे करण्याचे काम अडवाणी करु शकतात. भाजपामध्ये आज डझनभर पंतप्रधानपदासाठी बाशिंग बाधून असलेले उमेदवार आहेत. अर्थात अडवामी यांनी कितीही स्वप्ने पाहिली व रचली तरीही संघ काय ठरविणार त्यावरच भविष्यात सगळे ठरणार आहे. आजवर विविध प्रश्‍नांवर अडवाणी यांनी पक्षात बंडाची भाषा केली त्यावेळी नागपूरहून आदेश येताच त्यांना तलवार म्यान करावी लागली होती. परंतु दरवेळी अशा प्रकारे संघाच्या दमदाटीला भीक घालतील असा स्वभाव अडवाणींचा नाही. पंतप्रधानपदाचा प्रश्‍न आल्यास ते आपले सर्वस्व पणाला लावून जीवाची बाजी लढविणार आहेत. सध्या भोपाळमधून निवडणूक लढविण्याची तयारी दाखवून नंतर संघाने डोळे वटारल्यावर पुन्हा एकदा अडवाणी गप्प झाले आहेत. मात्र या निमित्ताने भाजपातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. या निमित्ताने भाजपात किती शिस्त आहे हे दखील जनतेला समजले आहे. सत्ता येण्याच्या अगोदरचे हे चित्र आहे आणि जर खरोखरीच सत्ता आली तर काय लठ्ठालठ्ठी होईल याची कल्पनाच न केलेली बरी. आपला पक्ष हा शिस्तप्रीय आहे या भाजपाच्या नेहमीच्या वक्तव्यालाही सुरुंग लागला आहे. भाजपातील मारामारी ही सध्या छुप्या स्वरुपात आहे. मात्र ही उघडपणे होण्यास काहीच विलंब लागणार नाही. मागच्यावेळी भाजपाची सत्ता आली होती ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या समतोल व्यक्तीमत्वामुळे. मात्र आता मोदींचे व्यक्तीमत्व तसे नाही. मोदींच्या पक्षातील हुकूमशाहीमुळे पक्षातील कुरबुर्‍या आणखीनच वाढणार आहेत. आताची अडवाणींची नाराजी हे त्यातीलच पहिले पाऊल ठरावे. सध्याचे भाजपाचे स्वरुप पाहता कॉँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षात काहीच फरक नाही. हे दोन्ही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel