-->
संपादकीय पान मंगळवार दि. १८ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
----------------------------------------------------
केजरीवाल आणि माध्यमाचे फिसकटलेले नाते
-----------------------------------------
ज्या माध्यमांच्या जीवावर मोठे झाले ते केजरीवाल हे आता त्याच माध्यमांवर घसरले आहेत. अण्णांच्या आंदोलऩात माध्यमांनी चांगला टी.आर.पी.(की पैसा) मिळतो असा जयघोष करीत त्यावेळच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला जोरदार प्रसिध्दी दिली. यातून केजरीवाल यांची छबी सर्वात प्रथम जनतेपुढे आली. आता आपली प्रतिमा मोठी झाल्यावर मात्र तेच केजरीवाल आता माध्यमांवर घसरले आहेत. ही बाब त्यांना महाग पडू शकते. केजरीवाल हे जसे न्यूज चॅनलचे डार्लिंग होतेे तसे ते उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांचेही झाले. केजरीवालांकडे भ्रष्टाचार मुक्तीची गुरुकिल्ली आहे असा या सर्वांचा समज होऊ लागला. न्यूज चॅनलही भ्रष्टाचार हा देशापुढचा एकमेव प्रश्न आहे आणि केजरीवाल हा प्रश्न जनलोकपाल आणल्यास मिटवू शकतात, असा आभास देशभर करत होते. काही न्यूज चॅनलनी केजरीवाल पंतप्रधानांच्या स्पर्धेत आहेत, असाही त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली. काहींनी तर केजरीवाल यांना कॉर्पोरेट उद्योग जगताशी संवाद साधण्यास भाग पाडले. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या काळात लोकांमध्ये आपली राजकीय भूमिका घेऊन जाण्याची गरज उरलेली नाही. टेलिव्हिजनचा पडदा आणि सोशल मीडियातील लाइक्स हे ताब्यात राहिल्यास राजकारण आपल्याला हवे तसे वळवता येऊ शकते अशी परिस्थिती आहे. ही कला दोन नेत्यांना साध्य झाली आहे. हे नेते म्हणजे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि दुसरे केजरीवाल. या दोघांनीही या माध्यमांची ताकद जोखली व आपला मतदार ओळखला. पण झाले असे की, केजरीवाल यांनी जेव्हा मोदींवरच राजकीय आरोप करण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र चॅनलवाल्यांची अडचण झाली. दोन दिवसांपूर्वी नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मीडियातील पत्रकारांनाच तुरुंगात धाडण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या कार्यक्रमात मीडियाच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता. पण केजरीवाल यांच्या या वक्तव्याची मोबाइल क्लिप मीडियाच्या हाती लागल्यानंतर खरे काय ते बाहेर आले. केजरीवाल यांनी देशातील सर्व मीडिया कॉर्पोरेट कंपन्यांच्या दबावाखाली, मोदींच्या आदेशानुसार काम करत असल्याचा आरोप केला. पण नंतर केजरीवाल यांनी आपण असे काही म्हटले नसल्याचे सांगितले. त्यांचे सहकारी आशुतोष हे पूर्वी पत्रकार होते. त्यांनीही केजरीवाल यांचे समर्थन करताना सर्व नव्हे तर काही मीडिया हाउसेस पेड पत्रकारिता करत असल्याचे म्हटले होते. अर्थात या दोघांच्या आरोपात नवे असे काही नाही. पण असे आरोप करण्याअगोदर केजरीवाल यांनी पुरावे दिले असते तर मीडियालाच तोंड दाखवायला जागा राहिली नसती. सध्या देशातील खासगी न्यूज चॅनलची वाढती संख्या बघता व अशा चॅनलमधून दिसणारी पत्रकारिता पाहता या चॅनलचे मूल्यमापन करण्याची क्षमता प्रेक्षकांमध्ये आली आहे. हा प्रेक्षक टीव्हीवरच्या राजकीय प्रचाराला लगेचच बळी पडत नाही. तो स्वत:ची सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून कोणते चॅनल पाहायचे हे ठरवू शकतो. त्यामुळे काही चॅनल केजरीवाल यांच्यावर टीका करत असतील तर त्या टीकेला उत्तर देताना केजरीवाल यांनी स्वत:हून त्या चॅनलना सामोरे जायला हवे होते. लोकांच्या मनात एकूणच व्यवस्थेविरोधात असलेला संताप हा सध्याचा राजकारणातील कळीचा मुद्दा आहे. केजरीवाल यांनी या संतापाला वाट दिली होती म्हणून लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. दिल्लीत त्यांना लोकांनी निवडून जरुर दिले परंतु ४९ दिवसात त्यांना सत्ता सोडावी लागली. त्यामुळेे केजरीवाल यांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत असे नव्हे. उलट लोकांचा अपेक्षाभंगच जास्त केला आहे. ज्या माध्यमांच्या जीवावर आपण मोठे झाले तीच माध्यमे आता केजरीवालांना नकोशी झाली आहेत. याचा त्यांना आगामी निवडणुकीच फायदा होणार की तोटा हे लवकरच ठरेल.
---------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel