-->
संपादकीय पान बुधवार दि. ५ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------
अखेर जनशक्तीच श्रेष्ठ
--------------------------
गेल्या महिन्यात झालेल्या खारघर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अधिकृत २०० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या महिलेला एका सर्वसामान्य महिलेने पराभवाची धूळ चारली. खारघरमधील ही निवडणूक धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी गाजली होती. कारण या निवडणुकीत त्या धनाढ्य महिलेने आपल्याला विजय मिळावा यासाठी अमाप पैसा ओतला आणि आपणच आता विजयी होणार असे तिला धनशक्तीच्या जोरावर वाटू लागले होते. मात्र झाले उलटेच. लोकांनी धनशक्तीला झुगारुन सर्वसामान्य असलेली गृहीणी वनिता पाटील यांना येथे निवडून दिले. हा खर्‍या अर्थाने धनशक्तीवर जनशक्तीने मिळविलेला विजय होता. आज या प्रसंगाची आठवण होण्याचे कारण म्हणजे जे खारघरच्या गल्लीत झाले तेच आगामी निवडणुकीत दिल्लीत होणार आहे. कारण दिल्लीत देखील सध्या धनशक्तीचा जोरदार संचार सुरु झाला आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी धनशक्ती विरोधात दिल्लीत बिगूल फुंकले आहे. दिल्लीत अनेकांना आजवर धनशक्तीचे प्रयोग उघडेपमाने दिसत होते. मात्र ते जाहीरपणे बोलण्याची धमक कुणामध्ये नव्हती. अरविंद केजरीवाल यांनी ही धमक तरी दाखविली आहे. सध्या दिल्लीत कॉँग्रेस-भाजपा-मुकेश अंबांनी म्हणजे रिलायन्स अशी सत्तास्थाने आहेत. अरविंद केजरीवाल यांनी केलेले सर्व आरोप रिलायन्स या देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील समूहाने फेटाळून लावले आहेत. अर्थातच ते फेटाळले जाणार अशीच अपेक्षा होती. मात्र रिलायन्स समूह नेहमीच पडद्यामागे राहून सुत्रे हलवित आला आहे. अगदी रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबांनी हे देखील कधीच राजकारण्यांशी उघडपणे मैत्री न ठेवता आपल्या उद्योगधंद्याच्या हितासाठी आपल्याला पाहिजे तसे कायदे व नियम बदलून घेण्यात उस्ताद होते. आता त्यांचे चिरंजीव मुकेश अंबांनी हे देखील अब्जावधी रुपये खर्च करुन आपल्याला पाहिजे ते सरकार केंद्रात बसावे यासाठी प्रयत्नशील आहेत. ऐकेकाळी रिलायन्सची असलेली कॉँग्रेसची दोस्ती सर्वांना परिचयाची होती. त्याकाळी असलेले अर्थमंत्री प्रवण मुखर्जी यांनी रिलायन्सच्या बाजूने अनेक सवलती बहाल केल्या आणि रिलायन्सचा वृक्ष बहरला. असे बोलले जायचेे की, टाटा, बिर्ला यांना लगाम घालण्यासाठी इंदिरा गांधींनी रिलायन्सच्या धीरुभाई अंबांनींना पुढे केले. हे खरे असेल किंवा नाही मात्र सत्तेचा आशिर्वाद असल्याशिवाय रिलायन्स ऐवढ्या झपाट्याने वाढलेली नाही हे वास्तव कुणीही नाकारु शकणार नाही. त्यामुळे रिलायन्स आणि कॉँग्रेसचा याराना काही नवीन नाही. मात्र या दोघांमधील याराना काळाच्या ओघात बिघडत गेला आणि मुकेशभाईंचा कल हा भाजपाच्या दिशेने झुकू लागला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीच्या तख्यावर बसण्याच्या मनिषेला मुकेशभाईंनी आर्थिक बळ देण्यास सुरुवात केली. गुजरातमध्ये रिलायन्सचे मोठे प्रकल्प असल्याने भाजपाच्या जवळ रिलायन्स होताच. परंतु २००९ साली मुकेशभाईंचा अंदाज साफ चुकला. त्यांना असे वाटले होते की, पुन्हा सत्तेत भाजपाच येणार. त्यामुळे रिलायन्सने आपला पैशाचा ओघ भाजपाकडे जास्त वळवून कॉँग्रेसला ठेंगा दाखवायला सुरुवात केली होती. मात्र कॉँग्रेस २००९ सएाली सत्तेत आल्यावर रिलायन्सने आपल्या पध्दतीने कॉँग्रेसशी जुळवून घेण्याची मोहीम हाती घेतली. मात्र मुकेश अंबांनी यांच्यावर गांधी घराणे खट्टू असल्याची चर्चा होत होती. अर्थात त्यांची सरकार दरबारची रिलायन्सची कामे काही यामुळे रखडत होती असे नाही. ही कामे करवून घेण्यासाठी रिलायन्सची यंत्रणा नेहमीच कार्यरत होती व यापुढेही राहाणार आहे. मात्र सत्ताकेंद्र असलेल्या गांधी घराण्याशी दुरावा ठेवणे मुकेशभाईंना काही परवडणारा नव्हता. २०१३ साली कॉँग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात असलेल्या मोतीलाल व्होरा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की, आम्हाला रिलायन्सकडून एकही पैसा देणगीच्या स्वरुपात मिळालेला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता की, कॉँग्रेस आणि रिलायन्समधील दुरावा वाढला होता. रिलायन्सला आता नविन सत्ता केंद्र भाजपाच्या व मोदींच्या रुपाने सापडले होते आणि त्यावर ते पैसे लावायला सज्ज झाले आहेत. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी रिलायन्सला दोन हात गेल्या काही वर्षात दूर ठेवले असल्याची चर्चा असली तरीही देशाचा पेट्रोलियम मंत्री कोण असावा हे रिलायन्सच ठरविते. त्यामुळे कॉँग्रेसचे रिलायन्सशी कामचलावू संबंध असले तरी मुकेशभाईंना भाजपा हा जवळचा वाटू लागला आहे. नरेंद्र मोदींनी आता देशात माध्यमांना हाताशी धरुन अशी काही हवा तयार केली आहे की, आता फक्त त्यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधीच शिल्लक आहे. नरेंद्रभाईंच्या या घोड्यावर पैसे मुुकेशभाईंनी लावले आहेत कारण त्यांनाही असे वाटू लागले आहे की, यावेळी बाजपाच येणार. मात्र गेल्या वेळी देखील त्यांचा असा अंदाज चुकला होता. रिलायन्सने कॉँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षात आपली माणसे पेरली आहेत. मात्र कॉँग्रेस नेतृत्व आता मुकेशभाईंना चार हात दूर ठेवत असल्याने मुकेशभाईंनी आता मोदींचा घोडा दामटायला सुरुवात केली आहे. अर्थात मुकेश अंबांनी यांनी एक बाब लक्षात गेतली पाहिजे की, आपल्या देशात लोकशाही चांगलीच रुजली आहे आणि आपल्याकडे जनता आता शहाणी आहे. त्यांना धनशक्तीच्या बळावर नाचणार्‍यांना अनेकदा धूळ चारली आहे. शेवटी अंबांनीना कोणाचे सरकार पाहिजे त्यावर केंद्रात सरकार येणार नाही. जनशक्तीचाच विजय होणार आहे. जनताच ठरविणार आहे की आपल्याला कोणते सरकार पाहिजे आहे. शेवटी जनशक्तीच श्रेष्ठ आहे.
-----------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel