-->
संपादकीय पान बुधवार दि. १९ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
मावळ, रायगडमध्ये लाल बावटाच!
---------------------------
मावळ व लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाने उमेदवार जाहीर केल्यापासून या दोन्ही मतदारसंघातून लाल बावटाच फडकणार हे स्पष्ट झाले आहे. मावळमधून शेकापने लक्ष्मण जगताप व रायगडमधून रमेश कदम यांना उमेदवारी जाहीर केल्यावर शेकापच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे दित्र दिसते आहे. कारण गेल्या वेळी शेकापने शिवसेनेच्या अनंत गितेंना पाठिंबा दिला होता आणि बहुसंख्य शेकाप कार्यकर्त्यांनी गितेंवर मतांचा वर्षात केला होता. मात्र दुसरीकडे शिवसेनेने आपली मते वेळोवेळी शेकापच्या उमेदवारांना देताना हात अखडता घेतला होता. गितेंनी निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघात फारसे लक्षही घातले नव्हते. यावेळी मात्र शेकापने कुणालाही पाठिंबा देण्याच्या ऐवजी आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. यामुळे मात्र या दोन्ही मतदारसंघातील अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या मनात धडकी भरली आहे. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे या दोन्ही मतदारसंघात निर्णायक मते ही शेकापचीच आहेत. शेकाप हा केडरबेस पक्ष असल्याने त्याची मते ही त्या पक्षाला बांधलेली असल्यामुळे ही पारंपारिक मते काही हलत नाहीत असा ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास सांगतो. मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापने लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आणि तेव्हाच त्यांचा विजय नक्की झाला. कारण जगतापात भाऊंना विरोध करण्यासाठी अन्य पक्षांना उमेदवार शोधण्यासाठी बरीच दमछाक करावी लागली आहे. शेवटी राष्ट्रवादीने मारुन मुटकून मुंबईचे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेल्या राहूल नार्वेकर यांना तिकीट दिले आहे. पिंपरी चिंचवडचे मादी महापौर आझम पानसरे यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकून कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादीला मोठा धक्का होता. त्यामुळे राष्ट्रवादीने पिपंरी चिंचवडचे मादी महापौर संजोग वाघेरे व गणेश खांडगे यांना ही जागा लढविण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी जगपात भाऊंच्या विरोधात न लढण्याचे स्पष्ट केल्यावर राष्ट्रवादीला नार्वेकरांचे बुजगावणे उभे करावे लागले आहे. लक्ष्मण जगताप यांना सर्व थरातून मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कुणी उभे राहाण्यास मनापासून तयार नव्हते. त्यामुळे मावळमध्ये लाल बावटा फडकणार हे नक्की झाले आहे. मावळ हा मतदारसंघ उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पिंपरी-चिंचवड, मावळ या तालुक्याचा तयार करण्यात आलेला आहे. येथील मतदारसंघ हा काही प्रमाणात ग्रामीण तर काही ठिकाणी शहरी भागात विखुरलेला आहे. पिंपरी चिचंवडसारख्या भागात अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न एैरणीवर आलेला आहे. गेल्या वेळी सत्ताधारी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने या प्रश्‍नाबाबत आश्‍वासन देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्याने या पक्षाबाबत चीड आहे. या पार्श्‍वभूमीवरच जगताप यांनी पक्षत्याग केल्याने त्यांच्याबद्दल लोकांसाठी लढणारा नेता अशी प्रतिमा आहे. त्याचा फायदा शेकापला मिळणार हे नक्कीच. रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरेंना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसचा पारंपारिक मुस्लिम मतदार दुखावला गेला आहे. कारण या मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ बॅ. ए.आर. अंतुलेंनी प्रतिनिधीत्व केले होते. हा मतदारसंघ कॉँग्रेस पक्षाने व अंतुलेंनी चांगल्या प्रकारे बांधला देखील होता. मात्र कॉँग्रेसने आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीला बहाल केल्याने कॉग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणात नाराज झाला आहे. राष्ट्रवादी ज्या प्रकारे जिल्ह्यातून कॉँग्रेसचा सफाया करीत ाहे त्याची खंत कॉँग्रेसजनांना आहे. त्याचा फायदा शेकापला मिळणार आहे. मात्र काही पत्रपंडित जे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांची भाटगिरी करीत आहेत त्यांना असे वाटते की तटकरेंच्या विजयासाठीच शेकापने उमेदवार उभा केला आहे. परंतु शेकाप असे का करील? शेकापला जर तटकरेंना निवडून आणावयाचे असेल तर त्यांनी थेट पाठिंबाच दिला असता. असा मागच्या दाराने पाठिंबा द्यायची शेकापला गरज वाटत नाही. असो. गेल्या वेळी शिवसेनेला शेकापने पाठिंबा दिल्यामुळे गिते यांना लोकसभेत लोकांनी पाठविले. यावेळी  शिवसेनेला स्वबळावर काही लोकसभा रायगडमधून गाठता येणार नाही. तर तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसमधूनही जसा विरोध आहे तसाच कॉँग्रेसमधून त्यांच्याबद्दल जबरदस्ती नाराजी आहे. त्यांनी सुरुवातीला अंतुलेंचे आशिर्वाद घेण्याऐवजी मधू ठाकूर यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांच्या घरी गेल्यामुळे सुरुवातच त्यांची चुकीने झाली आहे. तटकरेंनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण न करता फक्त आपल्या पक्षाच्या हिताच्या व स्वत:च्या हिताचे राजकारण केल्याने त्यांच्या बद्दलची नाराजी ही मतपेटीतून व्यक्त होणार आहे. याचा सर्वांचा फायदा शेकापचे उमेदवार रमेश कदम यांना मिळणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव, महाड, सुधागड, म्हसळा, तळा, मंदणगढ, खेड, पोलादपूर असा विखुरलेला आहे. येथून शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक व शेकापचे दोन आमदार आहेत. त्यामुळे येथे शेकापची ताकद जास्त आहे. शेकापचे उमेदवार हे रत्नागिरीतील चिपळूणमधील एक वजनदार राजकीय व्यक्ती आहेत. रत्नागिरीत शेकापचे अस्तित्व कमी असले तरी रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे तेथे पक्षाची ताकद वाढली आहे. कदम यांच्या विजयाची निर्णायक विजयासाठी लागणारी मते त्यांना याच रत्नागिरी पट्यातून मिळणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून पुन्हा एकदा लाल बावटा जगताप व कदम यांच्या रुपाने आपले संसदेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
--------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel