-->
प्रसाद केरकर - दि. १६ डिसेंबर २०१३ साठी अग्रलेख
--------------------------------
जादूटोण्याला कायद्याने मूठमाती
------------------------
पुरोगामी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्राला जादूटोणा विरोधी विधेयक संमंत करुन घ्यायला तब्बल १७ वर्षे जावी लागली आहेत. शुक्रवारी राज्य विधानसभेने या विधेयकाला आवाजी मतदानाने मंजुरी दिली. सोमवारी हे विधेयक विधान    परिषदेत मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या लढ्याचा मोठा विजय या विधयकाच्या संमंतीने झाला आहे. मात्र यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखे एक पुरोगामी व्यक्तीमत्व आपल्याला गमवावावे लागले आहे हे दुख ही त्याचबरोबर आहे. या विधेयकातील काही तरतुदींना शिवसेना व भाजपा यांनी विरोध केला होता. त्यांनी सुचविलेल्या काही शिफासशी सरकारने मान्यही केल्या. परंतु सर्वंकष चर्चा न करता ते मान्य झाले अशी टीका या पक्षांच्या सदस्यांनी केली. असे असले तरीही सरकारने हे विधेयक मंजूर करुन घेण्याचा मार्ग मोकळा केला. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच विधेयक ठरले आहे. अर्थात यामागे अंधश्रद्धा चळवळीने गेल्या वीस वर्षात जे आंदोलन उभारले व चळवळीव्दारे सरकारवर एक मोठा दबाव निर्माण केला तसेच त्यातच डॉ. दाभोलकरांची झालेली हत्या या सर्वांना याचे श्रेय दिले पाहिजे. श्रध्दा व अंधश्रध्दा यांच्यात पुसटशी रेषा आहे. त्यामुळे या दोन्ही कृतींचा चुकीचा अर्थ लावला जातो. डॉ. दाभोलकरांनी गेल्या वीस वर्षात या चळवळीचे काम करतानाही नेहमीत लोकांच्या श्रध्देचा अपमान कधीच केला नाही. असे करीत असताना मात्र अंधश्रध्देवर त्यांनी नेहमीच हल्ला केला. त्यांना मात्र नेहमीच हिंदुत्ववादी व प्रतिगामी शक्तींनी टार्गेट केले आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला. यातून त्यांच्यावर नेहमी टोकाची टीका झाली. मात्र त्यांनी आपली विज्ञानवादी भूमिका कदापी सोडली नाही आणि नेहमीच अंधश्रध्देमुळे समाजाचे होणारे नुकसान दाखविले. आज जे विधेयक मंजूर झाले आहे ही खरी त्यांना आदरांजली ठरावी. यापूर्वी प्रत्येक आधिवेशनाच्या अगोदर सरकार त्यांच्याशी चर्चा करीत असे. दरवेळी काही ना काहीतरी तरतुदी वगळून हे विधेयक संमंत करणार असे सांगत असे. पंरतु प्रतिगामी शक्तींपुढे गुढगे टेकून हे विधेयक मांडलेच जात नसे. आता देखील सरकारवर डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर एवढा मोठा दबाव होता की हे विधेयक मंजूर करणे भाग पडले. नरबळी, अमानुष, अनिष्ट, दुष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी कडक तरतुदी यात करण्यात आल्या आहेत. तसेच भजन, किर्तन, होमहवन, पुजा, यात्रा आणि वार्‍या यांना कायद्याच्या कचाट्यातून वगळण्यात आले आहे. या विधेयकामुळे विविध वार्‍यांवर बंदी येईल, देवळात नमस्कार करणेही कठीण होईल, अशा प्रतिगामी शक्तींनी आवया उठविल्या होत्या. शिवसेना व भाजपाच्या मंडळींनी याची री ओढली होती. परंतु राज्यातील शेकापसह पुरोगामी शक्तींनी या विधयकाला पूर्णपणे पाठिंबा दाखविला आणि या विधयकाच्या रुपाने महाराष्ट्रात एक पुरोगामी पाऊल पडले. डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी या विधेयकाचे स्वागत केले आहे व आनंदही व्यक्त केला आहे. सध्या थर्ड पार्टी तक्रारीची तरतुद या विधेयकातून वगळण्यात आली आहे. या चळवळीचे एक महत्वाचे कार्यकर्ते श्याम मानव यांनी ही तरतुद यात नसल्याने कायद्याचा आत्माच हरविल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक असली तरीही सध्याच्या स्थितीत या विधेयकाचे मर्यादीत स्वरुपात का होईना स्वागत झाले पाहिजे. पुढील काळातील येणार्‍या अनुभवानुसार, या कायद्यात वेळोवेळी बदल करावे लागणार आहेत. त्यावेळी हे बदल करण्यासाठी सरकारला भाग पाडता येऊ शकेल. यासाठी अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकत्यार्ंंच्या चळवळीचे दडपण सतत सरकारवर राहिले पाहिजे. त्यामुळे आता ज्या शिल्लक राहिलेल्या तरतुदी आहेत यासाठी ही चळवळ सक्रिय राहिली पाहिजे. आता हे विधेयक संमंत झाल्याने अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कामकाज संपुष्टात आले असे नाही. उलट आता चळवळीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. कारण या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात एक फळी निर्माण करण्याची गरज आहे. तसेच या कायद्यातील ज्या पळवाटा निघतील त्याचा अभ्यास करुन सरकारवर संबंधीत सुधारणा करण्यास भाग पाडण्याचे काम या चळवळीतील कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. या विधयकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पुरोगामी व प्रतिगामी शक्तींचे दर्शन झाले आहे. विविध ढोंग पाघरुन असलेल्या प्रतिगामी शक्ती या निमित्ताने उफाळून वर आल्या. देव, धर्म, भक्तीभाव याला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्याच्या नावाखाली जनतेची जी फसवणूक, पिळवणूक होते तिला विरोध आहे, हे या विधेयकाच्या निमित्ताने राज्यातील पुरोगामी शक्तींनी ठासून सांगितले हे बरे झाले. या विधयेकाच्या संमंतीमुळे पुरोगामी शक्तींचा विजय झाला आहे आणि अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ अधिक गतीमान होईल, अशी अपेक्षा करुया.
----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel