-->
दि. १६ डिसेंबर २०१३ साठी चिंतन
--------------------
ग्रामीण भागासाठी एक स्वागतार्ह पाऊल
-------------------
सरकारने येत्या शैक्षणणिक वर्षापासून खास ग्रामीण भागासाठी म्हणून नवीन वैद्यकीय अभ्यासक्रम सुरु केला आहे. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचे स्वागत व्हावे. आपल्या देशात, विशेषत: ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येते व एकूण साडेआठ लाख डॉक्टरांची उणीव देशाला भासते आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.  या अभ्यासक्रमाचे नाव याआधी बॅचलर ऑफ रुरल मेडिसीन अँड सर्जरी (बीआरएमएस) असे होते; परंतु मेडिकल कौन्सिलमधील काही मंडळींचा याला आक्षेप होता. त्यामुळे बीएस्सी (कम्युनिटी हेल्थ) असा साडेतीन वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम विविध जिल्ह्याच्या ठिकाणी असणा-या जिल्हा रुग्णालयामधून शिकवला जाणार आहे. ही पदवी घेतल्यानंतर हे पदवीधर कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सामाजिक आरोग्य अधिकारी) म्हणून काम करू शकतील. हे पदवीधर म्हणजे नर्स आणि डॉक्टर यांच्यामधल्या स्तराचे म्हणून ओळखले जातील.
ग्रामीण भागात जाऊन या पदवीधरांनी सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मूळ अपेक्षा आहे. पूर्वीच्या ठरलेल्या बीआरएमएस या पदवीतून ही अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त होत होती. या पदवीधरांना त्यांच्या अभ्यासक्रमातून सामाजिक आरोग्याचे ज्ञान देण्यात येणार आहे. परंतु उपचार करण्याची मुभा त्यांना किती असेल याबाबत साशंकता आहे.  या पदवीधरांनी रुग्णाला योग्य वैद्यकीय सेवा मिळवून देणे अपेक्षित आहे. आपल्या देशात ऍलोपथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अशा चार अधिकृत वैद्यकीय शाखांचे अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. या सर्व शाखांचे देशात सुमारे २२ ते २३ लाख एवढे डॉक्टर आहेत. तसेच आपल्या देशात १० ते ११ लाख भोंदू डॉक्टर वैद्यकीय पदवी न घेता ही बिनबोभाटपणे उपचार करतात. यावर आपल्या प्रशासनाचे काही नियंत्रण नाही. अशा स्थितीत ग्रामीण भागातील या अभ्यासक्रमाव्दारे तराय होणारे डॉक्टर्स हे ग्रामीण भागातील जनतेला दिलासादायक ठरु शकतील. नाशिक येथील मुक्त विद्यापीठाने ५ वर्षापूर्वी डॉ. श्याम अष्टेकर यांच्या पुढाकाराने आरोग्य मित्र हा अभ्यासक्रम सुरू केला होता. अशा छोट्या अभ्यासक्रमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य रक्षक निर्माण होऊ शकतील. आजही अनेक सेवाभावी संस्था अशा योजना राबवताना दिसतात. जनकल्याण समिती, वनवासी कल्याण आश्रम, आरोग्य भारती या काही सेवाभावी संस्था व डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने ङ्गसर्चफ या संस्थेतर्फे ही आरोग्य सेविकांची योजना राबविली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीएस्सी (कम्युनिटी हेल्थ) या नवीन अभ्यासक्रमाची मर्यादा असली तरीही ग्रामीण भागातील सध्याची डॉक्टरांची कमतरता यातून भागविली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला यातून दिलासा मिळेल अशी सध्यातरी अपेक्षा करावयास हरकत नाही. सध्या ग्रामीण भागात डॉक्टर येण्यास तयार नसतात. त्यामुळे अनेक भागात रुग्णालयाच्या इमारती उभ्या आहेत परंतु डॉक्टर नाहीत अशी स्थीती आहे. सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या नवीन अभ्यासक्रमातून तयार होणारे डॉक्टर ग्रामीण भागात उपयोगी पडू शकतील.
-------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel