
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय
Published on 23 May-2012 AKSHARA
|
मुं बई दादर येथे मुख्यालय असलेली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मोठय़ा गर्वाने करीत आहे. वाचनाने समाजाची सर्वांगीण उन्नती होऊन सुसंस्कृतता व सृजनशीलता वाढीस लागते, ही गोष्ट 1898 मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संस्थापकांनी पूर्णपणे हेरली व एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात उगवलेल्या शिक्षणाच्या लाटेचा फायदा घेऊन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना 1 ऑगस्ट 1898 रोजी नारळीपौíणमेच्या सुमुहूर्तावर केली. गेल्या शंभर वर्षात हे वाचनालय टप्प्याटप्प्याने विकसित होऊन आज ही संस्था सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा सहभाग उचलू शकली. हे संस्थेस भूषणावह आहे. आजच्या संस्थेच्या ह्या विकासाचे सारे र्शेय आपल्या संस्थापकांच्या नावे अनुक्रमे कै. मुकुंद बाळकृष्ण गुर्जर, बी.ए., कै. नरहर महादेव जोशी, कै. र्शीधर बाळाजी मोडक, कै. अनंत नीळकंठ पिठकर, कै. विनायक बळवंत जोशी, कै. नारायण कृष्णा गद्रे, कै. शंकर हरी शेजवलकर, कै. नारायण महादेव बाक्रे, कै. विठ्ठल वासुदेव टिल्लू, कै. गणेश लक्ष्मण पागे, कै. अंबादास गोपाल पुणतांबेकर दूरदृष्टीस जाते. संस्थेच्या वाटचालीची एकशे चौदाहून अधिक वष्रे पुरी होऊन ती त्याच जोमाने कार्यरत आहे. आजपर्यंतच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याने व सेवकांच्या सेवाभावी वृत्तीने महाराष्ट्र सारस्वताचे हे रोपटे बहरून आज समाजात चोखपणे आपली भूमिका पार पाडीत आहे. यात शंका नाही. संस्थेच्या नायगाव, दादर येथील मध्यवर्ती ग्रंथालय व कार्यालयाच्या वास्तुचे उद्घाटन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दि. 10 मार्च 1959 रोजी संपन्न झाले होते. आज मुंबईभर ह्या संस्थेच्या 31 शाखा-विभाग कार्यरत आहेत. इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ ह्या दोन संलग्न संस्था संशोधनपर कार्य करून तिमाही संशोधन पत्रिका प्रसिद्ध करीत आहेत. शं. ग. दाते सूचीमंडळ, ग्रंथसूची तसेच नियतकालिकांतील विविध विषयांची लेखसूची करण्याचे जे कार्य करीत आहे ते एक प्रकारे अतुलनीय आहे. सानेगुरुजी बालविकास मंदिर ही संस्थेची संलग्न शाखा बालक विकासाचे काम करीत आहे. महाराष्ट्र प्रबोधन शाखेतर्फे विविध शैक्षणिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजले जातात. शारदोपासनेचे हे कार्य अखंडपणे गाजावाजा न करता शांतपणे आज एकशे चौदा वष्रे चालू आहे. ह्यातच संस्थेचे यश सामावले आहे. संस्थेचे संदर्भालय हे संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण गणले जाते. दोन लाखांवर ग्रंथसंपदा, दैनिके व साप्ताहिकांची लेखसूची, मासिकांतील लेखसूची, संदर्भमंजूषा तसेच दुíमळ 12000 ग्रंथ, 889 दोलामुद्रिते ह्यांनी हा संदर्भविभाग समृद्ध आहे. प्रशस्त हवेशीर दालने, उत्तम हवा खेळण्यासाठी 12 फूट उंची ही या संस्थेची वैशिष्ट्ये. सरस्वतीचा कृपाहस्त असलेले संदर्भालय अनेक विद्वानांना अगदी आपले स्वत:चे वाटते. कारण बहुतेकांनी येथे मनसोक्त वाचन केले, पदव्या संपादन केल्या, डॉक्टरेटस् मिळविल्या. लहान मोठे लेखक आपण साहित्यिक येथील ज्ञानसाधनेने झालो असे सांगून आपले संस्थेवरील प्रेम व्यक्त करतात. प्रतिदिनी 12 तासांची अखंड सेवा कुशलतापूर्वक सेवा देणार्या नम्र सेवकांचा या यशात वाटा आहे. ग्रंथपालन वर्ग, मराठी लघुलेखन वर्ग उत्तम प्रकारे चालू आहेत. महत्त्वाचे म्हणजे 40 रुपये मासिक वर्गणीत सर्व सेवा पुरविली जात आहे. कमी वर्गणीमुळे जास्तीत जास्त सभासदांना वाचनाचा लाभ घ्यायला मिळावा हा हेतू आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दरवर्षी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांची जयंती साजरी केली जाते. तर कै. प्रा. अ. बा. गजेंद्रगडकर व्याख्यानमाला, स्वा. सावरकर व्याख्यानमाला, सेनापती बापट व्याख्यानमाला, केशवराव दाते व्याख्यानमाला व शारदोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. त्याशिवाय विविध लेखन स्पर्धा व निबंध स्पर्धा भरवून ही संस्था तरुणांना यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करते. - प्रसाद केरकर |
0 Response to "मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय"
टिप्पणी पोस्ट करा