-->
भारतीय वंशांचे ‘बाहेरच्या देशातील’ राजकारणी

भारतीय वंशांचे ‘बाहेरच्या देशातील’ राजकारणी

दि. 30 ऑक्टोबरच्या मोहोरसाठी चिंतन भारतीय वंशांचे ‘बाहेरच्या देशातील’ राजकारणी भारतीय (किंवा आशियाई) वंशांचे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याने देशात आनंदाची व अभिमानाची एक लाटच आल्यासारखी स्थिती आहे. त्यातच त्यांचे गोमातेची पुजा करीत असल्याचे फोटो प्रसिध्द झाल्याने हिदुत्ववाद्यांच्या आनंदाला तर भरतेच येणे स्वाभाविकच होते. अर्थात त्यांचा हा आनंद अल्पजिवीच ठरण्याची शक्यता जास्त आहे. ऋषी यांचे सासरे व देशातील आघाडीची आय.टी. कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायणमूर्ती यांनी देखील या घटनेचे स्वागत करीत ते ब्रिटीश जनतेच्या आशाअपेक्षा पूर्ण करतील असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यांनी कुठेही भारत-ब्रिटन संबंध अधिक सुधारण्यास मदत होईल, असे म्हटलेले नाही. त्यांची ही प्रतिक्रिया फारच सावध व अपेक्षेनुसारच आहे. अर्थात अशा प्रकारे भारतीय वंशांचे राजकारणी अन्य देशाच्या प्रमुखपदी किंवा मानाच्या जागी पोहोचण्याची ही काही पहिली वेळ नाही. अगदी गेल्याच वर्षी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी भारतीय वंशांच्या कमला देवी हॅरिस निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी आर्यलंडच्या पंतप्रधानपदी भारतातील मूळचे असलेले लिओ वराडकर हे निवडून आले होते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन येथे डझनभर किंवा त्याहूनही जास्त खासदार भारतीय वंशाचे आहेत. तसेच मॉरिशस, सुरिनाम, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, पोर्तुगाल येथील देशांचे प्रमुखही भारतीय वंशाचे होते. अधिकृत आकडेवारीनुसार जगात सुमारे तीन कोटी हून जास्त अनिवासी भारतीय राहात आहेत. तर विविध १५ देशांमध्ये ४०० हून अधिक भारतीय हे महत्वाच्या पदावर आहेत. मग ते राजकारणापासून कॉर्पोरेटपर्यंत सर्व क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही वर्षात दरवर्षी २५ लाख भारतीय अन्य देशात स्थलांतरीत होत आहेत. मात्र यात दोन-तीन पिढ्यांपूर्वी स्थलांतरीत झालेल्या अनिवासी भारतीयांचा समावेश नाही. ती संख्या तर खूपच मोठी असेल. हे स्थलांतर ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाले. ब्रिटीशांनी आपली सत्ता असलेल्या अन्य देशात भारतातून बहुतांशी मजूर पाठविले. तेथे गेलेले भारतीय त्या देशाशी एकरुप झाले, तेथील नागरिकत्व मिळविले, त्यांची पुढची पिढी शिकून मोठी झाली आणि नावारुपाला आली. आज आपण जे विविध देशात भारतीय वंशाचे उच्चपदाला पोहोचलेले नागरिक बघतो ती ही तिसरी पिढी आहे. ऋषी सुनक यांचे आजोबा हे पंजाबातील (आताच्या पाकिस्तानातील पंजाब) होते व त्यानंतर त्यांचे वडिल आफ्रिकेत कामासाठी गेले, मात्र ऋषी यांचा जन्म ब्रिटनमधील आहे. ऋषी यांची पत्नी ही भारतीय असल्याने त्यांना भारताविषयी विशेष आकर्षण वाटणे आपण समजू शकतो. मात्र ते ब्रिटीश नागरिक असल्याने ते आपल्या देशाचेच हित पाहाणार, जरी ते भारतीय वंशाचे असले तरीही आणि यात काहीही चूक नाही. ऋषी सुनक यांच्याकडून ब्रिटनच्या हिताला प्राधान्य दिले जाणार व त्यानंतर ते भारताच्या हिताचा विचार करतील, यात त्यांच्या दृष्टीने काहीच चूक नाही. सर्वात महत्वाची म्हणजे ब्रिटनमध्ये एक अल्पसंख्यांक समाजातील म्हणजे हिंदू नेता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला आहे. आपल्याकडे अशा प्रकारे एखादा अल्पसंख्यांतील नेता पंतप्रधानांच्या पदापर्यंत पोहोचेल का, असा सवाल आहे. ब्रिटनमधील लोकशाही ही परिपक्व आहे म्हणूनच धर्माचा विचार न करता सुनक या पदापर्यंत पोहोचले आहेत. आपल्याकडे लोकशाही रुजली आहे, परंतु परिपक्व अजिबात नाही, आजही आपण बऱ्याच गोष्टी जाती, धर्माच्या अनुषंगाने पाहतो, ताडतो व त्यानुसार आपला व्यवहार चालतो. भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याचा आनंद मानणाऱ्या १४० करोड नागरिकांनी हा बोध घेणे गरजेचे आहे की, ब्रिटन खऱ्या अर्थाने लोकशाही प्रधान देश आहे कारण तिथे जात धर्म पंथ यास प्राधान्य न देता केवळ आणि केवळ कर्तृत्वाने निवड केली जाते. आपल्या देशात मात्र अमर्याद अधिकार असणाऱ्या लोकप्रतिनिधीपदी निवडणारी व्यक्ती आणि त्यांची पात्रता, कर्तृत्व याचा दुरान्वये संबंध दिसत नाही. जोपर्यंत आपण जाती, धर्माची बंधने तोडून विचार करीत नाही तोपर्यंत भारत देश महासत्ता सोडा, विकसित देश म्हणून देखील नावारूपास येणे केवळ अशक्य आहे. केवळ एक निर्णय देशहितास बाधा आणणारा घेतला म्हणून ४५ दिवसात ब्रिटनमध्ये पंतप्रधानाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. आपल्याकडे मात्र असे उत्तरदायित्व हा निकषच नाही. पंतप्रधानांपासून लोकप्रतिनिधींचे मूल्यांकन करणारी यंत्रणाच आपल्या लोकशाही व्यवस्थेत आणि सामाजिक व्यवस्थेत नाही. आपण सोनिया गांधी ज्या जन्माने इटालियन आहेत त्या भारतात तीन दशके राहूनही, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व असतानाही त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारु नये यासाठी किती गहजब करण्यात आला. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्यास देश इटलीचा गुलाम होईल, अशा प्रकारची वक्तवे त्यावेळी करण्यात आली. ब्रिटनमध्ये मात्र सुनक यांच्या संदर्भात असे झाले नाही, त्यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर पंतप्रधानपद देण्यात आले. सुनक यांचे स्वागत करणारेच त्यावेळी सोनिया गांधींना विरोध करीत होते, हा गंमतीचा भाग आहे. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या असत्या तर त्यांनी भारतीय नागरिक म्हणून देशाच्या हितासाठी पावले उचलली असती, इटलीच्या हितासाठी नव्हे. त्यामुळे आता देखील सुनक हे ब्रिटनचेच हित प्राधान्याने बघणार आहेत, भारतीय वंशांचे असले तरी त्यांना भारताच्या हिताशी फारसे काही देणेघेणे नाही. भविष्यात होऊ घातलेला भारत-ब्रिटन व्यापार करार जर झाला नाही तर हेच लोक सुनक यांच्या नावाने बोटे मोडणार आहेत. सुनक असो किंवा अन्य कोणत्याही देशातील भारतीय वंशांचे राष्ट्रप्रमुख असोत त्यांना केवळ शुभेच्छा द्याव्यात, त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेऊ नयेत व भविष्यात जात, धर्म, वंश, रंग या बाबतीत विचार न करता पंतप्रधानांची निवड केली जावी, यातच आपली लोकशाही अधिक व्यापक व परिपक्व होईल.

Related Posts

0 Response to "भारतीय वंशांचे ‘बाहेरच्या देशातील’ राजकारणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel