-->
वंचितचा घटस्फोट

वंचितचा घटस्फोट

सोमवार दि. 16 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
वंचितचा घटस्फोट
राज्यातील विधानसभेच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांमध्ये अपेक्षीत असा घटस्फोट झाला आहे. अपेक्षीत असा की आजवरचा इतिहास पाहता प्रकाश आंबेडकारांसोबत सोबती म्हणून फार काळ कोण टिकत नाही. आता त्याच इतिहासाची यावेळी पुनरावृत्ती या घटस्फोटाने झाली आहे असे म्हणता येईल. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तीयाज जलिल यांनी वंचित बहुजन आघाडीला घटस्फोट देत असल्याचे जाहीर केलेे. त्यानंतर लगेचच ओवेसींनी त्या घटस्फोटाला मान्यता दिली. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी एमआयएमला ज्या किरकोळ जागा देऊ केल्या होत्या व त्यानंतर चर्चेत ते काहीच जादा जागा देत नव्हते ते पाहताच ही आघाडी फुटणार किंवा आंबेडकरांना यानिमित्ताने घटस्फोट पाहिजे असल्याचे स्पष्ट होते. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला होता. त्याला काही वर्षानंतर मर्यादीत यश लाभले होते. हा प्रयोग त्यांना संपूबर्ण राज्यात राबविता आला नाही हे वास्तव होते. आपम एकीकडे सेक्युलर असल्याचे भासवायचे आणि जातियवादी शक्तींना आपल्या कृतीतून बळ द्यायचे ही आंबेडकरांची नेहमीच भूमिका राहिली आहे. यावेळी देखील त्यांना एमआयएमकडून घटस्फोट पाहिजेच होता. याचा अर्थ ते कॉँग्रेसच्या सेक्युलर आघाडीचा घटक होतील असे नव्हते. त्यांनी कॉँग्रेसशी युती करण्याची तयारी दाखविली मात्र राष्ट्रवादीसोबत बसणार नाही हा आग्रह धरला. एमआयएमची मते आपल्याला हस्तांतरीत होत नाहीत असे ते म्हणतात. ते वास्तव आहे, मात्र प्रश्‍न तो नाही. प्रश्‍न हा आहे की, तुम्ही सध्याच्या वातावरणात सेक्युलर पक्षांसोबत राहाणार की भाजपाचे हात मजबूत करण्यासाठी सेक्युलर मते फोडणार? ओवेसी हे देखील मुस्लीम मते केंद्रीत करुन दुसर्‍या बाजूला हिंदू मतांचे क्रेंद्रीकरण करण्यासाठीचा मार्ग मोकळा करतात. त्यामुळे त्यांचे राजकारण हे देखील भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदतकारक ठरणारे असते. आंबेडकरांनी काँग्रेसशी युती शक्य नाही, आम्ही स्वबळावर सर्व 288 जागा लढवू अशी घोषणा केली आहे. आताही वंचित आघाडी स्वबळावर लढणार असेल तर त्याचा लाभ कोणाला होणार? निश्‍चितच भाजपाला. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचा विरोधी पक्षनेता काँग्रेस राष्ट्रवादीऐवजी वंचित बहुजन आघाडीचा असेल असे म्हणून वंचितांमध्ये हवा भरीत आहेत. लोकसभा निवडणुकीत डझनाहून अधिक जागांवर वंचितने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मातब्बर पराभूत झाले. लोकसभेला प्रकाश आंबेडकरही पराभूत झाले. परंतु त्यांनी आघाडीचे केलेले नुकसान सर्वाधीकच होते. इम्तियाज जलील ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या जागेतील विधानसभेच्या सहा सिटही त्यांना सोडावयास आंबेडकर तयार नाहीत. जलीलना आमची मते मिळाली पण मुस्लिमांची मते आम्हाला मिळाली नाहीत, मशिदीत जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने ती मिळवली असे आंबेडकर म्हणत राहिले. आता एमआयएम आपल्या भाषेतील सोशल इंजिनिअरिंग करु लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्हयातील वडगाव शेरी मतदार संघातील नगरसेविकेचा पती, जो ख्रिश्‍चन आहे त्याला तिकिट देऊ केले आहे. काँग्रेसने आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हटले होते. विधानसभेच्या जागा वाटपासाठी निमंत्रित करताच त्यांनी काँग्रेसकडून त्याचा खुलासा मागितला आणि 144 जागा मागितल्या व राष्ट्रवादी सोडून बोला हा त्यांचा ठेकाही कायमच ठेवला. म्हणजे कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी युती होणारच नाही हे लक्षात घेऊन आंबेडकरांनी जाागंच्या ऑफर दिल्या. आंबेडकरांचा भाजपाला नेहमी मदत करण्याचा डाव आता त्यांचे सहकारी जाणू लागले आहेत. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनीही यातूनच आंबेडकरांवर टीका करून त्यांची साथ सोडली. उपराकार लक्ष्मण माने यांनीही रा. स्व. संघ विचारसरणीचे लोक आंबेडकरांभोवती जमले आहेत असा आरोप करत पक्ष सोडून स्वतःची आघाडी स्थापन केली होती. एकूणच आंबेडकर पुन्हा एकदा सेक्युलर मतात फूट पाडण्याचे कारस्थान करुन युतीला सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. गेल्यावेळीच नव्हे तर नेहमीच आंबेडकरांच्या भूमिकेमुळे युतीचा फायदा झाला आहे. मात्र आंबेडकर हे मानायला तयार नाहीत. आपली उपद्रवक्षमता नेहमीच दाखविण्याची ते भाषा करतात. आपणास तात्कालिक राजकारण करायचे नाही असे ते सांगत आले असले तरीही त्यांच्या दीर्घकालीन नियोजनाला एमआयएमने तलाक देऊन धक्का दिला. वंचितला मिळालेले यश आणि आंबेडकरांची भाजपा-शिवसेना यांना अप्रत्यक्ष मदत करण्याची भूमिका याबद्दल मित्रपक्षांसह मतदारांतही प्रचंड संभ्रम आहे. विरोधकांच्या मते आंबेडकर स्वतःच्या शक्तीपेक्षा जास्तच चित्र रंगवत आले आहेत. त्याचबरोबर ठोसपणे सेक्युलर पक्षांच्या बाजुने नेहमीच राहातीलच असे सांगता येत नाही. अशा स्थितीत आंबेडकर पुन्हा एकला चाललो चा नारा देत भाजपा-शिवसेनेचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा प्रकारे दुहेरी भूमिका घेणारेच जातियवादी शक्तींना खतपाणी घालत आले आहेत. आंबेडकरांना जर खरोखरीच जातियवादी शक्तींचा पराभव व्हावा असे वाटत असेल तर त्यांनी सेक्युलर पक्षांसोबत जावे. त्यात किती जागा मिळतात हे महत्वाचे नाही, तर विचार महत्वाचा आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे.
----------------------------------------------------------

0 Response to "वंचितचा घटस्फोट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel