-->
फुकटचा फंडा / पराभवाची मिमांसा

फुकटचा फंडा / पराभवाची मिमांसा

बुधवार दि. 05 जून 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
फुकटचा फंडा
दिल्लीत आता निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सत्तेत येऊ इच्छिणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता राजकीय पटलावर विजयी होण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत. त्यातील त्यांची महिलांना मेट्रो किंवा डीटीसीच्या बसमध्ये मोफत प्रवास करण्याची दिलेली सुविधा. ही घो,णा एैकताच काहीचे आश्‍चर्यही वाटेल. परंतु होय हे खरे आहे. कोणत्याही आर्थिक गटातील महिलेला आता यापुढे दिल्लीतून सार्वजनिक सेवेमार्फत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र ज्या महिलांना तिकिट काढणे परवडते त्यांनी मोफतचा प्रवास करु नये व तिकिट काढावे असे आवाहन करण्यास केजरिवाल विसलेले नाहीत. केजरीवाल यांचा निवडणुकीचा हा फंडा असला तरीही त्याचे स्वागत झाले पाहिजे. यात कुठल्याही अटी-शर्तींचा समावेश करण्यात आलेला नाही. एवढेच नव्हे, तर राज्यात नवीन बस आणल्या जाणार असून त्या सर्वांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास सुविधा देण्यात येणार आहेत असाही दावा केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत याच महिन्यात 25 ते 30 नवीन बस येणार आहेत. पुढील 12 महिन्यांत दिल्लीत डीटीसी बसची संख्या वाढून 3 हजार केली जाणार आहे. सर्वच बसमध्ये अत्याधुनिक कॅमेरे लावले जातील. महिलांना मोफत प्रवासाची ही योजना येत्या 2-3 महिन्यांत पूर्णपणे लागू केली जाईल. मेट्रो विभागाला याबाबत एका आठवड्याच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे या सुविधेची सुरुवात करण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगीची गरज लागणार नाही. केजरिवाल यांच्या सांगण्यानुसार, आम्ही उर्वरीत लोकांसाठी भाडेवाढ करत नाही. आम्ही सबसिडी देत आहोत. या संपूर्ण योजनेसाठी जवळपास 700 ते 800 कोटी रुपये खर्च येणार आहे. याचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. केजरीवाल यांनी निवडणुकीसाठी हा फंडा काढला असला तरीही दिल्लीतील या सरकारच्या अनेक योजना त्यांनी जनतेच्या हितासाठी चांगल्यारितीने राबविल्या आहेत. प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली सरकारने अतिशय महत्वाची कामगिरी केली आहे. दिल्ली सरकारच्या शाळांचा दर्जा चांगल्या रितीने वाढवल्याने आता खासगी शाळांऐवजी या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची रांग लागते. देशातील हा पहिलाच प्रयोग केजरीवाल यांच्या सरकारने यशस्वी करुन दाखविला. त्याचबरोबर पाणी व वीजेच्या दरातही मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. देशात सर्वात प्रथम स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे राज्य ठरले आहे. दिल्लीत शेती कमी प्रमाणात होते परंतु तेथे त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारने जनहिताच्या अनेक गोष्टी केल्याने त्यांना यावेळी निवडणुकीत चांगले यश लाभेल असा अंदाज आहे. आता देखील महिलांना मोफत प्रवासाचे दिलेले आश्‍वासन स्वागतार्ह ठरावे.
पराभवाची मिमांसा
लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळाले व काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आता हा पराभव काँग्रेसच्या त्रुटींमुळे झाला आहे की ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाला आहे याची शहानिशा करण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. कॉँग्रेसची पराभवाची मिमांसा त्यांना भविष्यासाठी मदतकारक ठरेल. पराभवाच्या धक्क्यातून कॉँग्रेस एवढ्या लवकर सावरण कठीण आहे. कारण गेल्या वेळपेक्षा यावेळी पक्षाच्या सदस्यंची संख्या वाढली असली तरीही अनेक दिग्गजांचे पराभव झाले आहेत. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांचा अमेठीत झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे नेमके कारण कोणते आहे? अनेकांच्या मनात अजूनही इव्हीएम बाबत शंका आहे. मात्र कॉँग्रेसने अजूनही अधिकृतपणे या पध्दतीला विरोध केलेला नाही. परंतु पराभवाची मिमांसा करताना ईव्हीएमच्या संदर्भातील असलेल्या शंकाही दूर झाल्या पाहिजेत ही कॉँग्रेसची भूमिका योग्यच आहे. त्यादृष्टीने आता विचारमंथन सुरु झाले आहे. एकेकाळी 300हून अधिक जागा जिंकणार्‍या काँग्रेसचा इतका दारूण पराभव का झाला याचे प्रत्येक मतदानकेंद्रानुसार विश्‍लेषण काँग्रेस करणार आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक 20 मागवण्यात आला आहे. फॉर्म क्रमांक 20मध्ये प्रत्येक मतदानकेंद्रावर उमेदवाराला किती मते मिळाली याची तपशीलवार माहिती दिली असते. प्रत्येक मतदानकेंद्रातील परिक्षेत्रात मतदानाआधी काँग्रेस सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेचे निकाल आणि उमेदवाराला मिळालेली एकूण मते याची चाचपणी काँग्रेस करणार आहे. जर दोन्ही आकड्यांमध्ये जास्त फरक नसेल, इतर काही कारणांमुळे मते कमी मिळाली असतील तर संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष रणनीती आखणार आहे. पण जर या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास संबंधित मतदानकेंद्रांवर ईव्हीएम घोटाळा तर झालेला नाही याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे. ईव्हीएम हॅक होण्याचे, ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आता काँग्रेसच्या तपासणीत काय स्पष्ट होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
--------------------------------------------------

0 Response to "फुकटचा फंडा / पराभवाची मिमांसा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel