-->
फुटीच्या उंबरठ्यावर

फुटीच्या उंबरठ्यावर

गुरुवार दि. 06 जून 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
फुटीच्या उंबरठ्यावर
उत्तरप्रदेशात लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष यांच्या आघाडीचा प्रयोग फसल्यामुळे आता या दोन्ही पक्षात कुरबुरी सुरु झाल्या असून ही आघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील राजकारण हे फार महत्वाचे ठरते. या राज्यातून जशी पंतप्रधानाची निवड होते तसेच येथील सर्वाधिक जागा पटकाविणारा पक्ष हा केंद्रात सत्तेत असतो हे गणित नेहमीचे पक्के असते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येथून तब्बल 73 जागा पटकावत भाजपाने इतिहास घडविला. खरे तर राज्यातील राजकीय स्थिती भाजपासाठी तितकीशी अनुकूल मानली जात नव्हती. भाजपाला नेस्तनाबूत करायचे असेल, तर एकजूट व्हायलाच हवे, या हेतूने एरवी एकमेकांना पाण्यात पाहणारे सपा व बसपा हे पक्ष यानिमित्ताने एकत्र आले. त्यामुळे युपीमध्ये भाजपाला मोठा फटका बसणार व मायावती अखिलेश यांची सरशी होणार, असा राजकीय पंडितांसह विविध एक्झिट पोलचाही अंदाज होता. प्रत्यक्षात येथे भाजपाने 62 जागा पटकावत आपले राज्यातील वर्चस्व कायम टिकवले. सपा-बसपाला केवळ 15 जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपाला अनपेक्षीत विजय मिळाला असला तरी जो विजय आहे तो मान्य करुन आता विरोधकांना पुढे जावे लागणार आहे. आजमितीला भाजपा हा देशातील सर्वात शक्तिशाली राजकीय पक्ष बनला आहे. अशा सत्ताधारी पक्षाशी लढताना जे चातुर्य या दोन पक्षांच्या नेत्यांकडून दाखविले जाणे अपेक्षित होते, तसे ते दाखविले गेले नाही. खरे तर या आघाडीने कॉँग्रेस पक्षाला यातून वगळले होते. जर त्यांनी कॉँग्रेसला सोबत घेतले असते तर काहीसे चित्र वेगळे दिसले असते. मात्र मोदी लाट एवढी तीव्र होती की फारसा काही बदल दिसलाही नसता. या निवडणुकीत सपापेक्षा बसपाला अधिक म्हणजे दहा जागा मिळाल्या असल्या तरीही सपा कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले व यादव समाजाची मते बसपाला हस्तांतरीत झाली नसल्याचा मायावतींचा निष्कर्ष एकांगी ठरतो. यादव घराण्यातील अंतर्गत वादामुळे सपासारखा पक्ष सध्या पोखरला गेला आहे. त्यामुळे अखिलेश यांच्यासारखा आश्‍वासक चेहरा असूनही पक्षाची पुरती वाताहत झाली. तसेच मायावती यांची प्रतिमा ही काही विकासात्मक दृष्टी असलेल्या राजकारणी अशी नाही. त्यात त्या पंतप्रधानपदाची जबरदस्त छुपी महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. सपाच्या सोबतीने जाऊन आपल्याला काही फायदा होत नाही हे मायावतींनी हेरल्यामुळे आता त्या आघाडी तोडण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. लवकरच उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 11 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशचे राजकारण नव्या वळणाने जात असून, त्याचे दूरगामी परिणाम या राज्यावर होऊ शकतात. विरोधकांचा जितका म्हणून शक्तीक्षय होईल, तितका तो भाजपालाही हवाच आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष अधिक दुबळे होत गेल्यास विधानसभेकरिता योगींचा मार्ग अधिक सुकर होईल, असेच धोरम भाजपाचे असेल. त्यादृष्टीने ही आघाडी फुटल्यास भाजपालाच मदत होणार आहे. कॉँग्रेसची तर उत्तरप्रदेशातील स्थिती अतिशय दयनीयच म्हणावी लागेल. कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधींचा अमेठीत पराभव होऊ शकतो, हे पाहिल्यास उत्तरप्रदेशात कॉँग्रेसला चांगले दिवस यायला बराच काळ लागेल असेच दिसते. एकेकाऴी कॉँग्रेसची या राज्यात पक्कड होती. ब्राह्मण, दलित, मुस्लिम यांची एकगठ्ठा मते कॉँगरेसची हक्काची होती. परंतु ही सर्व गणिते आता बदलली आहेत. गेल्या तीन दशकात कॉँग्रेस येथे राज्यात सत्तेतही नाही. कॉँग्रेसला प्रियांका गांधींकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु हे नाणे दखील काही चालले नाही. परंतु दीर्घकालीन विचार करता प्रियांका हे लोकांसाठी आशास्थान ठरु शकते. त्यांच्यात लोकांना आजही इंदिरा गांधी दिसतात. परंतु त्यांच्या लोकप्रियतेतून मतांत रुपांतर व्हायला अजून काही काळ जावा लागेल असेच दिसते. सध्या तरी तेथील कॉँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पक्षाची संघटना पूर्णपणे खीळखीळी झाली असून पक्षाचा विविध घटकांमध्ये असलेला जनाधार संपत चालला आहे. कॉँग्रेसचा अध्यक्षच या राज्यातून पराभूत होणे ही घटनाच यासंबंधी फार बोलकी ठरते. केवळ उत्तरप्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात कॉँग्रेसची स्थिती अतिशय वाईट आहे. यातून पक्षाला सावरण्यासाठी अगोदर नेतृत्व खंबीरपणे सावरावे लागेल. राजस्थानमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या मुलाच्या पराभवाचे खापर सचिन पायलट यांच्यावर फोडल्याने काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष चव्हाटयावर आल्याचे दिसते. विजयाचे श्रेय घेण्यासाठी हजारो हात सरसावतात. परंतु पराभवाचे श्रेय घ्यायला कुणी नसतो. असेच कॉँग्रेसचे झाले आहे. राहूल गांंधी यांनी एकखांबी तंबू भाजपा व मोदींविरोधात लढविला परंतु त्यांना म्हणावी तशी साथ लाभली नाही. काँग्रेसला फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घ्यावी लागणार आहे. अर्थात हे कधी होईल हे आत्ता सांगता येत नाही.
----------------------------------------------------

0 Response to "फुटीच्या उंबरठ्यावर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel