-->
कॉँग्रेस कात टाकावी लागणार

कॉँग्रेस कात टाकावी लागणार

रविवार दि. 02 जून 2019 च्या अंकासाठी चिंतन - 
-----------------------------------------------
कॉँग्रेस कात टाकावी लागणार
------------------------------
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वात जुन्या असलेल्या व स्वातंत्र्यलढ्याची पार्श्‍वभूमी लाभलेल्या कॉँग्रेस पक्षाला कधी नव्हे एवढा जबरदस्त शॉक लागला आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा कॉँग्रेसला आठ जागा जास्त आल्या असल्या तरी अपेक्षेपेक्षा त्या खूपच कमी होत्या. 2014 च्या नुकसानीतून कॉँग्रेस पक्ष काहीसा सावरत आहोता व सत्ताधारी भाजपाला एक मोठे आव्हान देण्याच्या मनस्थितीत असताना त्यांना अनपेक्षितरित्या मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यातून कॉँग्रेस पक्षाला सावरायला बराच काळ जावा लागेल. पक्षातील अनेक जण भाजपाच्या गळाला यापूर्वीच लागले आहेत तर अनेकांनी आता भाजपाची वाट धरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाला खर्‍या अर्थाने मानणारे व केवळ सत्ता आहे म्हणून कॉँग्रेसमध्ये रहायचे असे न मानणारे लोक आता पक्षात आहेत. त्यामुळे आताचे कॉँग्रेसजन हे खर्‍या अर्थाने पक्षाशी निष्ठावान असणारेच ठरणार आहे. सध्याची जी कॉँग्रेसची स्थीती आहे ती यापूर्वी भाजपा किंवा त्यावेळच्या जनता पक्षात अनेकदा आली आहे. मात्र सलग दहा वर्षे सत्तेत नसण्याची ही कॉँग्रेसची पहिलीच वेळ आहेे. पूर्वीच्या विरोधकांना म्हणजे सध्याच्या सत्ताधर्‍यांसाठी अशा प्रकारची वेळ येणे हे काही नवीन नाही. त्यांच्यासाठी उलटी स्थिती आहे. सलग दहा वर्षे भाजपाने सत्ता गाजविण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. त्यामुळे कॉँग्रेससाठी हा एक मोठा झटका म्हटला पाहिजे. 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचे अवघे 44 खासदार लोकसभेत निवडून आले होते, आता मोदींच्या महालाटेत 52 खासदार निवडून आले. पण ही पक्षाची प्रगती नाही. कारण या निवडणुकीत भाजपचे तीनशे पेक्षा जास्त खासदार निवडून आले. तसेच अध्यक्ष राहुल गांधी यांचा  त्यांच्या परंपरागत अमेठी मतदार संघात पराभव झाला. देशात काँग्रेसच्या तब्बल नऊ माजी मुख्यमंत्र्यांचा आणि अनेक प्रदेश काँग्रेस अध्यक्षांचा पराभव झाला. यावेळीही खासदारांचे किमान संख्याबळ नसल्याने काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याची शक्यता नाही आणि त्याहून सर्वात मोठा धक्का म्हणजे, देशातील एकोणीस राज्यांत काँग्रेसचा एकही खासदार निवडून आलेला नाही. ज्या पक्षाने साठ वर्षे सत्ता ुपभोगली अनेक राज्यात सत्ता राबविण्याचा विक्रम केला त्यांची मोदी-शहांच्या जोडगोळीने अक्षरशह: धुळदाण केली. यातून कॉँग्रेस पक्ष बाहेर पडेल का असा सवाल आहे. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी अपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष संघटना पूर्णपणे दुबळी झाली असून पक्षाची केडर तर संपुष्टातच आली आहे. आणीबाणी उठविल्यावर काँग्रेस विरोधात देशात लाट आली होती, त्यावेळी जनता पक्षाची लाट आली व हा पक्ष सत्तेत आला. त्यावेळी देखील पक्षाचे नुकसान एवढे झाले नव्हते. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीत सलग तीन वेळा मुख्यमंत्री असलेल्या शिला दिक्षीत यांना जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व जाट नेते भूपिंदरसिंग हुडा, त्यांचे चिरंजीव दीपेंदरसिंग हुडा, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत, मध्य प्रदेशमध्ये दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या दिग्विजय सिंग, कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुुख्यमंत्री अशोक चव्हाण, अरूणाचलमध्ये माजी मुख्यमंत्री नवाब तुकी, मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकूल संगमा, उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर अशा अनेक दिग्गजांचा पराभव झाला. काँग्रेसचे 52 खासदार निवडून आले पण 19 राज्यात काँग्रेसला आपले खाते ही उघडता आलेले नाही. राहुल गांधी यांचा केरळमधीव वायनाडमधून चार लाख मतांनी विजय झाला असला तरी त्यांचा अमेठीत पराभव झाल्याने त्यांना आनंद साजरा करता आला नाही. ओरिसा, राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड अशा राज्यात काँग्रेसच्या हाती भोपळा आला आहे. जर केरळमधून काँग्रेसच्या पंधरा व पंजाब-तामिळनाडूतून प्रत्येकी आठ जागा निवडून आल्या नसत्या तर पक्षाला अवस्था अतिशय वाईट झाली असती. तामिळनाडूमध्ये काँग्रेसला यश मिळाले ते द्रमुकने केलेल्या जागा वाटप समझौत्यामुळे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीस गड, कर्नाटक, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश अशा राज्यात काँग्रेसला एक किंवा दोन जागा रडतखडत मिळाल्या आहेत. या पराभवाची जबाबदारी पक्षाध्यक्ष राहूल गांंधी यांनी स्वीकारुन राजीनामा सादर केला आहे व ते त्यांचे केवळ नाटक नाही. बहुदा राहूल गांधी राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत असेच दिसते. असा स्थितीत कॉँग्रेसला गांधी कुटुंब वगळता अन्य नेता नेतृत्वपदी लाभण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहूल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारण्यात काही गैर नाही, परंतु सध्याच्या स्थितीत पक्षाला नव्याने नेतृत्व देण्यासाठी उभे राहिले पाहिजे. त्यांनी मोदींचा पराभव होण्यासाठी गेली तीन वर्षे जी झुंज दिली ती वाखाणण्याजोगीच आहे. एक प्रवळ विरोधी पक्ष देण्यासाठी त्यांनी प्रयज्ञांनी पराकाष्टा केली मात्र त्यात ते अपयशी ठरले. राफेलचा भ्रष्टाचार असो, जी.एस.टी. ची अन्यायकारक अंमलबजावमी, नोटाबंदी, शेतकर्‍यांची कर्जमाफी यासारख्या अनेक मुद्यांवर रण माजवले. भाजपाला काही बाबतीत ते भारी पडू लागले होते. गेल्या डिसेंबर महिन्यांत त्यांनी तीन हिंदी भाषिक राज्यात कॉँग्रेसचा विजय खेचून आणला. परंतु सर्वसाधारणपणे पाहता त्यांची लढत ही एकतर्फीच होती असे दिसायचे. कारण त्यांच्या भोवती असलेले नेते, कॉँग्रेसजन मात्र लढाई हरल्याच्या मनस्थितीत दिसायचे. आमची लढाई ही वैचारिक आहे. हिंदुत्ववाद विरुध्द सर्वधर्मसमभाव याची ही लढाई आहे हे ते ठासून सांगत होते. परंतु भाजपाच्या हिंदुत्वकेंद्रीत राजकारणाने त्यांची हाक दुर्बळ झाली होती. पुलवामामध्ये शहीद झालेले जवान यातून देशाची सुरक्षा व राष्ट्रवाद हे मोदींनी मांडलेले मुद्दे भारी ठरले. कॉँग्रेस पक्षाला आता कात टाकावी लागणार आहे. त्यासाठी त्यांच्या हातात आता तब्बल पाच वर्षाचा कालावधी आहे. जे लोक पक्ष सोडून जाणार आहेत त्यांची चिंता न करता नव्याने पक्षाची बांधणी करावी लागेल. भविष्यात मोदी सरकार जे जनविरोधी निर्णय घेईल तसेच हिंदुत्वकेंद्रीत राजकारण करील त्यातून जनविरोधी मत तयार करतानाच कॉँग्रेस पक्षाला आपली संघटना कणाकणाने वाढवावी लागेल. आपल्या पक्षाचा जन्म हा सत्तकारमासाठीच आहे ही समजून काढून टाकून एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागणार आहे. त्यासाठी समविचारी पक्षांची मोट बांधण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागतील. यातून कॉँग्रेसला नवसंजिवनी मिळू शकते. गांधी-नेहरुंचा विचारच देशाला तारु शकतो, हे तरुण पिढीला पटवून सांगावे लागेल. इतिहासाचा जो विपर्यास चालविला आहे त्याविरोधात ठामपणाने उभे राहून खरा इतिहास तरुणांना सांगावा लागेल. त्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करावा लागेल. अर्थात हे करण्यासाठी गांधी घराण्यातीलच नेता असण्याची आवश्यकता काँग्रेसला लागेल. राहूल गांधी अध्यक्षपदासाठी तयार नसतील प्रियांकांच्या गळ्यात ही माळ घालावी लागेल. परंतु सध्याच्या काळात कॉँग्रेसवर एक मोठी ऐतिहासिक कामगिरी आली आहे. केवळ सत्ता मिळविणे नाही तर आपली वैचारिक लढाई लढण्यासाठी व आपल्या विचारांंची पुर्नस्थापना करण्यासाठी कॉँग्रेसला कात टाकावी लागणार आहे.
--------------------------------------------------------------- 

0 Response to "कॉँग्रेस कात टाकावी लागणार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel