-->
राजकीय मेळा

राजकीय मेळा

बुधवार दि. 16 जानेवारी 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राजकीय मेळा
कुडकुडणार्‍या थंडीत उत्तरप्रदेशात सध्या अर्धकुंभ मेळा सुरु झाला आहे. गेले वर्षभर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपासून सर्व प्रशासन या कामी जुंपलेे होते. योगी मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांना त्यांच्या मंत्रालयाची कामे बाजूला टाकून सर्व मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, विदेशी राजदूतांना कुंभचे आमंत्रण देण्यासाठी पिटळण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांच्यासाठी हा एक मोठा मेळावा असून आपल्या आगामी लोकसभा निवडणुकीचा विजयाचा मार्ग याच अर्धकुंभ मेळाव्याच्या मार्फच जातो अशी त्यांची पक्की समजूत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी स्मृती इराणी यांनी पहिल्याच दिवशी कडाक्याच्या थंडीत डुबकी मारल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. एकूणच काय केंद्र व राज्य सासन यात सक्रिय सहभागी होऊन याव्दारे आपल्या हिंदू मतांची बेगमी करु पाहत आहेत. परंतु हा अर्धकुंभ असो की कोणताही कुंभमेळा हा केवळ हिंदुचा नाही तर त्यातून एक सर्वधर्मांचा मेळावा असतो. यात निश्‍चितच हिंदुंच्या भावना दडलेल्या आहेत. परंतु कुंभमेळा नाथपंथी, कबीरपंथी, हिंदू, मुस्लिम सगळ्यांना नेहमीच सामावून घेणारा उत्सव राहिला आहे. आजवर यात स्थानिक उर्दू शायरांनी कार्यक्रम सादर केले आहेत. ऐंशीच्या दशकात येथे विविध धर्मिय नाट्यसमूह स्थापन करून कुंभमेळ्यात नुक्कड नाटके सादर करीत असत. हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही धर्मातल्या कलावंत त्यात आवर्जून भाग घेत असत. शहराच्या पश्‍चिमेला मुख्यत: मेळ्याशी संबंधित घडामोडी घडतात, इथे वस्तीला असलेल्या मुस्लिम आणि शीख धर्मीयांनी जवळपास प्रत्येक कुंभमेळ्याप्रसंगी भाविक-पर्यटकांसाठी चहा-पाणी-औषधांची सेवा पुरवली जाई. त्यामुळे हा जरी हिंदुचा उत्सव असला तरी यात सर्वधर्मीयांचा सक्रिय सहभाग असे. नव्वदच्या दशकानंतर या मेळ्याचे बाजारीकरण सुरु झाले. आता तर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात हिंदुत्वकेंद्रीत ब्रँडिंग होत आहे. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने आपल्या विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी यात सक्रिय सहभाग दाखविणे राज्यकर्त्यांना गरजेचे वाटू लागले आहे. याचा परिणाम हिंदू आणि मुस्लिम धर्मातील सौहार्दभाव कमी होत जावून संशय,भय आणि अविश्‍वास वाढीस लागण्यात होणार आहे, ही यातील दुर्दैवी बाब ठरावी. गेल्या दोन वर्षात अलहाबादमधल्या संगमाच्या आसपासच्या गल्यांचा कायापालट करण्यात आला आहे. यासाठी करोडौो रुपये खर्ची करण्यात आले आहेत. शहरातली जुनीपुराणी घरे-इमारती, अलाहाबाद विद्यापीठाच्या भिंती, एअरपोर्ट, बसअड्डे सरकारी खर्चाने सजवले आहेत. त्यावरची मोठमोठी पौराणिक, ऐतिहासिक, समकालीन पुरुषांची, देवदेवतांची म्युरल्स येणार्‍या-जाणार्‍यांचे डोळे दिपवून टाकत आहेत. त्यात कृष्णापासून रामापर्यंतच्या पुराणपुरुषांच्या चित्तवेधक चित्रकृती आहेत. भित्तीचित्रांवर लता मंगेशकर, बिसमिल्ला खान, उ. झाकीर हुसेन यासारखे दिग्गज कलावंतही झळकताहेत. स्थानिक तसेच देशातल्या आणि विदेशातल्या शेकडो चित्रकार, शिल्पकार, नियोजनकारांच्या कलेचे जणू खुले प्रदर्शन भरल्याचा हा माहोल आहे. सर्वच भव्य दिव्य करण्याचा शासनाचा संकल्प असला तरीही संगमावर भरणार्‍या कुंभमेळ्याची बहुसांस्कृतिक, बहुधर्मीय परंपरा खंडित झाल्याचेही पाहायला मिळत आहे. हे बदललेले स्वरुप काहीसे निराशाजनकच ठरावी. आपम इतिहापासून मागे जात असल्याचे हे लक्षण आहे. यंदाचे बोधचिन्ह उघडउघड हिंदूकेंद्री बनवण्यात आल्याचे अनेकांचा आक्षेप आहे. त्यात प्रसिद्ध चित्रकार अशोक भौमिक यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आजवर यातून आपले जे बहुसंस्कृतीचे दर्शन होत होते ते आता लोप पावले आहे. पंतप्रधान मोदींनी अलाहाबाद येथे गंगा आरती करून आधीच त्याला राजकीय रंग चढवला आहे. सरसंघचालक मोहन भागवत या महिन्याच्या अखेरीस चार दिवस या अर्धकुंभमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात ते विहिंपसोबत धर्मसंसदेत भाग घेतील. या धर्मसंसदेत संत-महंत राममंदिर प्रश्‍नावर आपला निर्णय जाहीर करतील. याप्रसंगी, योगी आदित्यनाथांपासून, अमित शहापर्यंतचे राजकीय नेते आणि बाबा रामदेवांपासून श्रीश्री रविशंकरांपासूनचे अध्यात्मिक गुुरु सहभागी होणार आहेत. यातून सत्ताधार्‍यांचा अजेंडा काही लपून राहाणार नाही. गंगा-जमुना या दोन नद्यांचे येथे होणारे मिलन हिंदू-मुस्लिम संस्कृतीचे मिलन मानले गेले आहे. एवढेच कशाला,भारतात मकर संक्रातीपासून जिथे कुठे नद्यांचा संगम आहे, तिथे मेळा भरत आला आहे. उत्तर प्रदेशात कुशीनगर-देवरिया भागात त्रिमोहानी मेळा गेली कित्येक दशके भरतो आहे. उ.प्रदेश, बिहार आणि नेपाळ या त्रिकोणात जिथे नद्यांचे मिलन होते, तेथे मेळा भरण्याची जुनीच परंपरा आहे. भाविक, परदेशी पर्यटक, विविध कंपन्या, संस्था यांच्या सरबराईसाठी योगी सरकारने जवळपास 4200 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या वेळच्या कुंभमेळ्यापेक्षा यावेळी अडीज पट जास्त खर्च केला जात आहे. आपले सरकार हे हिंदुत्ववादी आहे हे ठासविण्याचा हा एक केंद्र व राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या अर्धकुंभ मेळाव्याचे भगवीकरण करुन त्यातून आपल्याला सत्तेची दारे पुन्हा उघडली जातील ही मोदी सरकारची इच्छा काही पूर्ण होणारी नाही.
----------------------------------------------------------------

0 Response to "राजकीय मेळा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel