-->
भागवतपुराण; धुक्यातून...धुक्याकडे

भागवतपुराण; धुक्यातून...धुक्याकडे

रविवार दि. 23 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
भागवतपुराण; धुक्यातून...धुक्याकडे
-----------------------------------------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाची महती ासंगण्यासाठी बोलाविलेल्या दिल्लीतील तीन दिवसांच्या बैठकीत जे काही विचार मांडले ते पाहता, हा संघाने आपल्यात केलेला बदल आहे की, हा वैचारिक गोंधळ आहे असे विचार मनात येतात. यातील परस्पर विसंगत विधाने, संघाच्याच इतिहासाशी बेईमानी आणि लोकांच्या मनात सतत संभ्रम निर्माण करण्याच्या सवयीचे उत्तम उदाहरण आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केली आहे, ती रास्तच म्हणता येईल. डॉ. रत्नाकर महाजन हे एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहेत शिवाय ते कट्टर संघाचे विरोधक म्हणून ओळखले जातात. भागवतांनी आपल्या भाषणात कॉग्रेसच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान मोठे महत्वाचे असल्याचे मान्य केले आणि या पक्षाने देशाला अनेक थोर नेते दिले, असे त्यांनी प्रशस्तीपत्रकही दिले आहे. अशा प्रकारे सध्या कॉग्रेसला सर्टिफिकेट देण्याचे प्रयेजनच नव्हते. कॉग्रसेचे योगदान व त्यांचे नेते याविषयी दुमत असण्याचे कारणच नाही. मात्र एकीकडे बागवत असे बोलत असताना त्यांची राजकीय विंग भारतीय जनता पक्ष मात्र कॉग्रेसला संपविण्याची भाषा करीत असते. त्यामुळे भाजपाची भूमिका त्यांना मान्य नाही हे देखील तेवढेच सत्य आहे. त्याचबरोबर एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, 120 वर्षे अस्तित्वात असलेला संघ मात्र आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबाबत मौन राखून असतो. हेडगेवारांचे व्यक्तिगत उदाहरण सोडले तर गोळवलकरांपासून सर्व संघ स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची टिंगल टवाळी व विरोध करण्यातच धन्यता मानली, हा इतिहास आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर किती वर्षांनी संघाच्या कार्यालयावर देशाचा तिरंगा झेंडा फडकला याचेही उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे. संघ हे लोकशाही प्रधान संघटन आहे असे विधान मोहन भागवतांनी केले. संघाचा लोकशाहीवर एवढा दृढ विश्‍वास असेल तर संघाच्या कार्यप्रणालीचे एकचालकानुवर्तित्व हे वैशिष्ट्य कसे समजून घेणार? या तत्वाचाच प्रचार आजपर्यंत संघ शाखांवर म्होरक्याचे ऐका याचे, स्वयंसेवकाचे या गाण्याचे काय करणार? असा सवाल उपस्थित होतो. संघाच्या दृष्टीने राज्यघटना व तिरंगी झेंडा यांचे महत्त्व मोठे असून त्याबद्दल संघाला अभिमानच आहे असे खोटे विधान भागवतांनी केले आहे. या दोन्ही विषयी माधव सदाशिव गोळवलकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवरून आपला स्पष्ट विरोध त्यावेळी नोंदवला आहे. 14 ऑगस्ट 1947 च्या ऑर्गनायजर च्या अंकात तीन हा आकडा अशुभ असून तिरंग्याचा स्वीकार केला तर भारतावर अरिष्ट येईल असे विधान गोळवलकरांनी केले होते. घटनेबद्दलही त्यांना आक्षेप होता. त्यांच्या मते भारतीय संस्कृती व परंपरा यांना साजेशी मनुस्मृती उपलब्ध असताना अशा गोधडीछाप घटनेची काय गरज आहे असा प्रश्‍न त्यांनी विचारला होता, याची आठवण डॉ. महाजनांनी इतिहासाचे दाखले देत करुन दिली आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना आपल्या कामगिरीच्या आधारे त्या जिंकता येणार नाहीत अशी खात्री वाटल्याने पुन्हा एकदा राम मंदिराचे भूत त्यांनी उभे केले आहे. हिंदू आणि मुस्लीम हे भारतीयच असल्याने त्यांच्यात भेद करणे संघाला मान्य नाही आणि हिंदू राष्ट्र हे मुस्लिमांशिवाय असूच शकत नाही असे विधान त्यांनी केले आहे. मुस्लिम व्देश हा संघाचा पाया असून त्याला भागवत धक्का देत आहेत का असाही प्रश्‍न उपस्थित होतो. हे जर खरे असेल तर राम मंदिराच्या बरोबरच त्याच जागेवर त्यांच्या अनुयायांनी पाडलेली बाबरी मशीद पुन्हा बांधून द्यावी. परंतु असे दारिष्ट्य संघ दाखविणार नाही. गोळवलकर गुरुजींचे बंच ऑफ थॉट्स हे पुस्तक कालबाह्य झाले आहे व आता यात बदल करुन संघ कात टाकू इच्छितो असे भागवतांनां यातून म्हणावयाचे आहे का, असाही सवाल उपस्थित होतो. संघाने आपला पोषाख बदलला. हाफ पँटच्या एवजी खाकी फूल पँट वापरण्यास सुरुवात केली. आता ते पारंपारिक संघाच्या मुशीतले विचार बदलू पाहात आहेत, का असा प्रश्‍न उपस्थित होतो. परंतु संघावर विश्‍वास ठेवता येत नाही. कारण सरसंघचालक भागवत जातिय निकषावरील आरक्षण बंद करुन आर्थिक निकष लावावेत अशी भाषा यापूवी करीत होते, आता तेच भागवत आमचा जातिय निकषावरील आरक्षणास विरोध नाही असेही बोलतात. मात्र मराठा आरक्षणाला विरोधही करतात. त्यामुळे नेमकी संघाची भूमिका काय आहे असा प्रश्‍न पडावा. मुळातच संघाने आपली संघटना ही अत्यंत सावधपणाने तर कधी सत्ताधार्‍यांशी जुळवीत वाढवत नेली आहे. त्यांनी आपला केलेल्या संघटनेचा विकास थक्क करणारा आहे. इंदिराजींच्या हत्येनंतर याच संघाने कॉग्रेसला भरघोस मतदान केले होते असे म्हणतात. संघाचा मध्यमवर्गीय हा मुळातच पाया आहे. नंतर हा पाया विस्तारत ओ.बी.सीं.पर्यंत त्यांनी पोहोचविला. संघर्ष न करता जमेल तिथे जुळवत घेत, तर कधी अन्य पक्षांमध्ये आपले लोक पाठवित तसेच प्रशासनात, पत्रकारितेत आपली माणसे नेमत यशस्वी वाटचाल आजवर केली आहे. कॉग्रेसलाही आपली संघटना व सरकारी प्रशासनात संघ कसा पोखरत नेत आहे त्याचा अंदाज आला नाही. किंवा कॉग्रेसने बेफिकीरीने सत्ता केल्याने आज संघ फोफावला आहे. भागवतांची आताची नव्याने मांडलेली भूमिका ते या संघांच्या कर्मठांच्या मनात रुजेल का? त्यांच्यासाठी बंच ऑफ थॉट्स हा वेदग्रंथ आहे. त्यांची वेदनिष्ठा भागवतांना सांभाळायची आणि बदलायचीही आहे. देशातील सर्वधर्मसमभाव आत्मसात करायचा आहे. हिंदू-मुसलमानांची एकात्मता साधायची आहे. भागवतांची ही भूमिका खरी आहे की, हे देखील संघाचे दुहेरी वागणे असावे, असा प्रश्‍न पडतो. परंतु भागवतांनी व संघानेही आपली मनूविषयीची, मुस्लिमांविषयीची, आरक्षणाची व देशाच्या सर्वधर्मसमभाविषयी भूमिका स्पष्ट करुन मागे झालेल्या आपल्या चूका मान्य करुन पुढे जावे हेच उत्तम. कारण तीन दिवस झालेली भागवतांची भाषणे म्हणजे धुक्यातून धुक्याकडे जाण्याचा प्रयत्न आहे. यतील स्पष्टता पुढेे येणेे गरजेचे आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "भागवतपुराण; धुक्यातून...धुक्याकडे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel