-->
व्हॉटस्अ‍ॅप नकोसे झाले!

व्हॉटस्अ‍ॅप नकोसे झाले!

मंगळवार दि. 28 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
व्हॉटस्अ‍ॅप नकोसे झाले!
ज्या व्हॉटस्अ‍ॅपच्या जीवावर भाजपा सत्तेत आला ते व्हॉटस्अ‍ॅप आता त्यांना नकोसे झाले आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी याच व्हॉटस्अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी प्रचार करुन भाजपाचे मोदी सरकार सत्तेत आले. आता मात्र याच व्हॉटस्अ‍ॅपवरुन आपल्या विरोधात प्रचार होऊ लागल्याने भाजपाला हे व्हॉटस्अ‍ॅप आता नकोसे झाले आहे. परंतु काय करणार नाईलाज आहे. नवीन तंत्रज्ञान तुम्ही अव्हेरु शकत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे व्हॉटस्अ‍ॅप वरुन ज्या प्रकारे बातम्या फैलावतात त्यातून सरकारची मोठी बदनामी होते हे आता वास्तव सरकारला जाणवले. अनेकदा खोट्या बातम्यांमुळे सरकारची बदनामी होते. विरोधात असताना व्हॉटस्अ‍ॅपवरुन प्रचार व विरोधात प्रचार करणे सोपे होते. आता मात्र सत्तेत आल्यावर हेच व्हॉटस्अ‍ॅप शाप ठरु लागल्याचे भाजपाच्या नेत्यांना जाणवत आहे. त्यामुळे त्यांनी व्हॉटस्अ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुक या सोशल नेटवर्किंग सेवा पुरविणार्‍या कंपनीकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एक मागणी वगळता इतर सर्व मागण्या फेसबुकने मान्य केल्या आहेत. एक नाकारण्यात आलेली महत्वाची मागणी म्हणजे, व्हॉटस्अ‍ॅपवरील एखाद्या संदेशाचे उगमस्थान अथवा मूळ शोधून काढण्यासंदर्भातील होती. व्हॉटस्अ‍ॅपमध्ये सर्वप्रथम कुणी धाडला त्याची माहिती देणारे एक फिचर समाविष्ट करावे ही भारत सरकारची मागणी होती. परंतु फेसबुकने ही मागणी स्पष्ट शब्दात झिडकारली आहे. फेसबुकने दाखविलेली ही असमर्थता चुकीची नाही. व्हॉटस्अ‍ॅपमधील संदेशांची देवाणघेवाण करण्याची सेवा पुरविणार्‍या इतर कोणत्याही मेसेंजर सेवा पुरवठादाराकडे वापरकर्त्यांनी एकमेकांना धाडलेले संदेश वाचण्याची, बघण्याची अथवा त्यांनी एकमेकांना केलेले कॉल ऐकण्याची सुविधा नसते. वापरकर्त्यांनी पाठविलेले मेसेज किंवा केलेले कॉल त्यांच्या उपकरणातच असतात. एखाद्या उपकरणातून एखादा संदेश निघण्यापूर्वीच तो सुरक्षित केला जातो. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅप किंवा तत्सम मेसेंजर सेवांमधील संदेश, ज्याला संदेश धाडण्यात आला त्याशिवाय इतर कुणालाही वाचता, ऐकता किंवा बघता येत नाहीत. ही गुप्तता कंपनी पाळते किंवा ती आपोअपच पाळली जाते. अफवा व द्वेषमुलक मजकुराच्या प्रसारास आळा घालण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवरील संदेशांचे उगमस्थान शोधण्याच्या भारत सरकारच्या मागणीत वरवर बघता काहीही चुकीचे वाटत नसले तरी, एकदा का ही कळ सरकारच्या हाती लागली, की मग सरकारच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी त्याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हॉटस्अ‍ॅपने भारतीयांच्या जीवनात असे स्थान निर्माण केले आहे, की ज्याच्या हाती संदेशांचे उगमस्थान शोधण्याची कळ लागली, त्याला जणू काही कुणाच्याही शयनकक्षात वाटेल तेव्हा डोकावण्याचा परवानाच मिळाल्यासारखेच ठरावे. भारतात व्हॉटस्अ‍ॅपचा वापर करणार्‍यांची संख्या सुमारे 20 कोटींच्या घरात आहे. दररोज अक्षरश: अब्जावधी संदेशांचे व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून आदानप्रदान करीत असतात. व्हॉटस्अ‍ॅपच्या प्रचंड व्याप्तीचा लाभ घेऊन, खोट्या बातम्या, अफवा, द्वेषमुलक मजकूर पसरविण्यासाठी या मेसेंजर अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अलीकडेच भारतात मोठ्या प्रमाणात जमावाद्वारा हत्या (मॉब लिचिंग) झाल्या. त्यापैकी अनेक घटनांमागे व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून पसरविण्यात आलेल्या अफवा कारणीभूत होत्या. व्हॉटस्अ‍ॅपवर कोण कुणाच्या संपर्कात आहे, कोण कुणाला काय मेसेज पाठवित आहे, ही माहिती ज्याच्या हाती लागली तो व्हॉटस्अ‍ॅप वापरणार्‍या बहुतांश लोकांना वाटेल तसा झुकवू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. व्हॉटस्अ‍ॅपव्दारे कितीही व्देषमूलक मजकूर प्रसारित होत असला तरी तो मजकूर कुठून आला हे सांगण्यास कंपनीने नकार दिला हे योग्यच आहे. आता याबद्दल कंपनीवर सरकार कारवाईही करु शकत नाही. कारण यात वैयक्तिक स्वातंत्र्यांचा प्रश्‍न आहे.  लोकांच्या वैयक्तिक व्यातंत्र्याच्या प्रश्‍नात सरकार हस्तक्षेप करु शकत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. यातील दुष्ट प्रवृत्तींना लगाम लावला पाहिजे हे सरकारचे म्हणणे काही चुकीचे नाही. परंतु कायदा सुरक्षा व्यवस्था कसी राखायची हा सरकारचा प्रश्‍न आहे. त्यासाठी लोकांच्या वैयक्तिक व्यातंत्र्यांचा बळी दिला जाऊ शकत नाही.
कारण जर हा सरकारला अधिकार दिला तर त्याचा सरकारकडून गैरवापर होण्याचा धोका ही आहे. कदाचित सरकारला एखादा अनुचित वाटलेला संदेश जनतेला वाटणार देखील नाही, त्यामुळे यात सरकारने ढवळाढवळ करु नये हेच योग्य. फारफार तर सरकारने किंवा सत्तधारी पक्षाने एकादा चुकीचा संदेश फिरत असल्यास लगेचच त्याला उत्तर देणारा किंवा खुलासा करणारा संदेश त्वरीत पाठवावा, त्यातून वस्तुस्थिती जनतेला समजेल. लगेचच दुसरी बाजू जनतेपुढे येणे आवश्यक असते. असे जर सरकारने केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल. सध्या एखादा मेसेज फारवर्ड करण्यावर आता मर्यादा घालण्यात आल्या आहेत. याचा खरेखरीच काही फायदा झाला का ते अजून समजलेले नाही. एकूणच काय सोशल मिडियावर आता मर्यादा घालणे अशक्य आहे, हे वारंवार सिध्द झाले आहे. त्यावर जनतेचे प्रबोधन करणे हाच एक उत्तम उपाय आपल्या हाती आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "व्हॉटस्अ‍ॅप नकोसे झाले!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel