-->
शून्यातून पुन्हा एकदा भरारी...

शून्यातून पुन्हा एकदा भरारी...

रविवार दि. 14 जानेवारी 2018 च्या अंकासाठी लेख- 
------------------------------------------------
शून्यातून पुन्हा एकदा भरारी...
--------------------------------------------------
एन्ट्रो- मनोज तिरोडकर या मराठमोळ्या उद्योजकाचे नाव आठ वर्षापूर्वी अचानकपणे प्रकाशझोतात आले होते ते त्यांनी एअरसेल या टेलिकॉम कंपनीचे टॉवर्स आपल्या ताब्यात घेतले त्यावेळी. अब्जावधी डॉलरचे हे डिल झाले त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे त्यंची कंपनी मोबाईल टॉवरच्या क्षेत्रातील देशातील एक क्रमांकाची कंपनी झाली होती. परंतु हेच डिल तिरोडकर यांच्यादृष्टीने त्यांच्या व्यवसायाला अधोगतीला नेणारे ठरले. आता टेलिकॉम घोटाळा झालाच नाही हे स्पष्ट झाल्यावर मनोज तिरोडकर यांचा ग्लोबल ग्रुप पुन्हा एकदा नव्याने भरारी घेत आहे. अशा या मराठी उद्योजकाने आता पुन्हा एकदा शून्यातून भरारी घेतली आहे...
------------------------------------------------------------ 
मनोज तिरोडकर या मराठमोळ्या उद्योजकाचे नाव आठ वर्षापूर्वी अचानकपणे प्रकाशझोतात आले होते ते त्यांनी एअरसेल या टेलिकॉम कंपनीचे टॉवर्स आपल्या ताब्यात घेतले त्यावेळी. अब्जावधी डॉलरचे हे डिल झाले त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे त्यंची कंपनी मोबाईल टॉवरच्या क्षेत्रातील देशातील एक क्रमांकाची कंपनी झाली होती. परंतु हेच डिल तिरोडकर यांच्यादृष्टीने त्यांच्या व्यवसायाला अधोगतीला नेणारे ठरले. आता टेलिकॉम घोटाळा झालाच नाही हे स्पष्ट झाल्यावर मनोज तिरोडकर यांचा ग्लोबल ग्रुप पुन्हा एकदा नव्याने भरारी घेत आहे. अशा या मराठी उद्योजकाने आता पुन्हा एकदा शून्यातून भरारी घेतली आहे. 
भारतीय दूरसंचार क्षेत्रातील भ्रष्टाचार घोटाळ्याचा पर्दाफाश झाला त्यावेळी तिरोडकर हे लंडनमध्ये होते. ग्लोबल ग्रूप हा तिरोडकर यांचा समूह जरी या घोटाळ्यात गोवला जाण्याचा प्रश्‍न येणार नसला तरी या घडामोडीमुळे पुढे निर्माण होणारी गुंतागुंत ही अनर्थकारी नक्की असू शकेल, याची जाणीव तिरोडकरांना होती. त्यापूर्वी वर्षभर आधीच ग्लोबल ग्रूपच्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने एअरसेलचा दूरसंचार टॉवर व्यवसाय म्हणजे चेन्नई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या किंमतीला विकत घेतली होती. या बहुचर्चित सौद्यानंतर भारतभरातील 32,500 मोबाईल टॉवर्स आपल्या कब्जात आणलेली जीटीएल इन्फ्रा ही जगातील या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनणार, हे तर उघडच होते. टेलिकॉम उद्योगाचे भवितव्य तर उज्वल होते. मात्र भविष्यात या उद्योगातील (कथीत) घोटाळा त्यांना मारक ठरेल असे त्यांना कधीही वाटले नव्हते. फेब्रुवारी 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 2008 साली तत्कालीन दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री ए. राजा यांनी वितरित केलेले 100 हून अधिक दूरसंचार परवाने रद्द केले. या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात राजकारणी आणि सरकारी अधिकार्‍यांनी मोबाईल टेलिफोन कंपन्यांना परवाने हे बेकायदा पद्धतीने कमी किमतीत दिल्याचा आरोप केला गेला. याच परवान्यांच्या जोरावर मोबाईल कंपन्यांनी आपल्या लाखो ग्राहकांना 2 जी सेवा उपलब्ध करून दिली होती. खरे तर या घोटाळ्याशी जीटीएल इन्फ्राचा काडीमात्रही संबंध नव्हता. जीटीएलचे जे ग्राहक अर्थात परवानाधारक मोबाईल कंपन्या होत्या, त्यांचा होता. त्यामुळे जीटीएल इन्फ्रा व्यवसायासाठी ज्यांच्यावर अवलंबून होती तो व्यवसाय गमवावा लागला. कंपनीने भविष्यातील आशादायक आर्थिक गणिते मांडली होती तीच अचानक अस्थिर झाली. प्रचंड अशा दूरसंचार घोटाळ्याशी काहीही संबंध नसताना कंपनीचे मोठे नुकसान झाले. जी.टी.एल.ने 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सची पायाभूत सुविधांमध्ये केलेली गुंतवणूक नाकाम ठरली. परिणामी ग्लोबल ग्रुपला 2011 ते 2017 या दरम्यान करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तिरोडकरांच्या ग्लोबल ग्रुपवर अब्जावधींचे कर्ज होते. या संकटाला सामोरे जाण्यासाठी तिरोडकरांपुढे दोन पर्याय होते. त्यातील सर्वात सोपा होता तो कर्ज पुरवठादारांपुढे सरळ पाठ फिरवण्याचा. परंतु त्यांनी तसे केले नाही. अन्यथा ते विजय मल्ल्यासारखे झाले असते. अर्थात ते परत मायदेशी सुट्टीवरुन आले व कोणत्याच जबाबदारीपासून हात झटकले नाहीत. तिरोडकरांनी आपत्तीला तोंड देण्यासाठी पर्याय शोधला तो कॉर्पोरेट कर्ज पुनर्रचना योजनेचा. कंपनीच्या कर्जाचे रुपांतर समभागांत करून गुंतवणुकदारांना प्रमुख भागधारक करण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. या पुनर्रचनेमुळे तिरोडकर यांचा स्वतःचा कंपनीतील 80 टक्क्यांचा हिस्सा घटून 28 टक्क्यांवर आला. कंपनीचे प्रवर्तक म्हणून लागू असलेले वेतनही तिरोडकर यांनी नाकारले. एवढेच नव्हे तर पुनर्रचना प्रक्रियेदरम्यान त्यांनी कंपनीत आवश्यक म्हणून 170 दशलक्ष डॉलर्स गुंतवले. या संपूर्ण फेररचनेमुळे जीटीएल इन्फ्रा आणि सीएनआयएल या संयुक्तरीत्या कर्जमुक्तीच्या मार्गावर आल्या. पुनर्रचनेनंतर सर्व काही सुरळीत झाले तर येत्या दोन वर्षांत कंपनी ना नफा, ना तोटा या टप्प्यात येईल आणि चार वर्षांत पूर्णतः कर्जमुक्त होईल. कंपनीच्या उतरत्या काळाच्या ग्लोबल ग्रूपचे कर्ज तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके होते. आज टॉवर व्यवसायाचे कर्ज 700 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके घटले आहे. मनोज तिरोडकर अभिमानाने सांगतात की, अशा स्थितीतही आमच्या उद्योगाच्या नेटवर्कचा वापर वाढला. खर्च आणि उत्पन्नात वाढ झाली. या सगळ्या पुनर्रचनेत माझी खुप ऊर्जा खर्च झाली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षांत अन्य काही नवे करण्याची क्षमता गमावून बसलो. कर्जपुरवठादारांबाबतच्या अढळ वचनबद्धतेमुळे माझ्या काही नवनिर्माणाच्या योजना बाजुला ठेवाव्या लागल्या. उद्योजक म्हणून काही नवे प्रयोग करायला वेळ मिळाला नाही. समुहातील सर्व उद्योगांची पुनर्रचना करण्यावर लक्ष केंद्रीत करताना कर्जपुरवठादारांचा पैसा परत करायचा आहे, हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांपुढे होते. आलेल्या आपत्तीबाबत चीडचीड करीत हातपाय गाळून बसण्यापेक्षा जीटीएल इन्फ्रा हा उद्योग संकटाला दूर करण्यासाठी सरसावला, त्यांच्या या विधानातून त्यांच्यातील उद्योजकाची आपल्याला तळमळ दिसते. आता ग्लोबल समूहातील कंपन्यांची गाडी रुळावर येईल व सर्व कंपन्या नफा कमवू लागतील अशी चिन्हे दिसत आहेत. तसे झाल्यास शून्यातून या मराटी उद्योजकाने पुन्हा एकदा भरारी घेतल्याचे सिध्द होईल. आरस्याकडे उद्योग क्षेत्रात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सी.एस.आर.) योजना अनिवार्य केली जाण्याआधी काही दशके ग्लोबल ग्रूपने विविध लोकोपकारी उपक्रम आपल्या उद्योगाचा एक लखलखता आणि अभिमानास्पद पैलू बनवला होता. दोन वर्षांपूर्वी भारत सरकारने उद्योगांनी आपल्या निव्वळ नफ्यापैकी दोन टक्के हे लोकोपयोगी कामांसाठी खर्च करणे, अनिवार्य केले. परंतु ग्लोबल समूहाने 1994 साली म्हणजे तब्बल 23 वर्षांपूर्वी जेव्हा अशी कोणतीही योजना नव्हती तेव्हा सामाजिक दान योजनेची मशाल चेतवली. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेला आणि एका खेड्यात शालेय शिक्षण झालेल्या मनोज तिरोडकरांसारख्या विद्यार्थ्याला समाजात अनेक गरजूंना मदतीची गरज असते, याची जाणीव होती. त्यातून त्यांनी नेहमीच गरजूंना मदतीचा हात दिला आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या समूहातून अंध दिव्यांगांच्या जीवनात आनंद फुलवला. दक्षिण किनार्‍यावर तामिळनाडू राज्यात जेव्हा त्सुनामीचे संकट आले तेव्हा अनेक गावांना तडाखा बसला. ती पार उद्धवस्त झाली. ही गावे पुन्हा वसवण्याचं काम तिरोडकरांच्या कंपनीने केले. ग्लोबल ग्रूपचा सार्वजनिक धर्मादाय न्यास असलेले ग्लोबल फाऊंडेशन हे सध्या विविध समाजोपयोगी योजना राबवत आहे. अशा या मनोज तिरोडकरांना त्यांच्या नव्या भरारीबद्दल शुभेच्छा.
-----------------------------------------------------------------

0 Response to "शून्यातून पुन्हा एकदा भरारी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel