-->
धार्मिक उन्मादाची 25 वर्षे...

धार्मिक उन्मादाची 25 वर्षे...

रविवार दि. 10 डिसेंबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
धार्मिक उन्मादाची 25 वर्षे...
------------------------------------
एन्ट्रो- राम मंदिराचा प्रश्‍न हा पुन्हा एकदा उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अग्रस्थानी आला. यातून लोकांची पुन्हा एकदा दिशाभूल करण्यात आली. एकीकडे हा प्रश्‍न तेवत ठेवायचा व मंदीर बांधायचेच नाही, कारण एकदा का मंदीर बांधले की, हा प्रश्‍न सुटला व त्यानंतर भाजपाकडे मते मागण्यासाठी व हिंदू मतांची साठवण करण्यासाठी काहीच पर्याय राहात नाही. त्यामुळे राम मंदीर हे बांधण्यापेक्षा भाजपाला हा प्रश्‍न सतत चालू ठेवण्याता विशेष रस आहे...  
-----------------------------------------------------
अयोध्येतील बाबरी मशीद नेस्तनाबूत करुन रामजन्मभूमी मंदिर बांधण्याच्या धार्मिक उन्मादी राजकारणाला 6 डिसेंबर 2017 रोजी बरोबर 25 वर्षे पूर्ण झाली. विश्‍व हिंदू परिषद आणि भाजपने ही साडे चारशे वर्षाची मशिद मशीद जमीनदोस्त केली. बाबरी मसिदीचा वाद हा काही आपल्यासाठी नवीन नव्हता. हिंदुत्ववादी अनेक लहान-मोठ्या संघटनांनी हा वाद नेहमीच तेवता ठेवला होता. स्वातंत्र्यानंतर 1948 सालापासून ते 1992 अशी साडेचार दशके ही वास्तू कोर्टाच्या फेर्‍यात सापडली. मुस्लिम-हिंदू या दोन्ही समाजांत वाद माजेल हे माहीत असूनही भाजपप्रणीत कारसेवकांनी अवघ्या साडेचार तासांत ही वास्तू पाडली. या घटनेने देशाचे राजकारण अंतर्बाह्य बदलून गेले. स्वातंत्र्यानंतर आपण जपलेल्या सेक्युलर राजकारणाला यामुळे तडा जाणार हे माहित असूनही हिंदुत्वाचे वारे शिरलेल्यांनी ही मशिद पाडली. ही घटना घडली त्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे केंद्रात सरकार होते. शंकरराव चव्हाण केंद्रात गृहमंत्रीपदी, शरद पवार संरक्षणमंत्री होते. उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी कल्याणसिंग होते. मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी केंद्र सरकारला या वास्तूला कुठेही धक्का लागणार नाही याची खात्री दिलेली असतानाही ही वास्तू पाडण्यात आली. अर्थातच भाजपाचे सरकार असल्यामुळे कारसेवकांना ही वास्तू पाडणे सोपे गेले यात कोणतीही शंका नाही. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपला राजकीय ताकद मिळवून देण्यासाठी 1989 ते 1992 या काळात राम मंदिर हा मुद्दा पेटवला. देशभर राम मंदिर मुद्दा पेटवण्यासाठी अडवाणींनी रथयात्रा काढली. या यात्रेने वातावरण पेटवत नेलं. या पेटलेल्या वातावरणातल्या उन्मादातून 1992 ला अयोध्येत मशीद पाडली गेली. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे सरकार 1989 मध्ये अडवाणींनी पाडले. व्ही. पी. सिंगांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली. भारतात इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) दृष्टीने मंडल आयोग हा कळीचा मुद्दा होता. मंडल आयोगाची अंमलबजावणी हाणून पाडण्यासाठी भाजपाचे राम मंदिराचे राजकारण केले. भाजपने मंडल विरुद्ध कमंडल अशी घोषणाच दिली. उत्तर प्रदेशात तेव्हा भाजपचे कल्याणसिंह मुख्यमंत्री होते. त्यांनी लबाडी केली. केंद्र सरकारला खोटे सांगून अयोध्येत दगाफटका केला आणि मशीद पाडायला मदत केली. अर्थात राज्य सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय असा प्रकारची घटना होऊ शकत नाही. मशिद पाडल्यावर हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगे सुरु झाले, बॉम्बस्फोट ही त्याच्या पुढची मालिका. एकूणच देशात अशांतता माजण्याच्या दृष्टीने बीजे रोवली गेली. बाबरी पडल्यानंतर देशाच्या राजकारणात हिंदू-मुस्लिम तेढ वाढली. त्याचा सर्वात मोठा फायदा भाजपला झाला. हिंदुत्वाची मते एकगठ्ठा बांदण्यासाटी भाजपाला एक नामी संधी यातून प्राप्त झाली. कॉग्रेसने तोपर्यंत अल्पसंख्यांकाचे राजकारण केले होते. अर्थातच त्यासाठी झालेले राजकारण हे समर्थनीय नव्हतेच. कॉग्रेसच्या राजवटीत त्याचा अतिरेक गाठला गेला. आता दुसरीकडे भाजपाने या दंगलीतून समाजात दुही पाडून हिंदुत्वाची मते आपल्याकडे जमा करण्याचे राजकारण केले. अर्थात यात सर्वसामन्य माणूस भरडला गेला. ज्यांचे हातावर पोट होते त्यांचा दंग्याधोप्यामुळे रोजगार बुडाला. त्यांच्या जीवनात आलेली अस्थिरता कधीही भरुन निघणारी नव्हती. परंतु या कष्टकर्‍यांचे राजकारण्यांना काहीच देणेे घेणेे नव्हते. स्वातंत्र्यानंतर आपण विविधतेतून एकता जपत सेक्युलर राजकारण केले त्याला यातून सुरुंग लागला. हिंदुत्वाची यातून लाटच आली. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या उत्तरेतील राज्यांत भाजपला 1992 नंतर स्वबळावर सत्ता मिळत गेल्या. याच काळात गेल्या 25 वर्षांत काँग्रेसचा जनाधार कमी होत गेला. भाजपनेही देशातल्या हिंदूंचा सर्वात मोठा पक्ष हे स्थान हिंदुंमध्ये मिळविले, मात्र गेल्या 25 वर्षात राम मंदिराचा प्रश्‍न मात्र तसाच भिजत ठेवला. या काळात राम मंदिर काही उभे राहिले नाही. बाबरी मशिद पाडल्यापासून गेल्या 25 वर्षात केंद्रात भाजपाची दहा वर्षे सत्ता आहे. या काळात त्यांना मंदिर सहज उभारता आले असते. परंतु हा प्रश्‍न सतत तेवत ठेवून आपल्या मातंचे राजकारण भाजपाने केले. एक प्रकारे हिंदुंच्या भावनांशी त्यांनी खेळच केला. 2014 सालच्या केंद्रातील निवडणुकीत भाजपाने नेहमीप्रमाणे राम मंदिर उभारण्याचे निवडणुकीत आश्सासन दिले खरे मात्र विकासाच्या व भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढविली. जनतेने त्यांना पाठिंबा दिला व केंद्रात बहुमताने भाजपाचे सरकार सत्तेत आले. परंतु या सरकारने आपले हिंदुत्वाचे घोडे दामटायला सुरुवात केली व त्यातून हिंदू मतांचे धु्रवीकरण करुन निवडणुका जिंकण्यास सुरुवात केली. राम मंदिराचा प्रश्‍न हा पुन्हा एकदा उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीच्या निमित्ताने अग्रस्थानी आला. यातून लोकांची पुन्हा एकदा दिशाभूल करण्यात आली. एकीकडे हा प्रश्‍न तेवत ठेवायचा व मंदीर बांधायचेच नाही, कारण एकदा का मंदीर बांधले की, हा प्रश्‍न सुटला व त्यानंतर भाजपाकडे मते मागण्यासाठी व हिंदू मतांची साठवण करण्यासाठी काहीच पर्याय राहात नाही. त्यामुळे राम मंदीर हे बांधण्यापेक्षा भाजपाला हा प्रश्‍न सतत चालू ठेवण्याता विशेष रस आहे. 
2010 मध्ये लखनऊ हायकोर्टाने मंदिर-मशीद वादात महत्त्वाचा निकाल दिला होता. हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन निकाल दिला की, बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा मशीद कमिटी, निर्मोही आखाडा आणि रामजन्मभूमी न्यास या तिघांनी समसमान वाटून घ्यावी. मशिदीच्या जागेवर मशीद बांधावी, मंदिराच्या जागेवर मंदिर बांधावे. हे काम त्या-त्या संस्थांनी एकत्र बसून करावे आणि देशात दुही माजवणारा हा वाद संपवावा असा हा निकाल होता. पण हा तोडगा विश्‍व हिंदू परिषद, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाने मानला नाही. त्यामुळे वाद आता सुप्रीम कोर्टात सुरू आहे. काँग्रेस या प्रश्‍नावर आजही गोंधळलेल्या अवस्थेत आहे.त्यांना यासंबंधी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. पंचवीस वर्षांच्या या भळभळत्या जखमेपासून काय धडा घ्यायचा? इतिहास व धर्म यांचा योग्य अर्थ लावायचा की आपल्याला सोयीचा अर्थ माजवायचा? योग्य अर्थ लावून एकोप्याने नांदायचे की एकमेकांशी भांडत बसायचे, दंगली खेळायच्या? साडेसातशे वर्षे भारतात हिंदू-मुस्लिम सहजीवन चालत आले आहे. इतिहासात त्याचे अनेक दाखले आहेत. 1947 मध्ये भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात ब्रिटीशांनी ते मोडून पडले. बाबरमी पाडल्यावर दुसरा मोठा तडा गेला. पंचवीस वर्षे दंगली, बॉम्बस्फोट, संघर्ष, दहशतवाद, अविश्‍वास अशी त्याची फळे सामान्य माणसे भोगताहेत. हे असेच चालू ठेवायचे की आपण एकत्र राहायचे हा सवाल या दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येऊन ठरवायचे आहे. अन्यथा पुढील 50 काय 100 वर्षातही हा प्रश्‍न सुटणार नाही.
-----------------------------------------------------------------

0 Response to "धार्मिक उन्मादाची 25 वर्षे..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel