-->
ब्रेकअप करलिया...

ब्रेकअप करलिया...

संपादकीय पान शनिवार दि. 28 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
ब्रेकअप करलिया...
                                              दिल पे पथ्थर रखके...
                                              मैने ब्रेकअप कर लिया...
                                              उसकी काली तरतुदीने...
                                              उसका भांडा फोड दिया...
                                              मैने उसको छोड दिया...
                                              मैने ब्रेकअप करलिया...
सध्या गाजत असलेल्या या हिंदी चित्रपटातील गाण्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे शिवसेनेने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाजपाबरोबरचा आपला 25 वर्षे सुरु असलेला संसार मोडून ब्रेकअप करण्याची केलेली घोषणा. हे गाणे जर वाचले तर शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी हे ब्रेकअप करताना जे मुद्दे मांडले ते अगदी यात चपखल बसतात. शिवसेनेची सतत मानहानी करावी व यातून शेवटी कंटाळून ब्रेकअप करण्याची घोषणा त्यांनीच करावी, ही भाजपाची इच्छा देखील यातून पूर्ण झाली आहे. कारण शिवसेनेशी आपले संबंध जुने आहेत, काही मतदारसंघात त्यांच्याच जिवावर आपण मोठे झालो याची भाजपाला पूर्ण कल्पना आहे. असे असले तरीही आज त्यांना शिवसेनेबरोबर जाणे म्हणजे एक डोक्यावर मोठा भार वाटत आहे. आता शिवसेनेनेच ब्रेकअप करण्याची घोषणा केल्याने त्यांना डोक्यावरचे हे ओझे उतरल्यासारखे वाटून हायसे वाटले असले. खरे तर गेल्याच विधानसभा निवडणुकीत उभय पक्षांमध्ये ब्रेकअप झाले होते. मात्र सत्तेची गणिते जुळविण्यसाठी शिवसेना अधिर झाली होती, त्यातून त्यांनी भाजपाच्या दारचे दरवाजे ठोठावले. यावेळच्या मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीत भाजपाला स्वबळावर लढायचे होते. त्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षापासून फिल्डिंग लावली होती. याची तयारी खासदार किरीट सोमय्या व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या कारभारावर तोफा डागून सुरु केली होती. खरे तर तेव्हाच शिवसेनेला अंदाज यायला पाहिजे होता. मात्र शिवसेनेने कितीही डरकाळ्या फोडल्या तरीही केंद्रातील व राज्यातील मंत्रीपदे त्यांना सोडण्याचा मोह अजून टाळता आलेला नाही. त्यामुळे भाजपाने मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत कितीही हल्ले केले तरी ते यशस्वीरित्या परतवू शकत नव्हते. खरे तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेच्या सोबत धाकटा भाऊ म्हणून भाजपा सत्तेत सुरुवातीपासून आहे. त्यामुळे मुंबईतील हालाखीच्या स्थितीला केवळ शिवसेनाच नव्हे तर भाजपा देखील जबाबदार आहेच. आता मात्र त्यांना मुंबईत आपला महापौर बसवायचा आहे व त्यासाटी त्यांनी हे ब्रेकअप केले आहे. मात्र हा त्यांचा फाजिल आत्मविश्‍वास आहे. शिवसेनेच्या मुंबईच्या बालेकिल्ल्याला भेदणे भाजपाला जमेल असे काही वाटत नाही. त्याचबरोबर शिवसेनेचा देखील एकला चलो चा नारा राज्यात काही यशस्वी होणार नाही. उलट त्यांना त्याचा फटकाच बसणार हे नक्की. भाजपा असो किंवा शिवसेना यांची संपूर्ण राज्यात स्वबळावर लढण्याची ताकद नाही, भाजपाने म्हणूनच गेल्या विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षांकडून फोडाफोडी करुन उमेदवार उभे केले होते. त्यांची ही फोडाफोडी यशस्वी ठरली. मात्र शिवसेना आता कोणती भूमिका घेऊन पुढे जाणार हे महत्वाचे आहे. भाजपाशी ब्रेकअप झाल्यावर अन्य कोणत्या पक्षांबरोबर जाणार असा सवाल आहे. या ब्रेकअपचा फायदा अन्य कोणता पक्ष उठविणार हे देखील जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट दिसेल. मात्र नजिकच्या काळात या दोन्ही पक्षांना ब्रेकअप घेतल्याबद्दल पस्तवावे लागण्याची पाळी येणार हे नक्की.

0 Response to "ब्रेकअप करलिया..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel