-->
सनातनची सखोल चौकशी करा

सनातनची सखोल चौकशी करा

संपादकीय पान गुरुवार दि. 08 डिसेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
सनातनची सखोल चौकशी करा
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने न्यायलयात जे महत्वपूर्ण खुलासे सादर केले आहेत ते पाहता या संस्थेची उच्चस्तरिचय चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आजवर सनातन संस्थेकडे संशयीत म्हणून पालिजे जात होते मात्र आता त्यांच्याच साधकांच्या मार्फत पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली आहे हे टप्प्याटप्प्याने सिध्द होत आहे. त्यासंबंधी विशेष पथकाने न्यायलयात सर्व पुरावे सादर केले आहेत. लवकरच हे सर्व उघड होईल व सनातन संस्थेचा व साधकांचा यात असलेला हात सिध्द होईल. सनातन ही संस्था हिंदूंच्या जनजागृतीचे काम करते असे त्यांचा दावा आहे व त्यांच्या विचारांच्या आड येणार्‍यांची त्यांनी हत्या रचली होती (ज्यांची हत्या झाली ते दोघेही हिंदूच होते. असो). कॉ. पानसरे व डॉ. दाभोळकर यांची हत्या यातूनच झाली आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करण्यात चालढकल करीत असल्याचे आढळल्यावर डॉ. दाभोळकरांच्या कुटुंबियांनी यासंबंधी न्यायलयाकडे दाद मागितली होती व या चौकशीचा धीमे गतीने प्रवास पाहता न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले होते. न्यायलयाने या चौकशीचा तपास वेगात करुन त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यास बजावले होते. न्यायलयाच्या या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशीची चाके वेगात फिरु लागली होती. सनातन संस्थेकडून त्यांच्या आश्रमात येणार्‍या साधकांना स्क्रिझोफेनिया आणि अन्य मानसिक रोगांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी औषधे दिली जात असत, असे विशेष पथकाने म्हटले आहे. याप्रकरणात अटक करण्यात  आलेल्या दोन आरोपींच्या पत्नींकडून या औषधांबद्दलची माहिती मिळाल्याचे पथकाने म्हटले आहे. सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्यावर या पथकाने काही दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. याशिवाय, कॉ. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्या जबाबावरून विशेष पथकाने सनातन संस्थेच्या दोन साधकांना ताब्यात घेतले होते. विशेष पथकानेे दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातनकडून साधकांना देण्यात येत असलेल्या औषधांबद्दलचा उल्लेख आहे. विशेष पथकाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या पत्नींची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सनातन संस्थेच्या आश्रमात वापरण्यात येणार्‍या औषधांची तपशिलवार माहिती दिली. साधक जेव्हा आश्रमात वास्तव्याला असत तेव्हा त्यांना ही औषधे दिली जात असत. साधकांना ही औषधे पवित्र असल्याचे सांगितले जाई. वीरेंद्र तावडे याची पूर्वीची पत्नी निधी तावडे हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात आपल्याला अध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली ही औषधे देण्यात आल्याचे सांगितले आहे. खरे तर निधी तावडे या डॉक्टर आहेत व त्यांना या औषधाचा वापर कोणत्या कारमासाठी केला जातो याची कल्पना असणार, मात्र असे असूनही त्यांनी व त्यांच्या डॉक्टर पतीने ही औषधे घेतली होती. म्हणजे त्यांच्यावर सनातन संस्थेचा किती पगडा होता याची अंदाज येतो. 2013 ते 2014 या काळात निधी सनातनच्या पनवेलमधील आश्रमात निधी तावडे राहिल्या होत्या. त्यावेळी आश्रमातील डॉक्टरांनी स्क्रिझोफेनियाच्या रूग्णांसाठी वापरण्यात येणारी औषधे आपल्याला दिल्याचे निधी यांनी चौकशीत म्हटले आहे. साधकांना पवित्र पाणी असल्याचे सांगून ही औषधे दिली जात असल्याचेही निधीने सांगितले. आश्रमात असताना मला रोज सकाळी आठ वाजता औषध असलेले पाणी प्यायला दिले जात असे. हे पाणी म्हणजे तीर्थ असल्याचे सांगितले जाई. हे पाणी प्यायल्यानंतर मला निराश असल्यासारखे वाटत असे. काही दिवसांनंतर हे तीर्थ म्हणजे मानसिक रोगांसाठी वापरण्यात येणारी औषधे असल्याचे माझ्या लक्षात आले. आश्रमातील 30 ते 35 साधकांनाही अशाचप्रकारे दररोज औषधे दिली जात असल्याचे निधीने आपल्या जबाबात म्हटले आहे. मी याबद्दल माझा पती वीरेंद्रला विचारले असता त्याने उपचारासाठी ही औषधे दिली जात असल्याचे सांगितले. वीरेंद्रलाही ही औषधे दिली जात असल्याचे निधीने सांगितले. याशिवाय, दुसरा आरोपी असलेल्या विनय पवार याच्या पत्नीनेही गोवा आणि पनवेल आश्रमातील साधकांच्या दिनक्रमाविषयी पोलिसांना माहिती दिली. या आश्रमांममध्ये सकाळी आठ वाजताच्या आरतीने दिवसाची सुरूवात होते. संध्याकाळी सहा वाजता पुन्हा एकदा आरती  केली जाते. यादरम्यान, 11 वाजता सर्व साधकांना प्रसादाचे वाटप केले जाते. याशिवाय, साधक प्रार्थना करतात त्याठिकाणी सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांचे कपडे आणि वस्तू ठेवल्या जातात. या सगळ्यात दैवीकण असल्याचा दावा सनातनकडून केला जातो. 2009 साली गोवा बॉम्बस्फोटाच्यावेळी विनय मला साधनेसाठी बाहेर चाललो असल्याचे सांगून गेला होता. तो तब्बल महिनाभर घरी आला नाही. मात्र, त्याने मला अगोदरच सांगून ठेवल्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार केली नाही, असे विनय पवारच्या पत्नीने सांगितले. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी 2 सप्टेंबरला संशयित वीरेंद्र तावडे याला सीबीआयकडून ताब्यात घेतले होते. कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होणारा तावडे हा समीर गायकवाड याच्यानंतर दुसरा संशयित आरोपी आहे. सनातन भोवतीचे संशयाचे धुके आता विरळ होत जाऊन तेच या गुन्ह्यामागे आहेत हे स्पष्ट होऊ लागले आहे. तसेच त्यांच्या आश्रमात जे काही चालते व त्यातून हिंदुत्वाकडे लोकांना वळविण्यासाटी त्यांच्यावर जे काही प्रयोग केले जात आहेत ते सर्व धक्कादायक आहे. याची चौकशी झालीच पाहिजे.
---------------------------------------------------

0 Response to "सनातनची सखोल चौकशी करा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel