-->
कपिल शर्माचे हसे होणार?

कपिल शर्माचे हसे होणार?

संपादकीय पान बुधवार दि. १४ सप्टेंबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कपिल शर्माचे हसे होणार?
कॉमेडीवीर म्हणून विविध चॅनेल्सवर कार्यक्रम करणार्‍या कपिल शर्माचे आता हसे होण्याची वेळ आली आहे. आपल्या कार्यालयाचे केलेले बांधकाम वाचविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली असल्याचे ट्विट कपिल शर्माने केले. त्याने हे ट्विट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून हेच का तुमचे अच्छे दिन? असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला लगेच राजकीय वळण मिळाले. कपिल शर्मा हा सेलिब्रिटी असल्याने त्याच्या तक्रारीची सरकारी दरबारी झपाट्याने घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. सध्या व्टीटवरुन बरीच सरकारी कामे करण्याकडे कल वाढला आहे. एखाद्या मंत्र्याला आदेश देण्यापासून ते चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत सर्वकाही व्टीटव्दारे करुन हे सरकार किती कार्यक्षम आहे ते दाखविण्याचा केविलवामा प्रयत्न सध्याचे सरकार करीत असते. अशा प्रकारचे व्टीट मात्र सरकार शेतकरी व तळागाळातील जनतेच्या रखडलेल्या प्रश्‍नाबाबत केले जात नाही, याचे वाईट वाटते. असो. फोर्ब्जफ या मासिकाने २०१५ साली जगभरातील १०० नामवंतांची जी यादी प्रसिद्ध केली होती त्यात कपिलला २७ व्या क्रमांकावर स्थान देण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक बहुमान त्याला मिळालेले आहेत. हे जरी खरे असले तरी कपिल शर्मा असो वा अन्य कोणी नामवंत तो भारतीय राज्यघटनेतील कायद्यापेक्षा मोठा नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आता असे समजते की, कपिल शर्मा जे बांधकाम करीत आहे, ते अनधिकृत आहे. हे जर खरे असेल तर कपिल शर्मावर अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच त्यानंतर त्याच्याकडून ज्या अधिकार्‍याने लाच मागितली त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. कपिलचे कार्यालय मुंबईतील अंधेरी भागातील एसव्हीपी नगरामध्ये आहे. तेथे म्हाडाची रो हाऊसेस तळमजला व पहिला मजला अशा स्वरूपात आहेत. आजूबाजूला तिवरे असून सीआरझेड कायदा या क्षेत्राला लागू होतो, पण तरीही हे कायदे डावलून कपिल शर्माने कार्यालयाच्या नावाखाली तिथे दोन मजली बेकायदा बांधकाम केले आहे, असा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे. एका सेलिब्रेटीने व्टीट केल्यावरच सरकार त्याची दखल घेते हे जसे निषेधार्थ आहे तसेच कपिल शर्माचे जर बांधकाम अनधिकृत आहे तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. सध्या आपल्याकडे कोणताच कायदा न पाळण्याचे लोकांमध्ये फॅड आले आहे. त्यातच ते धन्यता मानतात. सेलिब्रेटींना तर असे वाटते की, आपल्यासाठी सरकारचे कायदे काही वेगळे असावेत. यासाठीच ते प्राप्तिकर कायद्यापासून ते अन्य कायदे पायधुळी तुडविणे हा आपला अधिकार असल्याचे मानतात. यासाठी सरकारने पहिल्यांदा सेलिब्रेटींना कायदे काय आहेत व त्याचे अंमलबजावणी सरकार कशा प्रकारे करु शकते ते दाखवून देण्याची गरज आहे. त्यातच प्रसिध्द अभिनेता सलमान खान नुकताच विविध दोन प्रकरणातील खटल्यातून मोकाट सुटल्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कायदे तोडण्यासाठी प्रेरणा मिळाली असणार, याबाबत काही शंका नाही.


0 Response to "कपिल शर्माचे हसे होणार?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel