-->
आ. बच्चू कडूंचे काय चूक? काय बरोबर?

आ. बच्चू कडूंचे काय चूक? काय बरोबर?

संपादकीय पान शनिवार दि. २ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आ. बच्चू कडूंचे काय चूक? काय बरोबर? 
आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील एका अधिकार्‍याला त्याने काम न केल्याने मारहाण केल्याची व त्यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी अशा प्रकारे मारहाण करण्याचा प्रकार आ. कडू यांनी २६ वेळा केला आहे. आता त्यांना अटक होऊन जामीन मिळाला आहे. मात्र असे कोणते कारण झाले की, कडू यांना अधिकार्‍यांना मारहाण करावी लागली? आ. कडू यांनी केलेली मारहाण ही चुकीची आहे व त्यांच्या या मारहाणीचे समर्थन कुणीच करणार नाही. मात्र या निमित्ताने उपस्थित झालेले अधिकार्‍यांचे कार्यक्षमतेबाबत व भ्रष्टाचाराबाबतचे प्रश्‍न आपल्याला विसरता येणार नाहीत. आपल्याकडीव नोकरशाही कार्यक्षमतेने काम करीत नाही ही सध्या जवळजवळ प्रत्येकाला पटलेली बाब आहे. यात एकदा ते नोकरीला लागले की त्यांची नोकरी सुरक्षित असते. निवृत्त होईपर्यंत त्यांना कोणी हात लावू शकत नाही, फारफार तर काय तर बदली होऊ शकते. काही अपवादात्मक १०-२० टक्के अधिकारी व कर्मचारी वगळता जवळजवळ सर्वच जण हे भ्रष्टाराच्या विळख्यात अडकलेले आहेत. जेवढा अधिकारी मोठा तेवढी त्याची पैशाची मागणी मोठी, हे आता सूत्र अलिखीतच झाले आहे. एकूणच आपली नोकरशाही भ्रष्टाचारात अडकून जनतेची कामे करण्यात त्यांना काडीमात्र रस राहिलेला नाही. आपण जनतेचे सेवक आहोत, आपल्याला पगार हा जनतेच्या पैशातून मिळतो. त्यामुळे आपल्याला आम जनतेची कामे झपाट्याने केली पाहिजेत, अशी मनोमन इच्छा, तळमळ या अधिकारी व कर्मचार्‍यांची नसते. उलट त्यांचे सर्वसामान्यांकडे वर्तन हे अतिशय उध्दटपणाचेच असते. एका टेबलवरुन दुसर्‍या टेबलवर फाईल जाण्यासाठी वजन हे ठेवावेच लागते. अन्यथा ती फाईल तिकडेच धूळ खात पडते. सर्वसामान्य लोकांचे हे हाल असताना कंत्राटदारांची कामे मात्र झपाट्याने होतात. हे अधिकारी कुणालाही उत्तर द्यायला बांधिल नसतात. त्याउलट लोकप्रतिनिधींना जर पाच वर्षांनी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघासाठी निधी आणावा लागतो व विकास कामे करावी लागतात. अनेकदा लोकप्रतिनिधी निधी आणतात मात्र सरकारी नोकरांच्या ढीलाईमुळे हा निधी न वापरला जाऊन परत जातो. अशा वेळी या लोकप्रतिनिधींचा भडका उडणे स्वाभाविकच आहे. सध्या सरकारने सेवा विधेयक मंजूर केले आहे. त्यानुसार, अधिकार्‍याच्या टेबलवर आलेली फाईल त्याला आठ दिवसात मंजूर करुन दुसरीकडे पाठविणे भाग आहे. परंतु हा नियम कागदावरच राहातो किंवा आपल्याकडील नोकरशाही त्यातूनही सफाईतरित्या मार्ग काढते असे आढळले आहे. त्यामुळे आ. बच्चू कडू यांनी अधिकार्‍याला मारहाण करुन आपल्या संतोषाला वाट मोकळी करुन दिली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. अशा घटना घडू नयेत यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या कामकाजात आमुलाग्र बदल करण्याची वेळ आता आली आहे.

0 Response to "आ. बच्चू कडूंचे काय चूक? काय बरोबर? "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel