-->
साहित्यिकांनो...गोड बोला!

साहित्यिकांनो...गोड बोला!

संपादकीय पान शुक्रवार दि. १५ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
साहित्यिकांनो...गोड बोला!
आज मकरसंक्रांत. आपल्याकडे तिळगुळ देताना तिळ गुळ घ्या, गोडगोड बोला असे म्हणण्याची पध्दत आहे. आजपासून पिंपरी येथे ८९ वे जागतिक मराठी साहित्य संमेलन सुरु होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐकेरी उल्लेख केल्याने जे वादळ उठले होते ते त्यांनी माफीनामा पत्रकारपरिषदेत जाहीर केल्यावर शमले आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदाचेे साहित्य संमेलन होत असल्याने तसेच मकरसंक्रातीच्याच दिवशी असल्याने सर्वांना आजवरची कटुचा संपवून आता तरी गोड गोड बोलण्याचा संदेश घ्यावासा वाटतो. गेले वर्ष हे साहित्यिकांच्या दृष्टीने गाजविले गेले. केंद्रातील सरकारला खर्‍या अर्थाने साहित्यिकांनी आपल्या भाषेत धक्के दिले. सरकारच्या असहिष्णुता धोरणाच्या विरोधात साहित्यिकांनी आपल्या भाषेत बंड पुकारले आणि आपले पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली. अर्थात पुरस्कार परत करण्याच्या या घटना केवळ राज्यातील नाहीत तर संपूर्ण देशात घडल्या. त्यामुळे एकूणच सरकारच्या धोरणाच्या विरोधात एक प्रकारचे जनमत संघटीत होणे हे ओघाने आलेच. साहित्यिकांनी पुकारलेल्या या आंदोलनाचे पडसाद बिहार निवडणुकीत उमटले. अर्थात बिहारमध्ये भाजपाच्या पराभवास जी अनेक कारणे आहेत, त्यात साहित्यिकांचा वाटा तिळा एवढा का असेना पण निश्‍चितच आहे. सरकारच्या समर्थनार्थ व असहिष्णुततेच्या विरोधात देशात प्रत्येक क्षेत्रात उभे दोन तट पडल्याचे या निमित्ताने दिसले. सरकारच्या समर्थकांचा एक नेहमीच दावा होता की, कुठे आहे असहिष्णुता ती दाखवाच. यापूर्वी आणीबाणीत सहिष्णुता होती का? दिल्ली दंगलीच्या निषेधार्थ याच साहित्यिकांनी का नाही पुरस्कार परत केले? अशा प्रकारचे दावे केले गेले. परंतु साहित्यिकांनी पुरस्कार परत करावयाचे किंवा नाहीत, तसेच पुरस्कार परत करावयाचेच असतील तर ते कधी करावेत हा संपूर्णपणे त्यांचा प्रश्‍न आहे. मात्र सरकारच्या समर्थनार्थ ज्या घटनांचा उल्लेख केला जातो त्यावेळी पुरस्कार परत न करता आत्ताच केले जात आहेत, यामागे सरकारने विचार करण्याची गरज आहे.  प्रा. श्रीपाल सबनिसांच्या बाबतीत सांगायवयाचे तर, मोदी हे पाकिस्तानात आपले शिर तळहातावर घेऊन गेले होते. तेथे त्यांच्या जिवाला धोका संभवू शकला असता, या कळकळीतून आपण मोदींबाबत ते वक्तव्य केले असे सबनीस यांचे म्हणणे आहे. सबनीस यांना आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे व ते त्यांनी घेतले. त्यांनी पंतप्रधानांचा जो एकेरी उल्लेख केला तो मात्र अनेकांना खटकला आणि तसे करणे चुकीचेच होते. मात्र यानंतर सबनीस यांच्याबाबत सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार ऍड. संजीव पुनाळेकर यांनी केलेले टिष्ट्वट हे संतापजनकच होते. सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला असा सल्ला पुनाळेकर यांनी दिला. खरे तर हा सल्ला नसून ती थेट धमकीच होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे या विचारवंतांची हत्या मॉर्निंग वॉक दरम्यान घडली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांना मॉर्निंग वॉकला जाण्याचा सल्ला देऊन पुनाळेकर थेट त्यांची हत्या करण्याचीच धमकी देतात. एकूणच हा सर्व घटनाक्रम पाहता, हा सर्व प्रकार म्हणजे असहिष्णताच म्हटली पाहिजे. कुठे आहे असहिष्णुता असा सवाल साहित्यिकांना करणार्‍यांना याचे उदाहरण देता येईल. सरकारच्या वागण्यावरुन असे दिसते की, साहित्यिकांनी गोड-गोडच बोलावे. कुठेही सरकारविरोधी ब्र काढू नये. अर्थातच सरकारचे अशा प्रकारचे वागणे म्हणजे मागच्या पावलांनी येणारी हुकूमशाहीच म्हटली पाहिजे. प्रा. सबनिसांनी पंतप्रधानांचा उल्लेख एकेरी करणे हे केव्हाही चुकीचेच आहे. परंतु त्यांना त्यांची मते मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात त्याबदल्यात त्यांना धमकी देणे हा तर मोठा गुन्हा आहे. ते देखील एका वकिलाने चॅनेलवरुन ही धमकी जाहीरपणे दिली आहे. याबाबत पुनाळेकर यांची सनद रद्द व्हायला पाहिजे. परंतु सध्याच्या काळात हे सरकार असे काही करणार नाही. भाजपा सत्तेत आल्यापासून सनातन संस्थेसारख्या हिंदुत्वाची कास धरणार्‍या संस्थंाची अरेरावी वाढली आहे. कारण त्यांना सरकारचे पाठबळ आहे. अशा स्थितीत सहिष्णुतेच्या गप्पा तरी या सरकारने करु नये. आपल्या प्रदीर्घ भाषणात प्रा. सबनिस साहित्यिकांना कोणता सल्ला देतात ते पहायचे. मात्र त्यांनी अगोदरच माफीनामा सादर करुन एक पाऊल मागे घेतले आहे. आता मागच्या वादावर पडदा पडला आहे. परंतु भविष्यात देशातली असहिष्णुता कायम राहाणार आहे की नाही? या अधिनेशनात त्याविषयी काही पडसाद उमटतात किंना नाही? की या अधिवेशनात गसळेच गुडी-गुडी बोलतात, ते पहायचे.
--------------------------------------------------------------

0 Response to "साहित्यिकांनो...गोड बोला!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel