-->
अखेर चर्चेला खो

अखेर चर्चेला खो

संपादकीय पान शनिवार दि. १६ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर चर्चेला खो
पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्‌याच्या पार्श्‍वभूमीवर भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांच्या पातळीवर १५ जानेवारी रोजी होणारी चर्चा परस्पर संमतीने पुढे ढकलण्यात आली आहे. अर्थात ही चर्चा निकटच्या भविष्यात होईल, असा आशावाद भारतीय विदेश मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक भेट दिल्यावर उभय देशात फ्रार मोठे क्रांतीकारी निर्णय् घेतले जातील व एका झटक्यात संबंध सुधारतील, असे वातावरण भाजपाच्या नेत्यांनी व त्यांच्या भोवती असणार्‍या विश्‍लेषकांनी मत व्यक्त केले होते. परंतु हा भ्रम अखेर खराच ठरला. पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी पाठणकोट येथील आपल्या हवाई तळात घुसून हल्ला केला. ही घटना अतिशय गंभीर होती. त्यामुळे या पार्श्‍वभूमीवर उभय देशात चर्चा कशी होणार असा सवाल होता. शेवटी तसेच झाले. उभयतांना ही चर्चा पुढे ढकलावी लागली आहे. चर्चेसंबंधी भारताची भूमिका मांडताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, पाकिस्तानतर्फे काल जारी करण्यात आलेल्या निवेदनाचे अध्ययन केल्यानंतर पाकिस्ताने पठाणकोट हल्ल्यांच्या संदर्भात केलेली कारवाई महत्त्वपूर्ण, सकारात्मक असल्याचे भारताचे मत आहे. पाकिस्तानने हल्ल्याच्या तपास व चौकशीसाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने भारताला भेट देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे आणि भारत त्याचे स्वागत करीत आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणीही परस्परसंमतीने पुढे ढकलण्यात आली आहेत. आता प्रश्‍न उपस्थित होतो की, जर पाकिस्तानने केलेल्या कारवाईबाबत भारत सरकार समाधानी आहे तर चर्चा पुढे डकलण्याचे कारणच काय होते? गेल्या दोन-तीन दिवसांतील घडामोडींच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना स्वरुप यांनी, दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परस्परांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती दिली. परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणी लवकरच होतील, असे सांगितल्यावर पत्रकारांनी त्यांना ही बोलणी निश्‍चित कधी होऊ शकतात की मुंबई हल्ल्यानंतर घडल्याप्रमाणेच त्याची गत होणार, असे विचारले असता त्यांनी लवकर या संज्ञेची व्याख्या करण्यास ते असमर्थ आहेत, असे म्हटले. परराष्ट्र सचिवांच्या बोलण्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बोलणी होतील काय, या प्रश्‍नावरही त्यांनी माहीत नाही, असेही त्यांचे उत्तर होतेे. परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणी पुढे ढकलण्याचा निर्णय करण्याबाबत भारत-पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा, बोलणी किंवा भेट झाली काय, किंवा अन्य कोणत्या देशात हे सल्लागार एकमेकास भेटले काय, या प्रश्‍नांनाही विकास स्वरूप यांनी नकारार्थी उत्तर दिले. पठाणकोट हल्ल्यांनंतर पाकिस्तानने केलेली कारवाई पाहता पाकिस्तान योग्य मार्गाने वाटचाल करीत आहे, अशी टिप्पणी करून स्वरूप म्हणाले, पाकिस्तानने त्यांचे विशेष तपास पथक भारतात पाठविण्याचे ठरविले आहे आणि भारताने त्याचे स्वागत केले आहे. त्यांना संपूर्ण मदत व सहकार्य केले जाईल. प्रथम त्यांचा दौरा व त्या अनुषंगाने त्यांना कोणत्या गोष्टींची अपेक्षा आहे, या बाबींचा आढावा घेतला जाईल व मगच पुढील गोष्टी घडतील. पठाणकोट हल्ल्याबाबत भारताने दिलेले पुरावे अपुरे आहेत, असे पाकिस्तानने म्हटल्याकडे लक्ष वेधले असता, पाकिस्तानला आणखी कोणत्या पुराव्यांची आवश्यकता आहे ते लक्षात घेऊन त्यांना तसे पुरावे सादर केले जातील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.मात्र सरकारच्या दाव्यानुसार, उभय देशांदरम्यान सर्वसमावेशक संवाद प्रक्रिया अद्याप सुरू झालेलीच नाही. ती सुरू करण्यासाठी किंवा तिची आखणी करण्यासाठीच परराष्ट्र सचिव पातळीवरील ही बोलणी होणार आहेत. त्यामुळे ही संवाद प्रक्रिया स्थगित झाली, असे म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले. सरकारचे हे म्हणणे चुकीचे आहे. यापूर्वीच्या सरकारच्या काळात पाकिस्तानशी चर्चा झाली होती त्याचे काय? यापूर्वीचे घेतलेले निर्णय या सरकारला मान्य नाहीत का, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. पठाणकोट प्रकरणी जबाबदार असलेल्या जैशे महंमदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताबाबत मात्र, पाकिस्तानप्रमाणेच भारतानेही आज कानावर हात ठेवले. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनीही इस्लामाबादमध्ये मौलाना मसूद अजहरला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचा इन्कार केला. पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे योग्य ठरेल अशी घोषणा करुन निवडणुकीपूर्वी टाळ्या घेणारे नरेंद्र मोदी आता मात्र बदलले आहेत व सौेम्य भूमिका घेत आहेत. असे काय बरे मोदींचे झाले हा एक संशोधनाचा विषय ठरेल.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "अखेर चर्चेला खो"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel