-->
बदलते हवामान

बदलते हवामान

संपादकीय पान गुरुवार दि. १४ जानेवारी २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बदलते हवामान
थंडीची एक लाट येऊन गेल्यावर सध्या थंडीची तीव्रता कमी होत चालली आहे. यंदा जानेवारी महिन्यात तापमान नेहमीच्या सरासरी तापमानापेक्षा थंडीतही जास्त होते याचे कारण एल निनोचा परिणाम हेच होते, असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. यावर्षी एल निनो परिणामामुळे पाऊस कमी तर झालाच; पण चेन्नईसारख्या ठिकाणी नको तेव्हा पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक लक्ष्मण राठोड यांच्या सांगण्यानुसार, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तापमान तुलनेने जास्त होते. थंडीतही तापमान वाढण्याचा कल कायम असून तो यापुढेही कायम राहणार आहे. २०१५ हे  सर्वात उष्ण वर्ष होते. जानेवारीत तापमान सरासरीपेक्षा जास्त होते व यात दिनमानातही वाढ होत आहे, त्यामुळे सौर प्रारणांचा परिणाम वाढत असून तापमान वाढतच चालले आहे. काही प्रादेशिक व काही जागतिक घटक यामुळे हिवाळा जास्त उबदार होत चालला आहे. मात्र हेे फार चांगले लक्षण नाही. एल निनो हा परिणाम पॅसिफिकमधील तापमानाच्या वाढत्या तापमानाशी निगडित असून त्यामुळे यावर्षी हिवाळा आणखी त्रासदायक बनला असून पूर्वीची थंडी यंदा अनुभवता आलेली नाही. नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस कमी होण्यासही एल निनो परिणाम कारणीभूत होता. मध्य भारतात हिवाळ्यातही तापमान वाढण्यात प्रतिचक्रीवादळ हे कारण आहे. प्रतिचक्रीवादळ हे वादळाच्या विरोधी गुणधर्माचे असते व चक्रीवादळात वारे कमी दाबाच्या पट्टयात जातात. प्रतिचक्रीवादळात वारे उच्च दाबाच्या भागातून निघून उत्तर अर्धगोलार्धात घडयाळाच्या काटयाच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण अर्धगोलार्धात घडयाळाच्या काटयाच्या विरूद्ध दिशेने वाहतात. एकूणच एल निनोचा परिणाम जागतिक तापमानवाढीवर होत असून कुठे जास्त पाऊस तर कुठे कमी पाऊस अशी परिस्थिती आहे. तसेच हिवाळ्यातही तापमान सरासरीपेक्षा वाढत चालले आहे. हवामानाचे बदलते प्रारूप व या बदलांतही जाणवणारी एक भयाण अनिश्चितता यामुळे भारतीयच नव्हे तर सार्‍या जगातील शेतीला एका अनामिक चिंतेने ग्रासले आहे. भारतातला मान्सुनी पाऊस व त्यानुसार घेतली जाणारी रब्बी व खरिपाची पिके ही भारतीय शेतीची वैशिष्ट्‌ये असल्याने त्यातला थोडासाही फेरफार वा बदल हा शेतीचे नुसते उत्पादनच नव्हे तर सार्‍या देशाचे जीवनमान बदलून टाकतो. या बदलांना पॅसिफिक सागराच्या तापमानातील चढउतारामुळे निर्माण झालेला अल निनो इफेक्ट जबाबदार असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांतील पर्जन्य व तापमानातील चढउतारांच्या आकडेवारीनुसार अल निनोच्या संभाव्य परिणामांबद्दल काही ठोकळ निष्कर्ष काढता येतात. या संकटावरील उपाययोजनाही मानवी आवाक्याबाहेरच्या असल्याने शेवटी या बदलांना यशस्वीपणे तोंड देणे व त्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हाच पर्याय शिल्लक राहतो. याचा सर्वात मोठा परिणाम हा अर्थातच शेतीला भोगावा लागतो. भारतीय शेती सध्या नेमकी याच अवस्थेतून जात आहे. आज अनेक भागातील शेतीक्षेत्र अडचणीत आलेले आहे. देशपातळीवर केवळ ३५ टक्के जमीन सिंचित आहे. तर महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य केवळ १८ टक्के सिंचनावर अवलंबून आहे. ८२ टक्के शेती ही कोरडवाहू असताना तिने उत्पादनाच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्यात? उसाला राजकीय कारणांमुळे प्राधान्य दिल्याने इतर पिकांवर वा शेतकर्‍यांवर तसा अन्याय झालेला दिसतो. दुष्काळामुळे पाणीटंचाईत पहिला बळी जातो तो शेतीच्या पाण्याचा. वाढत्या शहरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याचे आरक्षण केले जाते. दुसरे प्राधान्य उद्योगांना व शेतीला तिसरा क्रम दिला जातो. शेतीला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले जाते. शेतीला लागणार्‍या विजेबाबतही असाच प्रकार आहे. ग्रामीण भागाला पुरेसा वीजपुरवठा न झाल्याने विहिरीतले पाणी पिकांना देता येत नाही. सिंचनाचा हा एक प्रकारे अपव्यय असून शेती उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणार्‍या शेतीवरील या देशव्यापी संकटाची शास्त्रीय मीमांसा न करता, मूलगामी स्वरूपाच्या उपाययोजना न करता सहजशक्य मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेतकर्‍याला केवळ आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करणे हीच आपल्या व्यवस्थेची जबाबदारी दिसते आहे. तीही योग्य रीतीने पार पाडण्यातील ढिसाळपणा या व्यवस्थेचा पोकळपणा जाहीर करणारी आहे. आजवरच्या शेतीसंबंधी धोरणांचा वा त्यांच्या अंमलबजावणीचा परिणाम भारतीय शेतीवर झालेला दिसतो. सध्याचे बदलते हवामान आपण सलग दोन वर्षे अनुभवतो आहे. समजा दुदैवाने असेच हवामान पुढील काही वर्षे राहिले तर त्यावर उपाययोजना काय, याचा विचार सरकार करताना दिसत नाही. त्यामुळे आपल्याकडे शेतीचे भविष्यातील नियोजनच नाही असे म्हणावे लागते. सरकारच्या या बेभरवशी व हवामानाच्या लहरी हिंदोळ्यावर शेतकरी सध्या झोके घेतना दिसतात. हे बदलणार तरी कधी?
-------------------------------------------------------------------------

0 Response to "बदलते हवामान"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel