-->
हिंदुत्वाच्या वल्गना

हिंदुत्वाच्या वल्गना

संपादकीय पान शनिवार दि. २४ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
हिंदुत्वाच्या वल्गना
दसर्‍याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांने लक्ष लागले होते. यंदा ते काय बोलतात त्याला विशेष महत्व होते. कारण केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेत आल्यानंतर त्यांची झालेली ही पहिली भाषणे. गेल्या दसर्‍याला नरेंद्र मोदी सत्तेत आले होते परंतु राज्यात निवडणुका येऊ घातल्या होत्या. तसेच यंदा नुकत्याच झालेल्या दादरी प्रकरणाने देशात झालेली घुसळण आणि शिवसेनेने सत्तेत असतानाही भाजपावर मारलेला बाण यामुळे हे दोघे नेते काय बोलतात याला विशेष महत्व होते. मात्र ही भाषणे एैकल्यावर नवीन असे काहीच सापडले नाही. दोघांचीही सत्ता आल्याने छाती फुगलेली आहे, व त्यातून एकूणच बॉडी लॅँग्वेज बदलेली दिसली. शिवसेनेने नरेंद्र मोदी यांना देशाला हिंदुराष्ट्र म्हणून जाहीर करण्याचे आवाहन केले. अर्थातच नेहमीप्रमाणे शिवसेनेने आजवर हिंदुत्वाच्या ज्या वल्गना केल्या त्यातीलच एक ठरावी अशी आहे. त्यामागे कोणताही वैचारिक पाया नाही किंवा कोणताही अभ्यास तर नाहीच नाही. जगात एकमेव असलेले हिंदू राष्ट्र नेपाळ. या देशानेही आता हिंदुराष्ट्राचा त्याग अलिकडेच केला. त्यामुळे आता या जगात एकही हिंदू राष्ट्र अस्तित्वात नाही. (उध्दवजींच्या आव्हानानंतर भारत होईल ते वेगळे). जगात धर्माच्या आधारावर काही मोजके देश आपले अस्तित्व टिकवून आहेत. आणि जे देश धर्माच्या नावावर आहेत त्यांची आखातातील मुस्लिम देश वगळता अन्य ठिकाणी दयनीय अवस्था आहे. पाकिस्तान व बांगला देश हे आपल्या शेजारचे दोन धर्माच्या आधारावर आहेत परंतु त्यांच्या देशात आज जे संघर्ष आहेत ते पाहता आपण सुखी आहोत. आपल्याकडे हिंदू धर्मीय मोठ्या संख्यने असले तरी अन्य धर्मिय सुखाने नांदत आहेत. आज सरसंघचालक म्हणतात की, हिंदू धर्मामुळे देश समान राहिला हे चुकीचे आहे. आपल्या धर्मनिरपेक्ष भूमिकेमुळे देश एकसंघ राहिला आहे. मोदी सरकारच्या कारभाराची भलावण भागवतांनी करणे आपण समजू शकतो. परंतु हे करीत असताना समान नागरी कायद्याचे समर्थन, डॉ. बाबसाहेबांची प्रशंसा करताना संघ ही खरोखरीच सांस्कृतिक संघटना आहे की राजकीय संघटना याचा प्रश्‍न पडावा. डॉ. बाबसाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करताना त्यातील उणीवा दाखविल्या होत्या. म्हणजे थोडक्यात त्यांनी संघाला अभिप्रेत असलेले हिंदुत्व नाकारले होते. मग असे असतानाही आज डॉ. बाबासाहेबांवर संघ का स्तुतिसुमने उधळत आहे, का तर मतांसाठीच ना? एकीकडे दलितांकडे मताचा जोगवा मागायचा व दुसरीकडे मोदी सरकारमधील मंत्री याच दलितांना कुत्र्याची उपमा देतो. असे उथळ आणि उन्मादाचे राजकारण आहे. असो. शिवसेनेला हिंदुत्व राष्ट्र करणे म्हणजे नेमके काय करायचे याची कल्पना आहे का? शिवाजीपार्कला शिवसैनिकंपुढे घोषणा करण्याएवढे ते सोपे नाही. केंद्रातील सरकारला त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. एक तर त्यासाठी लागणारे संसदेतील पाठबळ त्यांच्याकडे नाही. तसेच घटना दुरुस्ती करावयाची म्हणजे त्यासाठी स्वतंत्र समिती नेमून त्यांच्या अहवालानुसार करावी लागणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या सर्वधर्मसमभावाच्या घटनेतील तरतुदीला वगळावे लागणार आहे. हे सर्व करणे भाजपाला शक्य आहे का व निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जी वचने दिलेली नाहीतच त्याचा आता भाजपा कसा विचार करते? त्यामुळे देश हिंदू राष्ट्र करणे सध्या तरी शक्य नाही नव्हे तर कदापी शक्य होणार नाही. उलट यात भाजपाची सत्ता जाऊ शकते. सध्या प्रदीर्घ काळाने सत्ता आल्याने देशातील हिंदुत्ववादी शक्तींना उन्माद आल्यासारखे झाले आहे. त्याचाच हा परिपाक आहे. आज देशापुढे हिंदू राष्ट्रापेक्षा अधिक महत्वाचे प्रश्‍न आहेत. सध्या महागाईने घेरले आहे. सर्वसामान्यांना जीवनसत्वे पुरविणारी डाळ आता २०० रुपयांवर पोहोचली होती. पेट्रोल-डिझेलच्या किंमती जगात कमी होत असताना आपल्याकडे मात्र कमी होताना दिसत नाहीत. या महागाईविषयी संघ का बोलत नाही? मोदी सरकारवर अशा प्रकारे आंधळेप्रमाणे स्तुतीसमने उधळत संघ आपला अजेंडा राबविण्यासाठी उत्सुक आहे. अर्थातच पंतप्रधानांपासून ते संपूर्ण मंत्रिमंडळावर संघाची छाया पडलेली आहे. मोदींनाही संघाला अपेक्षित असलेला हिंदुत्ववादी भारत घडवायचा आहे. परंतु तसे करणे शक्य नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आणि जर मोदींना हिंदू राष्ट्र करायचेच असले तरी ते शिवसेनेच्या हाकेला ओ देऊन करणार नाहीत, हे नक्की.
------------------------------------------------------------------

0 Response to "हिंदुत्वाच्या वल्गना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel