-->
रौप्यमहोत्सवानंतरची कोकण रेल्वे

रौप्यमहोत्सवानंतरची कोकण रेल्वे

रविवार दि. १८ ऑक्टोबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
रौप्यमहोत्सवानंतरची कोकण रेल्वे
---------------------------------------
एन्ट्रो- कोकण रेल्वे आता रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण करीत असताना रेल्वेमंत्रीपदी कोकणाचे सुपुत्र सुरेश प्रभू आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे आता कात टाकून नव्याने उभी राहात आहे. रोप्यमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचे काम व विद्युतीकरणाचे काम ३१ ऑक्टोबरपासून सुरु करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्युतीकरण व दुपरीकरणासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी जागतिक बँक कर्ज द्यायला तयार आहे. त्यामुळे हा प्रकल्प निधी अभावी अडणार नाही असे सध्यातरी दिसते. अर्थातच याचे सर्व श्रेय सुरेश प्रभू यांच्याकडे जाते...
---------------------------------------------
कित्येक वर्षे कोकणी माणसाला स्वप्नवत वाटणारी कोकण रेल्वे आता २५ वर्षाची झाली आहे. दर्‍याखोर्‍यातून व निसर्गाच्या कुशीतून जाणारी ही रेल्वे अगदी काल-परवा सुरु झाल्यासारखी वाटते. २५ वर्षापूर्वी ही रेल्वे धावू लागली त्यावेळी रुळावरुन धावणारी ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण तासन-तास रुळाच्या बाजूने उभे राहात. अर्थात कोकणी माणसाने कामाधंद्याच्या निमित्ताने रेल्वे पाहिली होती परंतु आपल्या कोकणातून धावणार्‍या या रेल्वेचे त्यांना मोठे अप्रूप होते. परंतु अल्पावधीतच कोकणी माणसाला पटले की, आपल्या दारातून धावणारी ही गाडी आपल्यासाठी नाही. तर ती नेहमीच आपल्याला वाकुल्या दाखवीत दक्षिणेकडे निघून जाते. कारण कोकणी माणसाच्या वाट्याला जेमतेम पाच गाड्या आल्या. बाकीच्या ट्रेन्स मात्र बाय-बाय करीत निघून जात. आपण ज्या रेल्वेसाठी आपल्या जमिनी दिल्या, आपण जे स्वप्न रंगविले ते काही आपले भल्याचे स्वप्न नव्हतेच. कोकण रेल्वेचा फायदा बाहेरचेच लोक उठवू लागले. अगदी नोकर्‍यांपासून ते स्टॉल्स बळकाविण्यापर्यंत. ही कोकण रेल्वेच्या मार्गावरुन दक्षिणेच्या शेवटच्या टोकापासून अगदी दिल्लीपर्यंत गाड्या धावतात. मात्र आपल्याला याचा फारसा फायदा होतच नाही, ही एक खंत कोकणी माणसामध्ये होती. ही खंत व्यक्त करीत कधी २५ वर्षे लोटली हे समजलेच नाही. बॅरिस्टर नाथ पै यांनी देश स्वातंत्र्य झाल्यावर १९४८ साली पहिल्या लोकसभेत कोकण रेल्वेची मागणी केली होती. पक्षविरहित राजकारण करीत असताना त्यावेळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखाने कोकण रेल्वेची मागणी केली होती. त्याचवेळी रेल्वेचा तंत्रशुध्द आराखडा अ.व. वालावलकर यांनी तयार केला होता. त्यामुळे कोकण रेल्वेचा पाया जरुर रचला गेला. परंतु पुढीची उभारणी करण्यासाठी कोकणी माणूस रेल्वेमंत्री असणे गरजेचे होते. आणीबाणीनंतर मधू दंडवते जनता पार्टीच्या राजवटीत रेल्वेमंत्री झाले आणि कोकणाला प्रथमच मंत्रीपद मिळ्याल्याने कोकणी माणसाची अशा-अपेक्षा उंचावली. त्यावेळी आपटा ते रोहा या कामाला दंडवतेंनी मंजुरी दिली खरी मात्र हे सरकार दोन वर्षातच गडगडल्याने कोकण रेल्वेच्या कामाला ब्रेक लागला. १९८९ साली माधवराव शिंदे यांनी कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करुन चार राज्यांनाही त्यात वाटेकरी करुन घेतले. अशा प्रकारे महामंडळाच्या रुपातून साकारलेला हा पहिला रेल्वे प्रकल्प होता. १९९० साली या ७६० कि.मी. लांबीच्या प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला व नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली. आज कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असला तरी दररोज या वरुन ५६ गाड्या जात आहेत. रेल्वेच्या नियोजनाचे काम किती अवघड आहे हे त्यावरुन दिसते. कोकण रेल्वे आता रौप्यमहोत्सवी वर्षात पर्दापण करीत असताना रेल्वेमंत्रीपदी कोकणाचे सुपुत्र सुरेश प्रभू आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे आता कात टाकून नव्याने उभी राहात आहे. रोप्यमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचे काम व विद्युतीकरणाचे काम ३१ ऑक्टोबरपासून सुरु करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्युतीकरण व दुपरीकरणासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी जागतिक बँक कर्ज द्यायला तयार आहे. त्यामुळे हा प्रकल्प निधीअभावी अडणार नाही असे सध्यातरी दिसते. अर्थातच याचे सर्व श्रेय सुरेश प्रभू यांच्याकडे जाते. कोकणातील चाकरमन्यांना नेहमी चकवा देणार्‍या कोकण रेल्वेने यंदा सुखद धक्का दिला होता. गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या कोकणवासीयांसाठी पनवेल-चिपळूण डेमू अनारक्षित पहिली ट्रेन सुरु करण्यात आली होती. परंतु ही रेल्वे सुरु झाली आणि गणपतीनंतर लगेचच ती दक्षिणेत वळविण्यात आली. यावेळी अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याचे कारण दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या डेमू ट्रेनसाठी कोकणवासियांना झगडावे लागणार आहे असेच दिसते. अनेक गाड्या या जिल्ह्यातच एक थांबा घेत पुढील राज्यात जात असल्यामुळे आपल्याला हात करीत ही रेल्वे बाहेरच्या प्रवाशांसाठी चालली अशी समजूत होती. त्यावर उपाय म्हणून डेमू ट्रेनचा चांगला मार्ग होता. तसे पाहता कोकणासाठी म्हणून जेमतेम पाचच गाड्या आहेत आणि त्या पुरेशा नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कोकण रेल्वेही स्वतंत्र असली तरी तिची अर्धी पावले ही मध्य रेल्वेमध्ये अडकली आहेत. त्यामुळे अनेकदा त्यांचा कारभार हा दिल्लीच्या केंद्रीय मंत्रालयातून होतो व तेथे महाराष्ट्राचा विचार करण्याऐवजी संपूर्ण रेल्वे मार्गावर असलेल्या सर्व राज्यांचा विचार करण्याकडे प्राधान्य असते. यातून कोकणावर नेहमीच अन्याय होत गेला. कोकण रेल्वेसाठी आपण आपल्या जमीनी दिल्या व त्यासाठी त्याग केला, मात्र याचा फायदा आपल्याला न मिळता अन्य राज्यातल्या लोकांना मिळतो ही सल कोकणवासियांच्या मनात होतीच. कोकण रेल्वेवर आता भविष्यात अनेक चांगल्या बाबी सुरेश प्रभू यांच्यामुळे येऊ घातल्या आहेत. सध्या कोकणरेल्वेची प्रवासी वाहतूक तोट्यात असली तरीही माल वाहतुकीमुळे कोकण रेल्वेचा जमा व खर्चाचा ताळमेळ साधला जातो. कोकण रेल्वेने कोलाडहून सुरु केलेल्या रो-रो सेवेमुळे ट्रकच थेट गाडीवर चढवून थेट कोचीपर्यंत नेता येतो. या सेवेचा मालवाहुतीस मोठा फायदा होत आहे व ही सेवा लोकप्रिय झाली आहे. ही जशी रो-रो सेवा आहे त्याच धर्तीवर प्रवाशांसाठी या मार्गावर ठिकठिकाणी डेमू सेवा सुरु करता येऊ शकते. यात प्रवाशांची जशी सोय होऊ शकते तसेच रेल्वेचा महसूलही वाढू शकतो. सर्वात महत्वाचे म्हणजे कोकण रेल्वेच्या किनारपट्टीवर आता अनेक बंदरे विकसीत करण्याची योजना आहे. यातील जयगड बंदराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हे बंदर रेल्वेने जोडण्याची महत्वाकांक्षी योजना सध्या हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारे बंदरे रेल्वेने जोडली गेली की, कोकणाचे चित्र पालटण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर कोल्हापूरला कोकण रेल्वे नेण्याचा एक प्रस्ताव आहे. नजिकच्या काळात तसे झाल्यास कोकण व घाटमाथा हे दोन भाग एकत्र येण्यास मोठी मदत होईल तेथील उद्योगधंद्यांसाठी निर्यात करण्यास थेट बंदरांचा उपयोग करता येणार आहे. रेल्वे व त्याला जोडलेले बंदर आले की, त्या भागाचा कायापालट होतो हे जगातील अनेक देशांतील उदाहरणे आहेत. आपल्याकडे आपण कोकण रेल्वे बांधली परंतु ही रेल्वे अधिक बळकट होण्यासाठी व व्यावसायिकदृष्टया स्वबळावर उभी राहाण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. आता कोकणातील सुपुत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने कोकण रेल्वेला चांगले दिवस येतील, यात काही शंका नाही. कोकण रेल्वेच्या जोडीने मुंबई-गोवा महामार्गाचेही दुपरीकरण वेगाने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे कोकणाचे चित्र भविष्यात बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
-------------------------------------------------------------------------

0 Response to "रौप्यमहोत्सवानंतरची कोकण रेल्वे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel