-->
प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला  पुन्हा पाने पुसली

प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली

संपादकीय पान मंगळवार दि. १३ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला 
पुन्हा पाने पुसली
पंतप्रधान नरेंद्र मोदी भरकन् विमानाने आले व पंधरा मिनिटात निघून गेले. प्रकल्पग्रस्तांच्या अशा, अपेक्षांचा भंग करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसून भरकन् निघून गेले. सध्या पंतप्रदानांना विदेश दौर्‍यातून देशातील कामात लक्ष घालण्यात वेळ मिळत नाही. तरी ते त्यातल्या त्यात वेळ काढून बिहारच्या निवडणुकीत खोटी आश्‍वासने देत फिरत आहेत. त्यातच वेळ काढून ते जे.एन.पी.टी. बंदराच्या चौथ्या टर्मिनलच्या भूमिपुजनाला उपस्थित राहिले. अर्थात या बंदराला भेट देण्याची ही त्यांची पंतप्रधान कारकिर्दीतील दुसरी भेट. गेल्या भेटीत त्यांनी १६ ऑगस्ट २०१४ रोजी पाच प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्क्यांनी इरादापत्रे वाटली होती. कालांतराने ही इरादापत्रे बोगस असल्याचे सिध्द झाले. या मागच्या भेटीत त्यांनी बारापदरी रुंद रस्ते आणि एस.सी.झेड.च्या घोषणा केल्या होत्या. या घोषणांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने एक साधे पाऊलही पडले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी असताना आता चौथ्या टर्मिनलच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांची कोणतीही सोडवणूक न करता केवळ आश्‍वासने देत राहात दिवश ढकलण्यार्‍या मोदी सरकारविरुध्द जनतेत आता असंतोष खदखदू लागला आहे. त्यातच प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही प्रश्‍नांची दखल न घेता पंतप्रधान रवाना झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे. गेली ३० वर्षे साडेबारा टक्के परताव्यासाठी संघर्ष करणार्‍या प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा उद्रेक या निमित्ताने झाला. प्रकल्पग्रस्त शेतकरी हे अत्यांत तळागाळातील कष्टकरी व कष्ट करुन उदनिर्वाह करणारे आहेत. अशा या कष्टकर्‍यांची फसवणूक करणे पंतप्रधानांसारख्या व्यक्तीला शोभत नाही. आज ज्यांच्या मतांवर निवडून आले आहात त्यांचाच विश्‍वासघात करण्यासारखे आहे. जे.एन.पी.टी.चे विद्यमान अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या संागण्यानुसार, प्रंतप्रधांनांची दिशाभूल करण्यात आली होती. असे जर होते तर दिशाभूल करणार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे होते. तसेही सरकारने केलेले नाही. म्हणजे सरकार शेतकर्‍यांना फसविण्याच्या कटात सामिल आहे, हे सिद्द होते. सरकारच्या या निष्कियतेपणाच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधांनांना काळे झेंडे दाखविण्यात आले. परंतु त्याचे सरकारला काही देणेघेणे नाही असेच दिसते. कारण पंतप्रधानांनी याची दखलही घेतली नाही. निवडणुकांच्या अगोदर पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे व मोठी आश्‍वासने देणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर असे बदलले कसे? असा सवाल सर्वसामान्य जनतेचा आहे. मोदींनी या आपल्या भेटीत मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित स्मारकाचे भूमीपूजन केले. तसेच मेट्रोच्या दोन मार्गांचे भूमीपूजन केले. अर्थातच हे सर्व निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केलेली भूमीपुजने आहेत. बिहारमधील निवडणुकांचा प्रचार आता जोरात सुरु आहे अशा वेळी डॉ. आंबोडकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन करुन एक प्रकारे सरकारने दलित मतांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मुंबईतील मेट्रोची भूमीपूजने ही यापूर्वी कॉँग्रेसच्या राज्यात झालेली आहेत. सरकार आता त्यात पुन्हा नव्याने कसले भूमीपूजन करते आहे ते समजायला मार्ग नाही. सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुक तोंडावर आहे. अशा वेळी नेमके सरकारने मेट्रोचे भूमीपूजन हाती घेऊन तेथील मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. कल्याण-डोंबिवली ही महानगरपालिका असली तरीही मुंबईशी जोडलेली आहे. येथून लाखो लोक दररोज मुंबईला येतात. त्यामुळे मुंबईत आपण काही तरी धाडसाचे काम करीत आहोत असे दाखविण्याचा उद्योग या भूमिपूजनाच्या निमित्ताने सरकारने केला आहे. खरे तर आंबेडकर स्मारक असो किंवा मुंबईतील मेट्रो असोत हे यापूर्वीच्या कॉँग्रेस सरकारने नियोजित केलेले प्रकल्प आहेत. यात मोदी सरकारची कल्पकता कसलीही नाही. फक्त त्यांनी पुन्हा एकदा भूमीपूजन करुन कामास प्रारंभ केला आहे इतकेच. त्यातच भाजपाने मोदींच्या या दौर्‍याच्या निमित्ताने शिवसेनेस त्यांची जागा दाखवून दिली आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमास शिवसेना प्रामुख उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते व आयत्या वेळी जाऊन व्यासपीठावर नव्हे तर प्रेक्षकांमध्ये बसण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. अर्थात अशी मानहानी पत्करण्यापेक्षा ठाकरे यांनी बीडच्या शेतकर्‍यांच्या मेळाव्याला उपस्थित राहाणे पसंत केले. मात्र यातून शिवसेनेचे सत्तेसाठी असेलली लाचारी पुन्हा एकदा दिसून आली. सुरुवातीला सत्ता मिळत नव्हती त्यावेळी अशीच लाचारी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेला अतिशय कमी दर्ज्याची खाती बहाल करण्यात आली. मात्र सत्तेत आहोत त्याचे समाधान मानत उध्दव ठाकरे यांनी हा रागही गिळला. आता पुन्हा एकदा मोदींच्या दौर्‍याच्या निमित्ताने शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. मात्र ठाकरे आपला कणा मोडेल एवढे वाकत सत्तेसाठी मोदींनी केलेला अपमान गिळत आहेत. आता तरी शिवसेनेतून मानाने बाहेर पडावे व आपला मराठी बाणा टिकवावा.
---------------------------------------------------------  

0 Response to "प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel