-->
फसलेले शाईअस्त्र

फसलेले शाईअस्त्र

संपादकीय पान बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
फसलेले शाईअस्त्र
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उधळून लावण्यासाठी शिवसेनेने आखलेले काळ्या शाईचेअस्त्र फुसकेच ठरले. या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे प्रमुख व एक ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहर्‍यावर काळी शाई लावण्यात आली व याव्दारे हा कार्यक्रम रद्द केला जाईल असे शिवसेनेच्या मावळ्यांना वाटत होते. परंतु अखेरीस त्यांचा हा डाव त्यांच्याच आंगलटी आला. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी संपूर्ण संरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले व हा कार्यक्रम कोणतेही विघ्न न घडता पार पडला. त्याबद्दल सरकार व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. शिवसेना सध्या अस्वस्थ  आणि बेचैन आहे. सत्तेत आहोत पण ती सत्ता काही कामाची नाही. भाजपाने आपल्याला खाती देताना पूर्णपणे चूना लावला. त्यातच मुख्यमंत्र्यांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला सन्मान सोडा, पण साधे विचारतही नाहीत. अलिकडच्या मुंबई भेटीत तर पंतप्रधानांनी त्यांना साधे आमंत्रणही दिले नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. त्याचा राग त्यांनी सुधींद्र कुलकर्णी यांच्या कार्यक्रमावर काढला. खरे तर गेल्याच आठवड्यात गुलाम अली यांचा अशाच प्रकारे कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकी देण्यात आली होती. मात्र गुलाम अली यांनीच आपले कार्यक्रम रद्द करण्याचे ठरविले. पाकिस्तानी कलाकार, गायक भारतात मोठ्या संख्येने येतात. त्यांच्या कलागुणांना आपल्याकडील रसीक मोठी दाद देतात. अर्थातच तो रसिक हा काही मुस्लिम नसतो, उलट मोठ्या संख्येने हिंदुच असतो. कलाकार हा कलाकार आहे, त्याने देशाची सीमा ही कधीच ओलांडलेली असते. अशा स्थितीत पाकिस्ततान अतिरेकी कारवाया करते म्हणून त्यांच्या देशातील कलाकाकारंना मज्जाव करणे त्या देशातील क्रिकेटपटूंना खेळू न देणे हे जनतेला पटणारे नाही. परंतु शिवसेना आपला या कलाकारांवराचा रोष दाखवून राष्ट्रप्रेमाचा ठेका आपल्याकडेच आहे असे दाखविते. परंतु राष्ट्रप्रेम दाखविण्याचा हाच एकमेव निकष आहे का? बरे, यापूर्वी मुंबई व महाराष्ट्रात अनेक पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम झाले आहेत. अनेक पाकिस्तानी कलाकार मुंबईत राहत देखील आहेत. परंतु त्याला शिवसेनेचा आक्षेप नसतो. यातील काही कलाकार मातोश्रीवर जाऊन साहेबांचा आशिर्वाद घेऊन आले की ते पवित्र झाले असे शिवसेनेला वाटते. अदनान सामी या पाकच्या कलाकाराबाबतही असचे झाले,याची आठवण यावेळी करुन द्यावीशी वाटते. आता कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सुरळीत पार पाडावे यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. कार्यक्रमाच्या स्थळी काही सैनिक होते परंतु त्यांना कोणतीही गडबड करु नये असे आदेश आले असे सांगण्यात आले. म्हणजेच शिवसेनेने सत्तेच्या लालसेपोटी आपल्या आंदोलनातून शेपूट घातले असाच त्याचा अर्थ होतो. शिवसेनेचे जर खरेच राष्ट्रप्रेम उफाळून आले असेल तर त्यांनी या पाक धार्जिण्या भाजपाबरोबर सत्तेत कशाला रहावे असाही प्रश्‍न पडतो. सत्तेत तर एकत्र रहायचे आणि बाहेर मात्र आपले राष्ट्रप्रेम व्यक्त करताना सरकारच्या विरोधी वागायचे. सुधींद्र कुलकर्णींसारख्या एका निशस्त्र माणसाच्या मागावर राहून त्यांच्या चेहर्‍याला शाई फासण्याचे काम करणे म्हणजे राष्ट्रप्रेम नव्हे. तर ही पळकुटी संस्कृती झाली. या प्रकाशन सोहळ्यात कसुरी हे भारतविरोधी बोलले का? तर नाही. उलट त्यांनी वाजयेपींनी ज्या शांततेच्या मार्गाने वाटाघाटी सुरु केल्या त्यापुढे चालू रहाव्यात अशी मागणी केली. प्रत्येक पाकिस्तानी नागरिक हा भारतविरोधी आहे असे म्हणणे चुकीचे आहे. आपल्याकडे लोकशाहीची पाळेमुळे चांगली रुजली आहे. प्रत्येक नागरिकाला त्याने कोणती गोष्ट करावयाची त्याचे त्याला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. दुसर्‍याने काय करायचे हे ठरविण्याचा अधिकार अन्य कुणाला आपल्या लोकशाहीने दिलेला नाही. भारतीय कलाकारांना पाकिस्तानात बोलावले जात नाही अशी सातत्याने टीका केली जाते. मात्र भारतीय कलाकारांना बोलवायचे किंवा नाही हा त्या देशाचा प्रश्‍न आहे. आपल्याकडे जर रसिकांना पाक कलाकारांना एैकायचे असेल तर त्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले पाहिजे. परंतु हडेलहप्पी करुन आजवर वाढलेल्या शिवसेनेला ही संस्कृती समजणार नाही. पाकिस्तान जर चुकत असेल तर त्यावा वठणीवर आणण्यासाठी आपल्याकडे दुसरे उपाय आहेत. कारगील युध्दात त्यांना चांगलीच धुळ चारली होती, परंतु यातून तेथील राजकारणी बोध घेत नाहीत. मात्र त्यांना सरळ करण्यासाठी वेगळे मार्ग आहेत. अर्थात त्यांचा मार्ग हा शांततामय चर्चेतून जातो हे समजणे शिवसेनेच्या पलिकडे आहे. शिवसेनेचे हे शाईअस्त्र फुकट गेले. आता तरी त्यांनी हे पोरखेळ थांबवावेत व एका सत्ताधार्‍यांप्रमाणे राजधर्म पाळावा. अन्यथा सत्तेच्या मोहातून बाहेर पडून शाईअस्त्र काय अन्य कुठलेही अस्त्र सोडावे.
------------------------------------------------------------

0 Response to "फसलेले शाईअस्त्र"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel