-->
रविवार दि. १२ एप्रिल २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कोकणाच्या विकासाचे सूत्र
-----------------------------------------
एन्ट्रो- कोकणाच्या पर्यटनाबाबत गेल्या काही वर्षात गांभीर्याने विचार झालेला नाही. अलिबाग हे मुंबईपासून जवळ असल्याने ते विकसीत झाले. मात्र येथे रस्ते, बारमाही बोटींची सुविधा झाल्यास अलिबाग हे पर्यटन केंद्र म्हणून झपाट्याने विकसीत पावेल व आन्तरराष्ट्रीय नकाशावर झळकू शकेल. अलिबागपासून ते शिरोड्यापर्यंतचा भाग हा पर्यटनाचे एक मोठे केंद्र होऊ शकते. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तळकोकणात तर मालवण ते शिरोडा या पट्यात गोव्याचा पर्यटक आपल्याकडे कसा येईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी पर्यटकांना गोव्याच्या धर्तीवर चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या पाहिजेत. यातूनच कोकणाचा विकास साधला गेला पाहिजे. एकीकडे पर्यटन, समुद्रकिनार्‍यावर बंदरांची उभारणी व कृषी उत्पादन याची सांगड घालत कोकणाचा विकास केल्यास राज्यातील एक उत्तम देणारा विभाग म्हणून कोकणाकडे पाहिले जाईल...
----------------------------------------------------------------------------
निसर्गाने लयलूट केलेल्या कोकणाची विकाससूत्री कशी असेल? असा प्रश्‍न नेहमीच सर्वांना पडतो. शरद पवार हे गेली दोन दशके नेहमीच सांगत आले आहेत की, कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. शरद पवारांनी काही चुकीचे सांगितले नाही. मात्र पश्‍चिम महाराष्ट्राचे राजकारण करणार्‍या पवारसाहेबांनी कोकणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे समुद्रकिनारा, दुसरीकडे पर्यटकांना खुलविणारा निसर्ग आणि आंबा, काजू, नारळ यांच्यासारखी रोख पैसे देणारी कृषी उत्पादने हीच कोकणच्या विकासाची सुत्रे ठरली पाहिजेत. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानपरिषदेत कोकणातील आंब्याच्या पिकाबाबत विशेष चर्चा झाली. त्यात शेकापचे आमदार भाई जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी प्रांजळपणे आपली मते मांडली. या चर्चेतून काही तरी चांगले घडले व कोकणाचा विकास मार्गी लागेल असे म्हणावयास हरकत नाही. जगात असे म्हटले जाते की, ज्या देशाला समुद्रकिनारा आहे तो देश झपाट्याने प्रगती करतो. अनेक देशांनी ते सिद्द करुनही दाखविलेले आहे. आपण मात्र यात मागासलेले आहोत, असेच खेदाने म्हणावे लागते. राज्याला ७०० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे मात्र या किनारपट्टीवर हातीच्या बोटावर मोजण्याइतपत बंदरे विकसीत करण्यात आली आहेत. अगदीच स्पष्ट बोलायचे तर मुंबईचा विकास हा बंदरामुळेच झाला. जर मुंबईला जोडून बंदर नसते तर मुंबई एवढी विकसीत झालीच नसती. आता आपल्याला कोकणाच्या किनारपट्टीवर छोटी व मध्यम आकराची बंदरे विकसीत करुन ती रेल्वेने जोडावी लागतील. यातून देशातील बहुतांशी आयात-निर्यात या मार्गाने होऊ शकेल. यातून मोठ्या रोजगाराची संधी मिळू शकते. त्याचबरोबर कोकणचा आंबा हा आपल्याला हुकमी परकीय चलन मिळवून देतो. मात्र चांगल्या दर्ज्याच्या आंब्याचे उत्पादन घेऊन आपण जगाला भूरळ कशी घालू शकतो याला आता महत्व आहे. तसेच आंबा आपल्याकडे जेमतेम चार महिने टिकतो. जर आपण चांगल्या प्रकारची शीतगृहे तयार केली तर आंब्याची चव आपण बारा महिनो चाखू शकतो. यातून उत्पन्न वाढू शकते व शेतकर्‍यालाही चांगली किंमत येऊ शकते. मोकल नावाच्या एका बागायतदाराने संशोधन करून आंब्याचे पीक डिसेंबरमध्ये काढले तेव्हापासून त्यांचा आंबा डिसेंबरमध्ये बाजारात येतो. दोन डझनांची पेटी आज पाच हजार रुपयांना विकली जाते. हा अनुभव लक्षात घेता दोन महिन्यात होणारे हे उत्पादन किमान पाच महिने कसे होईल व चांगली शितगृहाची सोय करुन ते बारा महिने उपलब्ध करुन देण्याविषयी संशोधन झाले पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज आंब्याचे उत्पादन जेमतेम दहा टक्क्यांवर आले आहे. ते वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात परकीय चलन देणार्‍या आंबा आणि काजू यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आंबा-काजू बोर्डाला ताबडतोब कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. आंबा-काजू यांच्या जोडीला नारळ हे देखील एक महत्वाचे एक चांगले उत्पन्न देणारे झाड आहे. नारळाच्या प्रत्येक वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो. त्याची एक मोठी बाजारपेठ आहे. नाराळापासून बनविल्या जाणार्‍या विविध उत्पादांची बाजारपेठ विकसीत करण्यासाठी तसेच चांगल्या प्रतिचे उत्पादन तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सुपारीच्या पिकाचेही तसेच आहे. कोकणाला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली असताना मत्स्य विद्यापीठ नागपूरला असावे हे अनाकलनीय आहे. हे विद्यापीठ कोकणात करावे किंवा कोकणात दुसरे एक मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे. मस्यउद्योगही आपल्याकडे संघटीत नाही. यात मोठ्या कंपन्या आल्यास लहान मच्छिमाराला जगणे कठीण होईल. त्यापेक्षा लहान मच्छिमाराला अद्यावत करुन त्याला चांगल्या सुविधा दिल्यास मस्य उद्योग आणखी चांगल्या तर्‍हेने विकसीत होईल. हा उद्योगही चांगल्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारा होऊ शकतो. मात्र त्यासाठी तसे प्रयत्न करण्याची गरज आहे. कोकणात पिकणारा आंबा निर्यातीसाठी मुंबईपर्यंत आणला जातो. याउलट, कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील साखरेच्या कारखान्यांमधून निघणारी मळी जवळ असलेल्या विजयदुर्ग बंदरातून निर्यात केली जाते. ही वस्तुस्थिती पाहताना कोकणात पिकणारा आंबा देवगड तसेच विजयदुर्ग बंदरातून निर्यात करण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कोकणात काम करायला मजूर मिळत नाही ही तक्रार सार्वत्रिक आहे. परंतु यावर मात करण्याची आवश्यकता आहे. जर स्थानिक कामगार उपलब्ध होण्यात अडचण असली तर ज्या राज्यातून उपलब्ध होतील तेथून मजूरांना आणून कोकणाचा विकास करण्याची गरज आहे. कोकमाचे सरबत कोकाकोला वा पेप्सीप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीचे बनविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कोकणाच्या पर्यटनाबाबत गेल्या काही वर्षात गांभीर्याने विचार झालेला नाही. अलिबाग हे मुंबईपासून जवळ असल्याने ते विकसीत झाले. मात्र येथे रस्ते, बारमाही बोटींची सुविधा झाल्यास अलिबाग हे पर्यटन केंद्र म्हणून झपाट्याने विकसीत पावेल व आन्तरराष्ट्रीय नकाशावर झळकू शकेल. अलिबागपासून ते शिरोड्यापर्यंतचा भाग हा पर्यटनाचे एक मोठे केंद्र होऊ शकते. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. तळकोकणात तर मालवण ते शिरोडा या पट्यात गोव्याचा पर्यटक आपल्याकडे कसा येईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी पर्यटकांना गोव्याच्या धर्तीवर चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या गेल्या पाहिजेत. यातूनच कोकणाचा विकास साधला गेला पाहिजे. एकीकडे पर्यटन, समुद्रकिनार्‍यावर बंदरांची उभारणी व कृषी उत्पादन याची सांगड घालत कोकणाचा विकास केल्यास राज्यातील एक उतत्तम देणारा विभाग म्हणून कोकणाकडे पाहिले जाईल, याबाबत काहीच शंका नाही.
-----------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel