-->
रविवार दि. १५ फेब्रुवारी २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
आप आये, बहार आयी...
-------------------------------------
एन्ट्रो- आपची ही लाट म्हणजे केवळ भाजपाच्या विरोधातील मत नसून पंतप्रधान मोदींच्या विरोधातील आहे. कारण ही मते मोदींनी मागितली होती. सरकारच्या धोरणाच्या विरोधात झालेले हे मतदान आहे. विकासाच्या नावावर सत्तेत येऊनही भाजपाने आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्याचा जो प्रयत्न सुरु केला आहे त्याविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. आपल्या ध्येय धोरणाच्या विरोधातील हा कौल ओळखून भाजपा आपला पराभव मान्य करेल का? पण तसे होताना दिसत नाही. यातून भाजपा काही बोध घेईल असे काही दिसत नाही. आपल्याकडची जनता आता शहाणी, सुज्ज्ञ झालेली आहे. काम न करणार्‍या सत्ताधार्‍यांना मतपेटीच्या आधारे घरी कसे बसवायचे हे त्यांना पक्के ठाऊक आहे. दिल्लीची निवडणूक ही त्याची एक चुणूक ठरावी...
----------------------------------------------------
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनतेने राजकीय पक्षांना व नेत्यांना सणसणीत चपराक लगावली आहे. आम आदमी पक्षाला जे काही दैदिप्यमान यश मिळाले त्यामागचे विश्‍लेषण काळाच्या ओघात होईलच. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे लोकांना चांगला बदल हवा आहे. त्यांना भ्रष्टाचारमुक्त शासन हवे आहे. प्रामुख्याने तरुणांना पारंपारिक पध्दतीने चालत आलेले, कंत्राटदारांचा वरचश्मा असलेले व त्यांच्या पैशावर चाललेले राजकारण तरुण पिढाला नको आहे. यातूनच आपला दिल्लीत बळ मिळाले. भाजपाने मोठ्या-मोठ्या गप्पा मारुन आपली फसवणूक केली आहे हे त्यांना नऊ महिन्यांनंतर पटले आहे. तसेच कॉँग्रेसच्या हातून आता काही नवीन होणार नाही हे देखील त्यांना यापूर्वीच पटले होते. यातूनच आपला पाठबळ देऊन जनतेने एक नवा प्रयोग करण्याचे ठरविले. तसे पाहता यापूर्वीच्या आपच्या ४९ दिवसांच्या सरकारमध्ये फार काही केले नाही. मात्र आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी झालेल्या चुकांबद्दल जनतेची माफी यातून मागितली. झालेली चूक कबूल करुन जनतेपुढे पुन्हा नव्याने जाण्याचा त्यांचा प्रमाणिकपणा लोकांना आवडला. एखाद्या राजकारण्याने जनतेची माफी मागून आपल्या झालेल्या चुका मांडणे ही बाब तशी भारतातील जनतेला नवीनच. त्यामुळे केजरीवाल यांचे राजकीय वजन चांगलेच वाढले. एकूणच पाहता राजकारणात आप आये, बहार आयी... असे म्हणण्याची पाळी जनतेने राजकीय पक्षांवर आणली आहे.    
नरेंद्र मोदींची दरदिवशीची प्रवचने, त्यांनी ओबामांना बराक अशी मारलेली हाक, केजरीवाल माजी मुख्यमंत्री असूनही त्यांना गणराज्य दिनाचे न दिलेले आमंत्रण आणि गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी परिधान केलेला दहा लक्ष रुपयांचा ड्रेसही लोकांना आवडला नव्हता. किरण बेदींना त्यांनी दिलेली मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी भाजपातील अनेकांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला न पचणारी होती. परिणामी भाजपा व संघाचे प्रमुख कार्यकर्ते प्रचार कार्यापासून दूर राहिले. नितीशकुमार, ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला, शरद पवार व द्रमुक या सारख्या देशातील प्रादेशिक नेत्यांनी व पक्षांनी आपल्या भाषिक मतदारांना आपच्या बाजूने जाण्याचे केलेले आवाहन हेही अनेकांनी त्या पक्षाच्या विजयाचे एक कारण ठरविले. दिल्ली विधानसभेच्या गेल्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ३२ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीची सारी सूत्रे संघ परिवाराने आपले नागपूरचे निष्ठावंत स्वयंसेवक व केंद्रीय भूस्तर वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हाती सोपविली होती. उमेदवारांची निवड करण्यापासून जाहीरनामा तयार करण्यापर्यंत आणि हर्षवर्धन यांचे नाव नेतेपदासाठी पुढे करण्यापासून त्या निवडणूक प्रचाराची सारी आखणी करण्यापर्यंतची जबाबदारीच तेव्हा गडकरींकडे होती. या निवडणुकीत मोदींनी त्यांना पूर्णपणे बाजूला सारले आणि ओळीने ४१ निवडणुका जिंकण्याची कीर्ती संपादन केलेल्या अमित शहांच्या हाती तिची सारी सूत्रे सोपविली. या शहांनी दिल्लीचे उमेदवार ठरविले, पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आणि किरण बेदींकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले. हा सारा प्रकार संघाच्या संतापाला कारण ठरला. बेदींच्या नावाच्या घोषणेमुळे भाजपामध्ये सरळसरळ दोन तट पडले होते.  दिल्लीत २०१३ मध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, पण आता आपने गेल्या वेळेपेक्षा ३९ जागा अधिक जिंकून अधिक २२ टक्के मतेही घेतली आहेत. २०१३ च्या तुलनेत भाजपची मतदानाची टक्केवारी दीड टक्क्याने घसरली आहे, तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घसरली आहे. अर्थात लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे विषय व मतदारांची मानसिकता वेगवेगळी असते हे मान्य करूनही केवळ आठ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप दिल्लीच्या ७० पैकी ६० मतदारसंघांत आघाडीवर होता व आज त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीकरांच्या भूमिकेत गेल्या आठ महिन्यांत नेमके काय परिवर्तन झाले हे समजून घेण्याची गरज आहे. या निवडणुकांत भाजपच्या मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसत असली तरी खरी टक्केवारी ही घसरलेल्या कॉंग्रेसच्या मतांची आहे. भाजपने आपला मतदार राखला आहे. आपची टक्केवारी २२ टक्क्यांनी वाढली आहे, तर कॉंग्रेसचे १७ टक्के मतदान घसरले आहे. शिवाय बसपा किंवा जनता दलाचा मतदार आपकडे वळला आहे.
या निवडणुकीत सर्वच पक्षांनी वीज व पाण्याचे दर कमी करण्याचे, महिलांना सुरक्षितता देण्याचे आश्वासन दिले होते. पण ही निवडणूक अरविंद केजरीवाल यांच्याभोवतीच केंद्रित झाली होती. एकाअर्थी केजरीवाल यांनी दिल्लीच्या मतदाराकडून सार्वमत मागितले व त्यात ते यशस्वी झाले. दुसरीकडे भाजपने ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रित करून अध्यक्षीय पद्धतीप्रमाणे लढवण्याचा प्रयत्न केला. भाजपला उत्तर देताना त्याच पद्धतीने आपने केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे केले. महत्त्वाची बाब म्हणजे केजरीवाल यांची लोकप्रियता यंदा वाढली. त्यांच्या पक्षाला मत न देणारेही त्यांच्या बाजूने झुकले. कॉंग्रेसला मतदान करणारा गरीब व मध्यमवर्ग आप व भाजपकडे वळला. कॉंग्रेसला मिळालेली १० टक्के मते ही सर्वच वर्गांतून मिळाली असेही चित्र दिसतेय. पण एकंदरीत केवळ गरिबांच्या मतांमुळे आपला घवघवीत यश मिळाले हा निष्कर्ष बरोबर ठरणार नाही. दिल्लीतील मध्यम व उच्च मध्यमवर्गानेही आपला मते दिली. भाजपला केवळ उच्चवर्गाने जवळ केले. जे तरुण व नवमतदार होते त्यांनी आपच्या बाजूने मतदान केले. आपला घवघवीत यश मिळण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुस्लिम मतदारांनी या पक्षाला भरघोस मते दिली. दिल्लीत सुमारे ११ टक्के मुस्लिम मते असून हा मतदार शहरातील ७-८ मतदारसंघांत अधिक प्रमाणात आहे. या मतदारामुळे निवडणुकीला निर्णायक वळण मिळाले. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व आपफमध्ये मुस्लिम मते विभाजित झाली होती. यंदा तशी परिस्थिती आली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत बहुसंख्य मुस्लिम मते आपच्या बाजूने होती. पण भाजपला पंजाबी खत्री, जाट, ओबीसी या वर्गाकडून भरघोस मते मिळाल्याने भाजपला यश मिळाले होते.
देशातल्या अनेक राज्यांत कॉंग्रेस आपला हक्काचा मुस्लिम मतदार गमवत असताना त्यामध्ये आता दिल्लीचीही भर पडली आहे. दिल्लीतला शीख मतदारही आपच्या बाजूने उभा राहिला व त्यांची मते दोन पक्षात विभागली गेली हे दिसून येते. या निवडणुकीत दलित मतदार आपच्या बाजूने उभा राहिलेला दिसत असला तरी मध्यम व उच्च मध्यमवर्गाने भाजपला जवळ केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पारड्यात दलितांकडून मोठ्या प्रमाणात मते पडली होती. या निवडणुकीत मात्र हा वर्ग आपच्या बाजूने उभा असल्याने दलितांसाठी राखीव असलेले सर्व मतदारसंघ मआपफने जिंकले. पण पंजाबी मतदाराने भाजपची असलेली निष्ठा सोडली नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. भूसंपादन कायद्यावरून झालेला गदारोळ जाट समाजाच्या दृष्टीने संवेदनशील मुद्दा होता. जाट समाजाकडे उत्तर प्रदेश, हरियाणा येथे जमिनी असून या समाजाचा मोठा मतदार दिल्लीत आहे. हा मतदार भाजपच्या विरोधात गेला व त्यांनी आपला पसंती दिली. आपची ही लाट म्हणजे केवळ भाजपाच्या विरोधातील मत नसून पंतप्रधान मोदींच्या विरोधातील आहे. कारण ही मते मोदींनी मागितली होती. सरकारच्या धोरणाच्या विरोधात झालेले हे मतदान आहे. विकासाच्या नावावर सत्तेत येऊनही भाजपाने आपला हिंदुत्वाचा अजेंडा राबविण्याचा जो प्रयत्न सुरु केला आहे त्याविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. आपल्या ध्येय धोरणाच्या विरोधातील हा कौल ओळखून भाजपा आपला पराभव मान्य करेल का? पण तसे होताना दिसत नाही. यातून भाजपा काही बोध घेईल असे काही दिसत नाही. यातूनच त्यांची आता घसरण होणार आहे. आपल्याकडची जनता आता शहाणी, सुज्ज्ञ झालेली आहे. काम न करणार्‍या सत्ताधार्‍यांना मतपेटीच्या आधारे घरी कसे बसवायचे हे त्यांना पक्के ठाऊक आहे. दिल्लीची निवडणूक ही त्याची एक चुणूक ठरावी.
----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel