-->
संपादकीय पान मंगळवार दि. २३ डिसेंबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
सरकार हिंदूंचे की सर्वधर्मियांचे?
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे फक्त हिंदूंचे आहे की सर्वधर्मियांचे असा प्रश्‍न उपस्थित होतो. कारण सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या परिवारातील विविध हिंदू संघटना ज्या आक्रमकतेने अन्य धर्मियातील लोकांना हिंदू धर्मात आणण्यासाठी हालचाली करीत आहेत ते पाहता हे सरकार केवळ हिंदूंच्याच भल्याचा विचार करीत असावे. हे सर्व सुरु असताना जगातील प्रत्येक घटनांवर भाष्य करणारे किंवा व्टिट करणारे नरेंद्र मोदी या घटनांबाबत मात्र सोयिस्कररित्या मौन पाळून आहेत. त्यांची ही मूक संमंती म्हणजे, आमचे सरकार आहे तुम्ही तुमचे धर्मांतराचे घर वापसी अभियान जोरदारपणे राबवा असे मूकपणे म्हणण्याचाच प्रकार आहे. कोणी कोणत्या धर्माचे पालन करावे व धर्मांतर करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. घटनेने आपल्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र असे असतानाही विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने घर वापसी हे धर्मांतरीत हिंदूंना पर धर्मात आणण्याचे अभियान राबविले जात आहे. जे धर्मांतरीत हिंदू आहेत त्यांनी कोणत्या कारणाने धर्म सोडला? त्याची कारण मीमांसा न करता व आपल्या झालेल्या चुका न सुधारता केवळ जोर जबरदस्तीने हे घर वापसी राबविले जात आहे. केंद्रात भाजपाचेच सरकार असल्याने त्यांचे मनोधैर्य आणखी वाढले आहे. यातील काही धर्मांतराची प्रकरणे ही संबंधितांना काहींना काही लाभाचे आमिष दाखवून केले जात आहे, ही सर्वात दुदैवा बाब आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे उत्तरप्रदेशातील धर्मांतर करणार्‍या झोपडपट्टीतील रहिवाशांना केशरी रेशन कार्ड देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे कसले धर्मांतर आणिघरवापसी? हे तर राजसत्तेच्या जोरावर केले जाणारे धर्मांतर ठरावे. विकासाचा मुद्दा घेऊन प्रगती करण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या संघ परिवाराच्याच बेबंद व बेछूट वक्तव्यांनी आणि कारवायांनी उद्विग्न झाले आहेत अशी राजधानीत चर्चा आहे. देशाच्या राजधानीत आपल्या निकटवर्तीयांशी बोलताना संघाचे लोक यापुढे असेच वागणार असतील तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ अशी थेट धमकीच त्यांनी त्या परिवाराला दिली असल्याचे समजते. निरंजन ज्योती, गिरिराज सिंग, प्रवीण तोगडिया, सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी यांच्या अविवेकी वक्तव्याने बेजार झालेल्या पंतप्रधानांनी त्यांना आधीच आपले वर्तन व वक्तव्य सुधारण्याची तंबी दिली आहे. मात्र मोदींचा इतिहास पाहता हे त्यांचे नाटक ठरावे. कारण गुजरातमधील दंगलीच्या संदर्भात त्यांच्या आरोप झाले होतेच. त्यावेळी मोदींना राजसत्ता उपभोगण्याचा सल्ला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी दिला होता. मात्र त्यावेळी हा सल्ला मोदींनी एैकला असता तर त्यांच्या दंगलीबाबत आरोप झाले नसते. असो. राजस्थानच्या एका बेजबाबदार मंत्र्यापासून थेट विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवार यातलीच ज्येष्ठ मंडळी सामील झाली आहे. प्रल्हाद गुंजाळ या राजस्थानच्या आमदारावर अशा बेजबाबदार वर्तनासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी निलंबनाची कारवाई केली. या गुंजाळाने प्रशासकीय अधिकार्‍यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा त्याच्यावर आरोप होता. मात्र गुंजाळावर कारवाई करणे आणि विश्व हिंदू परिषदेच्या तोगडियांवर किंवा रा.स्व. संघाच्या मोहन भागवतांवर ती करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मोदींची भाषा (निदान दाखवायला तरी) विकासाची व गुड गव्हर्नन्सची आहे तर संघ परिवारातील या मंडळींची भाषा राम मंदिर, ३७० वे कलम, धर्मांतर किंवा घरवापसी अशी धर्मसंबद्ध आहे. ही भाषा उघडपणे देशात दुही माजविणारी आहे. या देशात हिंदूंची संख्या ८० टक्के आहे तर इतर समाज २० टक्के आहे. त्यांची संख्या २६ कोटी एवढी आहे. हा वर्ग अल्पसंख्य असल्याने संघटित पण स्वत:ला असुरक्षित मानणारा आहे. हिंदुत्वाच्या आक्रमक प्रचारामुळे व सामूहिक धर्मांतरे घडविण्याच्या संघ परिवाराच्या धमक्यांमुळे तो स्वत:ला जास्त असुरक्षित मानू लागला आहे. एखादा समाज व वर्ग स्वत:ला असा असुरक्षित वाटून घेऊ लागला, की तो कोंडीत अडकलेल्या मांजरासारखा बेभान होतो. एकेकाळी पंजाबातील शिखांचा एक मोठा वर्ग जर्नेलसिंग भिंद्रानवाले या तथाकथित संताच्या नेतृत्वात असा बेभान झालेला देशाने पाहिला आहे. ही पाळी संघ परिवाराचे लोक देशातील २६ कोटी लोकांवर उद्या आणणार असतील तर या देशातील अल्पसंख्यच नव्हे तर बहुसंख्यकही सुरक्षित राहू शकणार नाहीत. अशा अस्थिर स्थितीत गुड गव्हर्नन्स आणि विकासही होणार नाही. संघ परिवाराच्या आताच्या आक्रमक कार्यपद्धतीमुळे नरेंद्र मोदींचा विकास कार्यक्रमच अडचणीत आला आहे. केवळ हिंदूंनाच आपल्यासोबत ठेवून चालणार नाही. या देशातील मुसलमान, ख्रिश्चन, बुद्ध, शीख, जैन व पारशी अशा सार्‍यांनाच सोबत घेऊन हा देश समोर न्यायचा आहे. मात्र संघाची वाटचाल दुहीची आहे. संघ ही धार्मिकदृष्ट्‌या एकारलेली संघटना आहे. भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे म्हणत तिला देशातील इतर धर्मांतील लोक घरवापसीच्या नावाखाली हिंदू धर्मात आणायचे आहेत. बरे संघ लोकांना हिंदूत आणून त्यांना कोणती जात बहाल करणार आहेत त्याचे कोणच बोलत नाहीत. धर्मांतर कुठे सक्तीने तर कुठे प्रलोभनाने घडवून आणण्याची संघाची तयारी आहे. ही बाब भारताच्या धर्मनिरपेक्षता या घटनादत्त मूल्याचा अवमान करणारी आहे.
-------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel