-->
संपादकीय पान गुरुवार दि. २० नोव्हेंेबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
साहेबांचा भविष्याचा वेध
------------------------
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासारखा धुर्त राजकारणी शोधून सापडणार नाही. राज्यात आपले सरकार पुन्हा येणार नाही मात्र तसे असले तरी आपण सत्तेच्या वर्तुळात राहिले पाहिजे हे बरोबर हेरुन त्यांनी भाजपाच्या अल्पमतातल्या सरकारला पाठिंबा दिला. भाजपा सत्तेच्या जवळ जात आहे मात्र त्यांना स्पष्ट बहुमत मिळत नाही असे दिसताच त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर करुन पहिली बाजी मारली होती. त्यावेळी शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे मात्र भाजपावर अटी लादत बसले होते. शिवसेनेच्या या घोळात पराव कधी बाजी मारुन गेले हे कुणालाच कळले देखील नाही. कालपर्यंत कॉँग्रेसच्या सत्तेतल्या कळपात वावरणार्‍या शरदरावांनी अचानक बाजू पलटून हिंदुत्ववादी भाजपाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. त्या बद्दल अनेकांना आश्‍चर्य वाटले असले तरीही त्याच आश्‍चर्य करण्यासारखे काहीच नाही. आश्‍चर्य व्यक्त करणार्‍यांना खरोखरीच पवार काय आहेत ते समजलेलेच नाहीत असे म्हणावे लागेल. अलिबागमध्ये राष्ट्रवादी पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबीरात भविष्याचा वेध घेताना येत्या सहा महिन्यात राज्यात पुन्हा निवडणुका होतील असे भाष्य केले. तसे पाहता शरद पवारांचे हे विधान म्हणावे तर गंभीर आहे, मात्र ते फारसे कुणी मनावर घेणार नाही. कारण पवारसाहेब बोलतात त्याच्या नेमके उलटे करुन दाखवितात हे नित्याचेच ठरलेले आहे. शरद पवार हे एवढ्या तातडीने म्हणजे सहा महिन्यातच सरकारचा पाठिंबा काढून घेतील असे डोक्यात विचार आणणेही मुर्खपणाचे ठरेल. मात्र सध्याच्या स्थितीत पवारांना भाजपाच्या सरकारच्या डोक्यावर सतत टांगती तलवार ठेवायची आहे व आपल्या माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई होणार नाही हे पहायचे आहे. त्यासाठी पवारांची सध्या धडपड सुरु आहे. शिवसेना-भाजपा यांच्यातील दुाराव्याचा फायदा घेत शरदरावांनी बरोबर गेम साधला. त्यासाठी त्यांना अंबानी-अदानी यांच्याशी असलेली मैत्रीही कामास आली. शिवसेनेचे नेतृत्व नेमके त्याच बाबतीत कमी पडले. सरकारने येत्या डिसेंबरत होणार्‍या अधिवेशनात कोणतेही उत्साहाच्या भरात धाडसी घोषणा करु नयेत व आपल्याला मारक ठरतील अशा गोष्टी घडू नयेत यासाठी दबाब आणण्यासाठी पवारांनी मध्यवधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. अशा प्रकारे सरकारवर दबाव ठेवीत असताना आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी पक्ष सोडू नये यासाठीचीही तरतूद या विधानातून केली आहे. कारण जे कुणी आमदार फुटून भाजपाच्या गोटात जाण्याच्या तयारीत असतील ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करु शकतात. साहेब जर निवडणुका सहा महिन्यात होतील असे जर संकेत देत असले तर पक्ष सोडण्याचा धोका कशाला घ्या, असाही विचार दोन दगडांवर पाय ठेवून असलेले आमदार करतील. त्यामुळे या विधानातून पवारसाहेबांनी अनेक पक्षी एकाच दगडात मारले आहेत. त्याचबरोबर साहेबांच्या डोक्यात भविष्याचा काही वेगळाच वेध सुरु असणार यात काहीच शंका नाही. सध्याच्या नवीन सरकारपुढे अनेक आव्हाने आता आ वासून उभी आहेत. प्रामुख्याने आत्तपासूनच दुष्काळाच्या झळा लागू लागल्या आहेत. जवळपास १९ हजार गावांमध्ये दुष्काळाचे वातावरण आत्ताच आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात हे चित्र आणखी विदारक होणार आहे. तसेच उसाचे, कापसाचे हमी भाव जाहीर करताना भाजपाने दिलेली आश्‍वासने पूर्ण होणे कठीणच आहे. जर हे हमी भाव वाढविले नाहीत तर शेतकर्‍यांमध्ये नाराजी होणे स्वाभाविक आहे. तसेच टोल रद्द करुन राज्य टोलमुक्त करु अशी घोषणा केली होती. अशा प्रकारे भाजपाने निवडणुकीच्या काळात जी अवास्तव आश्‍वासने जनतेला दिली आहेत त्याची पूर्तता करणे त्यांना आता सत्ता आल्यावर कठीण जाणार आहे. या घोषणा जर प्रत्यक्षात उतरल्या नाहीत तर सरकारला मोठ्या प्रमाणावर रोष पत्करावा लागणार आहे. अशा वेळी पवारसाहेबांसाठी एक नामी संधी चालून येणार आहे. पुन्हा निवडणुका घेणे कोणत्याच पक्षाला परवडणारे नाही, अगदी राष्ट्रवादीलाही निवडणुका नको आहेत. अशा वेळी काही नवीन समिकरणे जुळविण्याचा प्रयत्न साहेब करतील. नाही तरी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अजून मुख्यमंत्रीपदी महिला बसलेली नाही. साहेबांना आपल्या कन्येला मुख्यमंत्रीपदी बसविण्याचे स्वप्न आहेच. अशा वेळी महिला मुख्यमंत्री होणार असेल तर राज्यात राजकीय उलथापालथ करण्यास साहेब उत्सुक असतील. मग त्यासाठी ते पुलोदसारखा एखादा प्रयोग राज्यात करु शकतात. त्यासाठी ते पुरोगाम्यांपासून ते प्रतिगाम्यांपर्यंत सर्वांची मोट बांधू शकतात. तेवढी क्षमता, तेवढे चार्तुर्य व सर्व पक्षीय मैत्री हे सर्व गुण कामी येणार आहेत. मात्र यावेळी ते मुख्यमंत्री असणार नाहीत तर त्यांची कन्या असेल. अर्थातच हे सर्व राज्याच्या भल्यासाठी केले जाणार आहे. पवारसाहेबांना भविष्यचा वेध हा अशा प्रकारे डोक्यात आहे. अर्थात ही बाब ते बोलून दाखविणार नाहीत. कारण आपण जे बोलतो त्याच्या नेमके उलटे करतो हे आता सर्वमान्य झाले आहे याची साहेबांनाही कल्पना आहे. सध्या त्यांनी राज्याच्या हीतासाठी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्याच धर्तीवर साहेब सत्तेची मोट बांधण्यासाठी कुणाच्याही कळपात जाऊ शकतात. त्यांची उठबस डाव्यांपासून उजव्यांपर्यंत सर्व पक्षात आहे आणि त्या सर्वांनाही ते आपलेसेे वाटत असतात. त्यामुळे अलिबागच्या चिंतन शिबीरात जे उघडपणे चिंतन झाले त्यापेक्षा काही वेगळी गणिते साहेबांच्या डोक्यात सुरु असणार. हा भविष्याचा वेध सांगितलेला एक आहे व मनातला दुसराच आहे. हीच तर साहेबांची खासियत आहे.
-----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel