-->
संपादकीय पान मंगळवार दि. ७ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
राजकीय स्वार्थासाठी 
राज्याची बदनामी
--------------------------------------
सध्या भाजपाने आपल्या निवडणुकांची केलेली जाहीरातबाजी पाहता महाराष्ट्र हे राज्य बिहारपेक्षाही मागासलेले, गरीबी व गुंडागर्दी असणारे राज्य आहे की काय अशी समजूत देशवासियांची व्हावी. आपला राजकीय स्वार्थ साध्य करण्यासाठी अशा प्रकारे राज्याची लक्तरे भाजपाने वेशीवर टांगण्यास सुरुवात केली आहे आणि हे चुकीचे आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या शिर्षकाखाली सध्या ही जाहीरातबाजी भाजपाने रेडिओ, टी.व्ही.वर आक्रमकपणे व जोरदारपणे केली आहे. अशाच प्रकारची जाहीरातबाजी भाजपाच्या नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकसभेच्या प्रचाराच्या दरम्यान केली होती. निवडणुकीचा प्रचार संपून भाजपा सत्तेत आली, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र सत्तेत येण्यापूर्वी जी आश्‍वासने भाजपाने दिली होती त्याच्या नेमके विरोधात वागावयास सुरुवात केली. आज त्या जाहिराती जर पुन्हा पाहिल्या तर भाजपाच्या आश्‍वासनांविषयी हसू येते. आज नेमके तेच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांबाबत सुरु आहे. महाराष्ट्राची वस्तुस्थिती न स्वीकारता या जाहीरातीतून बदनामी सुरु केली आहे. अशा मार्गाने आपण सत्ता काबीज करु असे भाजपाला वाटते. नरेंद्र मोदींची ही गोबेल्स निती झाली. गोबेल्स हा नेहमी बेमालून खोटी गोष्ट खरी असल्याचे सातत्याने ठासून सांगावयाचा. त्यामुळे एखादी खोटी गोष्टही खरी वाटायला लागले. हीच गोबेल्स निती विधानसभेच्या निवडणुकीत वापरली जात आहे. महाराष्ट्र हे सध्या देशातली एक प्रगत राज्य म्हणून पुढे आले आहे. कॉँग्रेसच्या राज्यात प्रगती कमी झाली किंवा गेल्या काही वर्षात भ्रष्टाचारामुळे अधोगती झाली हे मान्य करावे लागेल. मात्र एकूण देशाचा विचार करता महारष्ट्र हे अत्यंत औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य ठरले आहे. जगातील वाहन उद्योगातील आघाडीच्या पंधरा कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आज महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र हे एक वाहन उद्योगातील आशिया खंडातील उत्पादनाचे हब म्हणून नावारुपाला आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून सर्वात मोठे औद्योगिकीकरण राज्यात झाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात असल्याने राज्याला त्याचा फायदा झाला हे निश्‍चित खरे आहे. टाटांचा नॅनो प्रकल्प फक्त गुजरातमध्ये गेला आणि त्याचा गाजावाजा मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. तीच तर्‍हा औषध उत्पादक कंपन्यांची आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे औषध उत्पादनाचे प्रकल्प राज्यात आहेत. औषध कंपन्यांचे संशोधन प्रकल्प आहेत. त्याच्या जोडीला आय.टी. उद्योगांचे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील कंपन्यांनी आपले प्रकल्प मुंबई-पुण्याजवळ थाटले आहेत. अशा या महाराष्ट्राची बदनामी करणे भाजपाला शोभत नाही. एका जबाबदार राजकीय पक्षाने अशा प्रकारे सत्तेचे शिखर गाठण्यासाठी एवढ्या हिन पातळीवर येऊन प्रचार करणे चुकीचे आहे. नरेंद्र मोदी यांनी केवळ मिडीयाचा वापर करुन व सोशल मिडियाच्या आधारे प्रचाराचा धडाका लावून केंद्रात सत्ता काबीज केली. कॉँग्रेसच्या सरकारनेही जनतेच्या काही कामे न केल्याने मोदींच्या प्रचाराला बळ आले. आता देखील केंद्राचा प्रयोग आपण राज्यात यशस्वी करु असा फाजिल आत्मविश्‍वास भाजपाला वाटतो आहे. आपली राज्यातली ताकद किती आपल्याभोवती असलेले समर्थक किती याचा अंदाज भाजपाने घेतलेला नाही असेच वाटते. कारण यावेळी भाजपाच्या उमेदवारातून ५२ हून जास्त उमेदवार हे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षातून आयात केलेले आहेत. म्हणजे भाजपाकडे जवळपास २० टक्के उमेदवारच नव्हते. त्यामुळे त्यांना अन्य पक्षातून आयात करण्याची पाळी आली. अशा प्रकारे बाहेरुन आयत्या वेळी उमेदवार उभे करुन भाजपा सत्तेच्या शिखरावर पोहचू शकणार आहे का, असा सवाल आहे. भाजपाला असलेला हा अवास्तव आत्मविश्‍वास आहे. यातील बहुतांशी उमेदवारांनी एका रात्रीत आपली निष्ठा बदलली आहे. आपल्याकडेही रायगड जिल्ह्यात अशीच बेडूकउडी प्रशांत ठाकूर यांनी मारली. अशा लोकांना भाजपा बरोबर घेऊन जाऊन बदल कोणता करुन दाखविणार आहे? कालचा कॉँग्रसेमध्ये किंवा अन्य पक्षात असलेला आमदार किंवा कार्यकर्ता भाजपात आल्यावर लगेच पवित्र कसा होतो? कालपर्यंत भाजपा ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून ठपका ठवून त्यांना हिणवत होते ते मात्र भाजपात आल्यावर स्वच्छ असल्याचे त्यांना भाजपातर्फे सर्टिफिकेट प्रदान केले जाते कसे? भाजपाचे हे सर्व सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी सुरु आहे हे समजायला जनता एवढी दुधखुळी नाही. नरेंद्र मोदी यांनी राज्यात २५ जाहीर सभा घेऊन महाराष्ट्र घुसळून काढणार आहेत. परंतु पंतप्रधानांनी एवढ्या सभा घ्याव्यात का, असा सवाल आहे. त्याचबरोबर प्रत्येक सभेत त्यांचे बोलणे हे देशाचा एक पंतप्रधान आहोत हा दृष्टीकोन ठेवून नाही. तर अजूनही ते गुजरातचा मुख्यमंत्री असल्याच्या थाटात विधाने करीत आहेत. राज्यात त्यांनी भाजपासाठी जरुर प्रचार सभा घ्याव्यात मात्र पंतप्रधानांच्या पदाला शोभेल अशी विधाने करणे व आश्‍वासने देणे गरजेचे आहे. यासंबंधी मोदींच्या या वागण्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेमके बोट ठेवले आहे. सध्या भाजपाला राज्यात स्वबळावर सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही पक्षातून आलेला नेता चालू शकतो. राज्याची खोटी केलेली बदनामी त्यांना चालू शकते. काहीही झाले तरी चालेल पण सत्ता मिळवायची असे ध्येय भाजपाचे आहे. भाजपा सत्तेत आल्यावर विदर्भ वेगळा करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र अशा प्रकारचे राज्याचे तुकडे पाडणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचा हा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, याची दखल भाजपाने घ्यावी.
-------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel