-->
संपादकीय पान सोमवार दि. ६ ऑक्टोबर २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
तरुणाईला साद
----------------------------
आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे, आपल्या लोकसंख्येमध्ये ५० टक्के लोकसंख्या ही ४० वयोगटाच्या खाली आहे. त्याविरुध्द युरोपातील स्थिती आहे. युरोपात ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तर लोकसंख्येच्या वाढीचा वेग अतिशय मर्यादित असल्याने युरोप आता ज्येष्ठ नागरिकांचा क्लब झाला आहे. त्यातुलनेत आपण व चीन हे तरुण देश म्हणून जगात ओळखले जातात. आपल्याकडील तरुणांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे तरुणांच्या हाती सत्तेची चावी आली होती. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही तरुण मतदार प्रामुख्याने पहिल्यांदा मतदान करणारे तरुण युवक महत्वाची भूमिका बजावणार आहेत. या युवकांना विचारांची योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. याच हेतूने शेतकरी कामगार पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अलिबागमध्ये आयोजित केलेल्या तरुण-तरुणी मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त होते. सध्या फेसबूक, व्टिटर, व्हॉटस् ऍपच्या माध्यमातून जाती-धर्माच्या नावावर तरुणांची माथी भडकावून त्यांची दिशाभूल करण्याचे धंदे सध्या अनेक राजकीय पक्ष करीत आहेत. अशा प्रकारचे राजकारण करुन ते आपली पोळी भाजत आहेत. अशा पक्षांना वेसण घालून तरुणांना विकासाची एक नवी दिशा देण्यासाठी शेकापने आयोजित केलेल्या या मेळाव्यात नवविचाराची तुतारी फुंकण्यात आली. पूर्वीचे राजकारण व आत्ताचे राजकारण यात मोठा फरक आहे. स्वातंत्र्यानंतर आलेल्या तरुण पिढीने स्वातंत्र्य लढा अनुभवला होता त्यामुळे त्यांच्याकडे ब्रिटीशांविरोधी लढ्याची शिदोरी होती. त्यांच्या डोळ्यासमोर संघर्षाचा जाज्वल्य इतिहास होता. पुढच्या तीन पिढ्यांसाठी स्वातंत्र्यलढ्याचा हा इतिहास मोठा प्रेरणादायी ठरला. आजच्या पिढीपुढेही तो इतिहासही महत्वाचा आहेच मात्र आता देशाची सांपत्तीक स्थिती सुधारल्याने अनेक सुधारणा झाल्या. नवीन तंत्रज्ञान आले. लोकांच्या हातात पैसा घोळू लागला. तरुण पिढीवर फेसबूक, व्टिटर, व्हॉटस् ऍप या सोशल नेटवर्किंगने प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या विभागणीमुळे ज्या दंगली उसळल्या होत्या त्यातून हिंदु-मुस्लिम समाजातील दुराव्याचे दुष्यपरिणाम त्या पिढीने अनुभवले होते. त्यामुळे या दोन समाजातील दुरावा सांधण्याचे काम करुन समाजात एकजीनसीपणा आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ९१ साली बाबरी मशिद पाडल्यानंतर हिंदु-मुस्लिम समाजातील तेढ नव्याने उभी राहिली. त्याचवेळी भगव्याने उचल खाल्ली आणि या दोन समाजात तेढ निर्माण करणारे सत्तास्थानी आले. ९०च्या दशकातील तरुण त्या विचाराकडे ओढले गेले. परंतु या दंगली सरुन आता अडीज दशके झाली आहेत. त्यावेळी जन्मलेला तरुण आज मतदार झाला आहे. त्या तरुणाला आता ही तेढ नको आहे. त्याला विकासाचा ध्यास आहे. चांगले शिक्षण घेऊन आपला विकास साधत असाताना देशाचा विकास त्याला करावयाचा आहे. अर्थात असे करीत असताना युवकांना विकासाचे गाजर दाखवित भगव्या शक्तांनी छुप्या मार्गाने धर्मांधता आणली आहे. त्याच बळावर भाजपाने केंद्रात सत्ता काबीज केली हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये राजकारणात शिरुन समाजकारण करण्याची विशेष ओढ नव्हती. प्रामुख्याने शहरी तरुण यापासून अलिप्त राहणे पसंत करीत होता. मात्र चांगले, प्रामाणिक काम करणारे, समाजाविषयी तळमळ असणारे तरुण राजकारणात आले पाहिजेत, यातून देशाच्या विकासाला मोठा हातभार लागू शकतो तसेच भारताला आपण जगातील महत्वाच्या देशाच्या रांगेत नेऊन बसवू शकतो. आपल्याकडे आज मोठ्या संख्येने लोक शिक्षण घेऊ लागले आहेत. शिक्षण केवळ मराठीत नव्हे तर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची तरुणांना व त्यांच्या पालकांना आस आहे. इंग्रजी ही जगाची भाषा आहे आणि एकदा तुम्ही इंग्रजी शिकलात की तुमच्यासाठी जग ही श्रमाची बाजारपेठ आहे. त्यामुळे आपली प्रगती करण्यासाठी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे आवश्यकच आहे. शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण केल्या गेल्या पाहिजेत. रायगड जिल्ह्याचा विचार करता आर.सी.एफ, इसस्पात, वेलस्पन यांच्यासारख्या मोठ्या कंपन्या आल्याने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. त्याच्या जोडीला लघुउद्योगांनाही वाव मिळाला. आपल्याकडे कोणताही प्रकल्प आला की त्याला पर्यावरणाच्या नावाखाली विरोध केला जातो. मात्र अशा प्रकारे उठसूठ विरोध केल्याने रोजगाराच्या संधी कमी होतात हे विसरले जाते. प्रकल्प येत असताना, त्याचे स्वागत करीत असताना तो प्रकल्प ज्या जागेवर उभा राहिला आहे तेथील शेतकर्‍याला त्याच्या जमिनीचा योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे, त्यांचे पुर्नवसन योग्यरित्या झाले पाहिजे, हा आग्रह धरला गेला तर नवीन प्रकल्प उभारण्यास विरोध होणार नाही. या तरुणांच्या हाताला काम मिळाले की त्याचे हात विधायक कामासाठी लागतील, अन्यथा तेच हात समाजविघातक कृत्य करु शकतात. तरुणांनीही केवळ नोकर्‍यांच्या मागे न लागता स्वयंरोजगाराच्या अनेक लहान-मोठ्या संधी शोधून आपले स्थान कसे बळकट होईल ते पाहिले पाहिजे. सध्याचा तरुण हा खूप संवेदनाक्षम आहे. एका बोटावर त्यांच्याकडे इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा महासागर उपलब्ध होतो. त्यामुळे त्याच्याकडे ज्ञानाचा सागर आहे. मात्र त्या ज्ञानाचा त्याने चांगला वापर करावा व त्यातून विकासाचे सेतू बांधावे यासाठी त्याला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. शेकापने तरुण-तरुणी मेळावा घेऊन याची चांंगली सुरुवात केली आहे. तरुणाईला घातलेल्या या सादेतून उद्याचा भारत उभारला जाणार आहे.
-----------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel